krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Fertigation : फर्टिगेशन म्हणजे काय? (भाग-1)

1 min read
Fertigation : ठिबक सिंचन (Drip irrigation) पद्धतीत पाण्याद्वारे पाण्यात विरघळणारी (विद्राव्य - Soluble) खते योग्य त्या प्रमाणात व पाहिजे त्या वेळी (पिकांच्या गरजेनुसार) परिणामकारकरित्या देता येतात. पाण्याबरोबर खते व मूलद्रव्ये देण्याच्या या प्रकारास शास्त्रीय भाषेत फर्टिगेशन (Fertigation) असे म्हणतात.

🌐 ठिबक सिंचनातून खते दिल्यास होणारे फायदे
✴️ खतांचा अधिक कार्यक्षमतेने वापर. द्रवरूप खत पिकांच्या मुळांद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो. त्यामुळे खतमात्रेत 25 ते 50 टक्के बचत होते. तर पाण्यामध्ये 30 ते 50 टक्के बचत होते.
✴️ खतांच्या उपलब्धतेत वाढ. पिकांच्या मुळांच्या जवळच खत आणि पाणी दिले जाते. त्यामुळे खत आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते.
✴️ मजुरीच्या खर्चात बचत.
✴️ पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात.
✴️ दर्जेदार व अधिक उत्पादन मिळते. पीक लवकर तयार होते. उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
✴️ जमिनीचे आरोग्य अबाधित राखले जाते.
✴️ द्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात.
✴️ हलक्या प्रतीच्या जमिनीत देखील पिके घेता येतात.
✴️ आम्लयुक्त (Acidic) विद्राव्य खतामुळे (Soluble fertilizer) ठिबक संचामध्ये आपोआप रासायनिक स्वच्छता होते.
✴️ पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात.
✴️ खतांची कार्यक्षमता 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढविता येते.
✴️ विद्राव्य खतांमध्ये सोडियम आणि क्लोरिनचे प्रमाण अतिशय कमी असते.
✴️ सूक्ष्म द्रवरूप खतांची फवारणी पिकांवर त्वरित करता येते.

🌐 ठिबक सिंचनातून द्यावयाची खते निवडतांना घ्यावयाची काळजी
✴️ खते पाण्यामध्ये लवकरात लवकर विरघळणारी असावीत.
✴️ खतांची विरघळण्याची क्षमता अधिक असावी.
✴️ पाण्यात विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरुपात एकत्रीकरण होता कामा नये.
✴️ खताच्या संचाच्या घटकांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी खते निवडावीत.
✴️ खते शेतातील वापरासाठी सुरक्षित असावीत.
✴️ खतांची पाण्यात असणाऱ्या क्षारांबरोबर कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया होणार नाही, याची काळजी घ्यावी.
✴️ एकाच वेळी एकापेक्षा अधिक खते एकत्र द्यावयाची असल्यास त्यांची आपापसात कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत. ठिबक संचातून युरिया, डायअमोनियम फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश ही खते देता येतात. नंतरची दोन खते अगोदर पाण्यात विरघळवून घ्यावी लागतात.

🌐 विद्राव्य रासायनिक खतांचे अन्नद्र्व्यानुसार प्रकार
🌐 नत्रयुक्त खते (Nitrogen fertilizers)
युरिया (Urea) हे खत सर्वांत उत्कृष्ट व पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे. युरिया खताची पाण्याशी कोणत्याही प्रकारची संयुगे तयार होत नसल्यामुळे ठिबक सिंचनातून देणे अधिक फायदेशीर आहे. ह्याशिवाय बाजारात अमोनिअम सल्फेट (Ammonium Sulphate), अमोनिअम क्लोराईड (Ammonium chloride) व कॅल्शियम नायट्रेट (Calcium nitrate) ही पाण्यात विरघळणारी नत्रयुक्त खते (Nitrogen fertilizers) उपलब्ध आहेत.

🌐 स्फुरदयुक्त खते (Phosphorous fertilizers)
स्फुरदयुक्त खते (Phosphorous fertilizers) ठिबक सिंचनातून देण्याअगोदर पाण्यातील कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे प्रमाण तपासावे. पाण्याची कॅल्शिअम (Calcium) व मॅग्नेशिअम (magnesium) बरोबर फॉस्फरसची (Phosphorus) रासायनिक अभिक्रिया (Chemical reactions) होऊन तयार होणारा पांढरा साका ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद करण्यास कारणीभूत ठरतो. उपलब्ध स्फुरदयुक्त खतांपैकी (Phosphorous fertilizers) फॉस्फॅरिक आम्लाचा (phosphoric acid) उपयोग ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खत पिकाच्या मुळाजवळ उपलब्ध होऊन त्याचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.

🌐 पालाशयुक्त खते (Phosphate fertilizers)
पालाशयुक्त खतांचा (Phosphate fertilizers) वापर ठिबक सिंचनातून करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पोटॅशिअम क्‍लोराईड (Potassium chloride) हे खत उपयुक्त आहे. रेड पोटॅशचा (Red potash) वापर केल्यास त्यातील लोहामुळे (Iron) ठिबक तोट्या बंद होण्याचा धोका असतो.

🌐 मिश्र व सरळ खतांच्या ग्रेड्स
रासायनिक खते ठिबक सिंचनातून वापरण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या (विद्राव्य) सरळ खतांमध्ये युरिया (Urea), अमाेनिअयम नायट्रेट (Ammonium nitrate), डायअमोनिअम फोस्फेट (Di ammonium phosphate), पोटॅशिअम क्‍लोराईड (Potassium chloride) तर मिश्र खतांमध्ये (Mixed fertilizers) 20-20-20, 20-9-20, 15-4-15 आणि द्रवरूप खतांमध्ये 4-2-8, 6-3-6, 6-4-10, 12-2-6, 9-0-6 अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत.

🌐 ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती
ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणात आणि मात्राबद्ध पद्धतीने देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर राहते. खतमात्रा व पाण्याचा प्रवाह सतत एकसारखा राहतो. उदा. एक लिटर खत द्रावण आणि 100 लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच ‘पीपीएम’मध्ये (parts per million) मोजली जाते. मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खत मिश्रित व खत विरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खतमात्रा किलाेग्रॅम/हेक्‍टर या स्वरुपात मोजली जाते.

🌐 खते देण्याची उपकरणे
✴️ फर्टिलायझर टँक (Bypass tank)
फर्टिलायझर टँकमध्ये खत व पाण्याचे द्रावण तयार होऊन ठिबक संचातील तोट्यांद्वारे पिकाच्या मुळाशी पोचते.
❇️ फायदे
✴️ देखभालीवरील खर्च कमी, सुलभ वापर.
✴️ पाण्यात विरघळणारी खते देण्यासाठी उपयुक्त.
✴️ खते देण्यासाठी वाढीव ऊर्जेची आवश्‍यकता नाही.
❇️ तोटे
✴️ फक्त मात्राबद्ध (Quantitative) पद्धतीने खते देता येते.
✴️ खतांची तीव्रता एकसारखी राहत नाही, ती कमी होत जाते.
✴️ पाण्याचा दाब व प्रवाह यातील बदलानुसार खत मात्रा व तीव्रता बदलते.
✴️ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फर्टिगेशन करण्यासाठी वाहून नेण्यावर निर्बंध येतात.
✴️ स्वयंचलित सिंचन प्रणालीमध्ये वापरासाठी मर्यादा आहेत.

🌐 व्हेंच्युरी इंजेक्‍टर (Venturi injector)
या उपकरणाच्या साहाय्याने पाईपमध्ये पोकळी निर्माण करून खत द्रावण ओढून घेतले जाते.
❇️ फायदे
✴️ देखभालीवरील खर्च कमी. वजनाने हलकी व अनेक ठिकाणी वापरण्यास शक्‍य होते.
✴️ खताची तीव्रता एकसमान राहते.
✴️ बाहेरील वाढीवर ऊर्जेची आवश्‍यकता नाही.
✴️ स्वयंचलित सिंचनप्रणालीमध्ये वापरता येते.
❇️ तोटे
✴️ मोठ्या प्रमाणावर दाबातील घट (हेड लॉस-30 टक्‍क्‍यांपर्यंत)
दाबातील फरकानुसार कार्यक्षमतेत बदल होतो.

🌐 फर्टिलायझर इंजेक्‍शन पंप (Fertilizer injection pump)
यामध्ये हायड्रॉलिक व इलेक्‍ट्रिक पंपाचा अंतर्भाव होतो. हायड्रॉलिक पंपामध्ये ॲमेआईड व डोसाट्रोन तर इलेक्‍ट्रिक पंपामध्ये डायफ्रॅम व पिस्टन पंपाचा वापर केला जातो.
❇️ फायदे
✴️ प्रमाणबद्ध (Proportional) पद्धतीने खत देता येते. मूळ किंमत व देखभालीवरील खर्च कमी.
✴️ खतमात्रा अतिशय काटेकोरपणे व एकसमान तीव्रतेने देता येते.
✴️ पाण्याच्या दाबातील फरकाचा परिणाम होत नाही, हेड लॉस नाही.
✴️ वजनाने हलका व अनेक ठिकाणी वापर शक्‍य होतो.
✴️ स्वयंचलित सिंचन प्रणालीसाठी उपयुक्त आहे.
✴️ बाहेरील वाढीव ऊर्जेची आवश्‍यकता नाही.
❇️ तोटे
✴️ मूळ किंमत जास्त आहे.
✴️ काही पंपांसाठी वाढीव ऊर्जा आवश्‍यक असते

🌐 माहिती सौजन्य :- डॉ. पपिता गौरखेडे (मृदा विज्ञान व कृषी रसायन शास्त्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!