krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Well refilling : विहीर पुनर्भरण काळाची गरज

1 min read
Well refilling : अलीकडच्या काळात सिंचनासाठी (irrigation) पाण्याचा (पाण्याचा) वापर आणि जमिनीतील पाण्याचा उपसा प्रचंड वाढला आहे. ज्या प्रमाणात जमिनीतील पाण्याचा उपसा केला जात आहे, त्या प्रमाणात पावसाचे पाणी जमिनीत जात नाही. त्यामुळे दिवसागणिक जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. ही पातळी किमान स्थिर ठेवण्यासाठी विहिरींचे पुनर्भरण (Well refilling) करणे ही आता काळाची गरज झाली आहे.

भूजल भरणाचा नैसर्गिक वेग
जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे आहेत. पहिला थर मातीचा असून, या थरातून पाणी मुरण्याचा वेग हा दर दिवसाला साधारणपणे 2 सेंटीमीटर असतो. मुरमाच्या थरातून पाणी वाहण्याचा दर 10 सेंटीमीटर असू शकतो. त्या खडकांना भेगा, फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात. त्या खडकातून पाणी वाहण्याचा दर हा 200 सेंटीमीटर एवढासुद्धा असू शकतो. या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला असता, पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो. म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी आहे, हे दिसून येते.

️ पुनर्भरण पद्धती
विहीर पुनर्भरण करताना विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये 10 फूट लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. विहिरीपासून पहिला खड्डा 10 फूट लांब, 10 फूट रुंद व 10 फूट खोल घ्यावा. या खड्ड्याच्या तळाशी एक आडवे छिद्र घेऊन 4 इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे हा खड्डा विहिरीशी जोडावा. या खड्ड्याच्या तळाशी 2.5 फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. त्या थरावर 2.5 फूट जाडीचा थर भरावा. त्यानंतर 2.5 फूट जाडीचा वाळूचा चाळ (चाळलेली वाळू) भरून त्या थरावर धुतलेल्या वाळूचा 2.5 जाडीचा थर भरून घ्यावा. पहिल्या खड्ड्यापासून साधारणपणे 3.5 फूट अंतरावर पुन्हा 10 फूट लांब, 10 फूट रुंद व 3 फूट खोल असा दुसरा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या तळाशी 2 फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. जमिनीच्या पातळीवर 4 इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे दोन्ही खड्डे जोडावेत. ओढ्याच्या पाण्यातील पालापाचोळा, कचरा हे पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यात जाईल. दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल. यासाठी 1,000 ते 1,500 रुपये इतका खर्च साधारणपणे अपेक्षित आहे.

️ पुनर्भरणासाठी कोणती विहीर निवडावी?
❇️ ज्या विहिरीला रब्बी हंगामाच्या शेवटी पाणी कमी पडते.
❇️ विहिरीचे बांधकाम सिमेंटमध्ये अथवा पक्‍क्‍या दगडांत झालेले असावे.
❇️ विहिरीचे ठिकाण हे साठणाऱ्या पाण्यापासून 50 मीटरच्या आसपास असावे.
❇️ विहिरीच्या भोवतालची जागा चिबड किंवा पाणथळ होणारी नसावी.
❇️ सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विहिरीची निवड करू नये.
❇️ भुरकट व गडद पाणलोट क्षेत्रातील विहिरी पुनर्भरणासाठी उत्तम ठरतात, त्यातील जलस्तर साठवणुकीसाठी योग्य असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!