krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Waste Decomposer : वेस्ट डीकम्पाेजर

1 min read
Waste Decomposer : वेस्ट डीकम्पाेजर (Waste Decomposer) नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग (National Centre for Organic and Natural Farming), गाझियाबाद, उत्तर प्रदेश या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे १० वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामध्ये पिकांच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी (fungus) व विषाणूंपासून (virus) सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमिनीची सुपिकता, पिकाची वाढ व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. संस्थेद्वारा पुरविलेल्या प्लास्टिक बाटल्यांमधे उपलब्ध 50 ग्राम कल्चरपासून 200 लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत सोपी व कमी खर्चिक आहे. ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधांअभावी जनावरे पाळणे शक्य नाही. त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

🟢 साहित्य
वेस्ट डीकम्पाेजर
2 किलो गुळ
200 लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
200 लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)

🟢 द्रावण कसे तयार करावे
ड्रममधे 200 लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व 2 किलो गुळ टाकून लाकडी काठीने 2 ते 5 मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिक वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास 3 ते 4 दिवसाचा अवधी जरुरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने 2 ते 5 मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे, अशी कोणतीही अट नाही. पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एन्झाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसित झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे.

🟢 वापरण्याची पद्धती
✳️ जमिनीमध्ये
तयार झालेले 200 लिटर द्रावण 1 एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्म जीवाणू व गांडुळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमिनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रुपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परिणामी पिकांची वाढ जोमाने होते.

✳️ फवारणीसाठी
पिकांवर फवारणीसाठी 1 लिटर पाण्यात 300 मिलि ते 500 मिलि. या प्रमाणात वेस्ट डिकंपोझर द्रावण मिसळून दर 8 ते 15 दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या 15 लिटर क्षमतेच्या पंपात 4 ते 4.5 लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.

✳️ बीज प्रक्रियेसाठी
1 लिटर पाण्यात 300 मिलि. या प्रमाणात वेस्ट डीकंपोजर द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकरक विषाणू व बुरशीपासून बचाव होतो व जोमदार उगवण होते.

✳️ शेणखत तयार करण्यासाठी
अंदाजे 1 टन शेणखताच्या ढिगावर केवळ 20 लिटर वेस्ट डीकम्पाेजर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढीग पलटावा व त्यावर पुन्हा 20 लिटर द्रावण शिंपडावे, असे दर आठवड्याला करत 40 दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते. ज्यामध्ये उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे. शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.

🟢 महत्त्वाचे
एकदा तयार झालेल्या या द्रावणापासून आपण पुन्हा पुन्हा नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहिल्यांदा 20 लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात 2 किलो गुळ व 180 लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. 5 ते 7 दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन 200 लिटर क्षमतेच्या 5 ड्रममध्ये प्रत्येकी 20 लिटर द्रावण, 2 किलो गुळ व 180 लिटर पाणी टाकून पुढील 5 ते 7 दिवसात आपणास 1,000 लिटर द्रावण तयार होऊ शकते.

वेस्ट डीकम्पोझरच्या माध्यमातून आपण काच आणि प्लास्टिक सोडून कुठलाही काडीकचऱ्यापासून दीड ते दोन महिन्यात अतिशय उत्तम सेंद्रीय खत तयार करू शकताे. यासाठी 200 लिटर वेस्ट डीकम्पाेझरमध्ये गाईचे शेणकाला असा तयार करावा. (जसे सारवण्साठी योग्य द्रावण तयार करतात त्याप्रकारे) त्यामध्ये जवळपास एक टन काडीकचरा 10x10x1 फूट उंचीचा थर करावा. हा थर अगोदर पाण्याने ओला करावा. नंतर त्यावर द्रावण सम प्रमाणात शिंपडावे. अशा प्रकारे एक टन काडीकचऱ्याचे थरावर थर आणि शेणकाला अशा प्रकारे रचना केल्यास त्या काडीकचऱ्यापासून जवळपास दोन महिन्यात उत्तम असे सेंद्रीय खत बांधावर तयार करता येऊ शकते. आपण बऱ्याच वेळा सोयाबीन किंवा इतर भूस जाळतो. परंतु, ते न जाळता त्यापासून सुद्धा उत्तम असे सेंद्रीय खत आपणास तयार करता येऊ शकते.

🔆 Cellulose degrading Bacteria
🔆 Xylan degrading Bacteria
🔆 Phosphorus solubilizing Bacteria (PSB)
🔆 Potash solubilizing Bacteria (KSB)

🔆 ICAR-IIFSR च्या अहवालानुसार यामध्ये वरील 4 जीवाणूंचा काऊंटतीव्रता खालीलप्रमाणे आढळते.
🔆 Cellulose degrading Bacteria (10.0×107)
🔆 Xylan degrading Bacteria (2.4×104)
🔆 PSB (2.0×107)
🔆 KSB (8.0×104)
🔆 सर्वसामान्य शेतकरी व माहितगार व्यक्तींना यातील PSB व KSB हे दोन बॅक्टेरिया परिचीत आहेत.

✳️ Cellulose degrading Bacteria :
🔆 याच्या नावातच याची अोळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच काष्टापासून किंवा टाकावू पदार्थापासून कार्बन विलग करणारा जीवाणू.
🔆 हा जीवाणू औद्योगिक वापरात खूपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
🔆 याच जीवाणू वरूनच या प्राॅडक्टचे नाव ठरविण्यात आले आहे. तेव्हा सहाजिकच याच जीवाणूची तीव्रता (काऊंट) या कल्चरमध्ये सर्वात जास्त आहे.त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते.
🔆 वेस्ट डीकम्पाेजरमधील याच जीवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाने (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे.
🔆 पिकास जमिनीतूनही बरेच काही हवे असते. ज्याचा पुरवठा जमिनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमिनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
🔆 अशा वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.

✳️ Xylan degrading Bacteria
🔆 सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे. या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू.
🔆 वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्म जीवाणू म्हणजे Pseudomonas, Bacillus, Rhizobium हे आहेत. यामुळे नत्र स्थिरीकरणास चालना मिळते.
आच्छादनातील बायाेमासचे वेगाने डी-कंपोज करून पिकास मुख्य अन्नद्रव्यांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा डी-कम्पाेजर करते.

✳️ PSB (Phosphorus solubilizing Bacteria)
🔆 दाेन अथवा तीन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करून सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये रुपांतरीत करून मुळांना देते.

✳️ KSB (Potash solubilizing Bacteria)
🔆 मातीतील पाेटॅश सुलभतेने घेण्यास मुळांना मदत करते. अशा प्रकारे मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा डी-कम्पाेजर करते. तसेच बुरशीनाशक व कीटकनाशक म्हणूनही याचा वापर करू शकताे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!