Farmer suicide : भय ईथले संपत नाही!
1 min readगेल्या आठवड्यात श्री विठ्ठलाच्या पंढरपूर जवळील मगरवाडीच्या सूरज जाधव या युवा शेतकऱ्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने आत्महत्या केली. चोखोबा, नरहरी सोनार, सावता माळी, दामाजी पंत, गोरोबा या लोकांना जीवनात मदत करणाऱ्या विठोबाच्या पंढरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मगरवाडीच्या जगाचा पोशिंदा सूरज जाधव या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल घेण्याची गरज परमात्म्याला वाटली नाही.
सूरज जाधवच्या आत्महत्येनंतर विधानसभेत तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यापर्यंत वीजपुरवठा खंडित करण्याचे थांबविल्याची माहिती दिली. हा निर्णय सूरज जाधवच्या आत्महत्येमुळे नव्हे तर पाच राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला मतदारांनी ‘भुई हुंगायला’ लावली म्हणून घेण्यात आला हाेता. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांना वीज मोफत द्या, असे आवाहन आसाम सरकारला नोव्हेंबर महिन्यात केले होते. महाराष्ट्र सरकारला जर प्रियंकाबाईने हे सांगितले असते तर, सूरज जाधव सहित अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. देशात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतच आहे. शेतकऱ्याबरोबर त्यांची बायकाे, पोरांच्या आत्महत्या होताहेत, कुठे आई वडिलांना लग्नाचा भार नको म्हणून तर काही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही म्हणून. आजही देशात रोज 30 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ना कुठे खेद, ना खंत, ना संवेदना. समाजच मुर्दाड झालाय, इतरांना दोष देण्यात काय हाशील.
शेतीचा अवार्ड झाल्यानंतर मिळणाऱ्या मोबदल्याकरिता धुळ्याच्या धर्मा पाटलांनी लढा दिला. पण, कुणी त्यांची दखल घेत नाही. हे लक्षात येताच मुंबईला मंत्रालयात आत्महत्या केली. खर तर या प्रकरणात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांवर भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. पण, झाले उलटेच. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्याच्या दौऱ्यावर असताना पोलिसांनी धर्मा पाटलांच्या वयोवृद्ध पत्नी सखुबाई व मुलगा नरेंद्र यांना अटक केली. न्याय मिळणे तर दूरच, दडपशाहीचा हा अजब नमुना. तेच देवेंद्र फडणवीस व त्यांची भाजपा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज गळे काढत आहेत. शेतकरी प्रश्नांवर आस्था नसलेले राजकीय पक्ष व त्यांचे नेते एकीकडे. त्यातही आपल्या जीवन मरणाच्या विषयांपेक्षा इतर विषयांवर मरमिटणारे, घरात उंदीर कुपोषित असताना पुढाऱ्यांकरिता जीवाची बाजी लावणारे शेतकरी पूत्र एकीकडे.
खरंच दोष कुणाला द्यायचा?
लुटारू व्यवस्थेला की, आपल्याच घरभेद्यांना?