krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rejection of salary increase : माझ्या पगारवाढ (न) नाकारण्याची गोष्ट…

1 min read
Rejection of salary increase : कर्मचारी संप संपला. पगार, पेन्शन याची चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने 25 वर्षापूर्वी मी पगारवाढीला (salary increase) केलेला विरोध, त्यावेळी झालेला संघर्ष ही माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना आहे. त्यातून मी आज इतकी आक्रमक भूमिका का मांडतो आहे हे लक्षात येईल. पाचव्या वेतन आयोगाला मी प्रतिज्ञापत्र लिहून विरोध केला होता व ही वेतनवाढ मला देऊ नये, अशी सरकारला विनंती केली होती. सरकारने ती स्वीकारली नाही.पण त्यावेळी घडलेल्या घटना आणि चर्चा वाचायला तुम्हाला नक्कीच आवडतील.

1994 साली मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. तेव्हा माझे वय 23 वर्षांचे होते. तिथे मी खोलीवर राहायचो. त्यापूर्वी मध्यमवर्गातील कुटुंबातील असल्याने ही शाळा जर मिळाली नसती तर कदाचित आज कार्यकर्ता झाला नसतो. या शहरी शाळेत सारा ‘नाही रे’ वर्ग होता. नगरला पद्मसाळी कामगार मोठ्या संख्येने आहेत. विडी वळणे व इतर कष्टाची कामे हे लोक करतात. त्यांची बहुसंख्य मुले यां शाळेत शिकत होती. मुस्लीम कष्टकरी वर्गातील मुले लक्षणीय होती व उरलेली सारी झोपडपट्टीतील मुले. वसतिगृहाची 60 मुले . वडील सरकारी किंवा नोकरी करणारी फारतर 10 मुले असतील.

शाळेजवळ रामवाडी नावाची झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीत सारी कष्टकरी माणसे राहायची आणि मुस्लीम मुले मोठ्या संख्येने होती. मुले अभ्यास करायची नाहीत. मोठ्या वर्गातील मुलांच्या वाचन लेखनाच्या समस्या होत्या. त्यात सुधारणा करावी तर मुले खूप गैरहजर राहायची. दुपारी पळून जायची. आईवडील दोघेही कामाला जायची. त्यामुळे त्यांना वाटायचे मुले शाळेत जाताहेत. यावरचा मार्ग पालकांना भेटणे हाच होता. मी शाळा सुटली की गैरहजर मुले व अभ्यास न करणारी मुले यांच्याकडे जायचो. त्या परिसरातील मुलांना घर दाखवायला सोबत न्यायचो. मुले खूप उत्साहाने यायची. माझी सायकल आणि सोबत मुलांची गर्दी असा सीन असायचा.

पहिल्यांदा रामवाडीत असाच गेलो. ज्या घरी आम्ही गेलो तिथले शेजारी पाजारी ही बघायला जमले कोण आलंय? कुणीतरी आपल्या पोरांच्या अभ्यासाची तक्रार घेवून आले आहे हा प्रकारच त्यांना गमतीदार वाटला. पण ज्याक्षणी ती झोपडपट्टी पाहिली, तो क्षण माझ्यातील मध्यमवर्गीय विश्व कोलमडण्याचा होता. प्रायव्हसी आणि व्यक्तीस्वातंत्र्य या कल्पना कुरवाळणारा मी. एकाच खुराड्यात 5 ते 6 व्यक्ती एकत्र राहताना बघत होतो. स्वतंत्र्य बाथरूम ही चैन त्यांना परवडत नव्हती. झोपडीला लागून वाहणाऱ्या गटारीवर पोते बांधून बाथरूम केले होते. की जाता येता कोणीही डोकावून बघू शकत होते. डास आणि माशा सगळीकडे घोंगावत होत्या. मी हे जग पहिल्यांदाच बघत होतो. माझ्या मध्यमवर्गीय जगाशी या जगाशी काहीच नाते नव्हते. हे अभावाचे, वंचिततेचे जग होते. पलीकडे सोरट असा स्वस्त जुगाराचा अड्डा होता. तिथेही गर्दी होती. जमलेल्या गर्दीत दारूचा वास येत होता. याचा अर्थ दारू आणि जुगार सहज उपलब्घ होता. मी मुलांच्या अभ्यासाची तक्रार घेऊन गेलो होतो. पण आता मी त्या मुलांना समजून घेण्याच्या मनस्थितीत आलो. मलाच या मुलांचे पालक व्हावे लागेल असे लक्षात आले.

एकदा एक मुलगी शाळेत आली नाही. वस्तीत गेलो. दिवस पावसाळ्याचे. मी काहीसा वैतागून तिच्या घरी गेलो. चांगले रागवावे असे ठरवलेले पण गेल्यावर सुन्न झालो. तिचे डोळे लाल झालेले. मी विचारायच्या आधी तिची आई म्हणाली ‘सर, अहो कसली शाळा घेवून बसले? रात्रभर पाऊस सुरू होता. आमची घरे गटारीवर बांधलेली. त्या गटारी तुंबल्या की, पाणी मागे मागे सरकत येते आणि घरात उफाळते. रात्रभर आम्ही सगळे पातेल्याने जमिनीतून वर येणारे पाणी उपसून उपसून बाहेर टाकत बसलो होतो.’ हे सार कल्पनेपलीकडचे जग होते. एकीकडे बाहेर पाऊस पडताना कॉफी घेत त्यातील Romantic विश्व बघणारे आपण आणि घराच्या जमिनीतूनच थेट गटारच घरात येणार. कसली झोप आणि कसली शाळा. हे सारे प्रसंग परिणाम करत होते.

त्याचवेळी राष्ट्रपती व खासदार यांचे पगार वाढले. देशभर त्यावर टीका सुरू झाली. मी तेव्हा 27 वर्षांचा होतो. रोज वर्तमानपत्रात ते सारे वाचत होतो. त्याचवेळी पाचवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आंदोलने सुरू झाली. मला खरे तर आपला पगार वाढणार म्हणून आनंद व्हायला हवा पण नाही झाला. उलट राज्याच्या तिजोरीवर 5,000 कोटीचा बोजा पडणार होता. माझ्यात अपराधी भाव तयार होत होता. कर्मचारी मित्र आपला पगार कितीने वाढेल याचा हिशोब मांडत होते. माझा पगार 1,950 रुपये म्हणजे दोन हजाराने वाढणार होता. पण तरीही मला आनंद होत नव्हता. मी विचार करत होतो की जर खासदार त्यांचा पगार वाढवत असतील तर मग मी ही त्या रांगेत उभा आहेच ना? मग मला काय अधिकार पोहोचतो आहे त्यांच्यावर टीका करण्याचा? मी ही देशाची तिजोरी लुटणारा आहेच ना? मी स्वत:लाच दोष देऊ लागलो. तेव्हा केवळ वेतन आयोग चूक आहे म्हणून चालणार नाहीच तर मी त्यातून बाहेर पडलो पाहिजे. कदाचित ही तेव्हाची माझी अनेकांना टोकाची भूमिका वाटेल, पण इतकी टोकाची संवेदनशीलता माझ्यात होती. मी स्वत:ची इतकी कठोर तपासणी करायचो. आज त्या तुलनेत मी खूप बोथट झालो आहे. तेव्हा हे 27 वर्षाचा तरुण हे सारे विचार करत होता हे लक्षात घ्या. त्या वयातील ध्येयवाद भाबडेपणा हा स्वाभाविक होता. त्यात मग मी आपल्याला जितके मिळते तितके असंघटित वर्गाला मिळत नाही, याचा विचार करायचो.

अशी मन:स्थिती असतानाच एक दिवस मला माझा एक विद्यार्थी रस्त्यात भेटला. इम्रान त्याचे नाव. इतक्या मोठ्या वादळी कृतीचे बीज माझा एक विद्यार्थी होता. झोपडपट्टीतला इम्रान नावाचा माझा विद्यार्थी भेटला. साल होते 1998. मी त्याच्या घरची चौकशी केली. घरात तो आई आणि लहान भाऊ होता.वडील वारलेले. तो शाळा करून थोडेफार काम करायचा आणि अवघ्या 400 रुपयात 3 माणसांचे घर तो चालवत होता. मला ते अविश्वसनीय होते. मी त्याला पुन्हापुन्हा तपशील विचारले. किराणा केवढ्याचा होतो? भाजी केवढ्याची होते? रॉकेल किती रुपयाचे आणतो? तो थंडपणे आणि सहजपणे त्याचे बजेट सांगत होता. मी साखर किती रुपयाची आणतो विचारले की तो म्हणायचा ‘आम्ही चहाच पीत नाही.’ मी दवाखान्याचा विषय काढला की, तो म्हणायचा ‘मेडिकलमधून गोळ्या आणतो…’ पुढे बोलण्यासारखे काही नव्हतेच. एवढेसे ते 15 वर्षाचे पोर सारे कुटुंब पेलत होते. या इम्रान ने मला मुळापासून हलवले.

आज 20 वर्षे झाली पण आम्ही रस्त्यावर कुठे उभे राहून बोलत होतो ती जागा, वेळ आणि इम्रानचे हावभाव अजूनही माझ्या डोळ्यासमोर तितकेच लख्ख आहे. मी पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनवाढ घेण्यास विरोध केला. ते प्रकरण महाराष्ट्रात गाजले पण तो निर्णय मी या इम्रान ने दिलेल्या अपराधी भावनेतून आला होता. एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाला जगण्याचे वास्तव शिकवले होते. मध्यमवर्गीय जगाचा परीघ विस्तारून कार्यकर्त्याचे पंख दिले होते.

दिवाळीची सुटी लागली. मी अस्वस्थच होतो. वेतन आयोग चुकीचा आहे, हे सांगताना केवळ विरोध नको तर मी त्या रांगेत नाही हे सांगणे मला गरजेचे वाटते. मला प्रतिज्ञापत्र कसे करतात हे माहीत नव्हते. माझा मित्र राजेंद्र धारणकरने ते करून दिले. मला पाचवा वेतन आयोग देऊ नये, असा मजकूर आम्ही त्यावर लिहिला. विनीत धारणकर व रुपेश मेहता या मित्रांनी सही केली व मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पोस्टाने मी ते पाठवून दिले. दिवाळी संपली. एक दिवस मी गावातील माझे शिक्षक असलेल्या सर्व पत्रकारांना घरी बोलावले व त्या प्रतिज्ञापत्राची झेरॉक्स दिली व एक निवेदन केले. त्यात मी प्रमुख 4 मुद्दे मांडले होते. एक तर प्रशासन खर्च खूप वाढणार आहे. त्यामुळे विकास कामांना पैसे उरणार नाहीत. त्यामुळे प्रशासन खर्च वाढू नये. संघटित व असंघटित वर्ग यात खूप तफावत आहे. असंघटित वर्गाला कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. तेव्हा राष्ट्रपती यांना 16,000 पगार होता, तर मी रोजगार हमीची मजुरी लिहून देशाचा पहिला नागरिक व शेवटचा नागरिक यात किती अंतर असावे? असा प्रश्न विचारला होता व शेवटी आज मी जो मुद्दा मांडतो आहे, तो मांडला होता की जर पगार पेन्शनचा बोजा जर वाढत गेला, तर भविष्यात कोणतेच सरकार कायम कर्मचारी नेमणार नाही व कंत्राटी कर्मचारी नेमले जातील व आपल्या पुढच्या पिढ्यांना नोकरी मिळणार नाही. हे मुद्दे लिहून मी निवेदन दिले.

मला त्यात काहीच विशेष वाटले नाही, कारण मी मला देऊ नको, असे म्हणतो आहे. मी इतरांविषयी काहीच म्हणत नाही. पण माझा अंदाज चुकला. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी ती बातमी पहिल्या पानावर छापली. राज्यभर ती घटना गेली आणि जणू हलकल्लोळ माजला. एकाचवेळी मला कोणी महात्मा ठरवत होते तर कोणी मला गुन्हेगार ठरवत होते. त्या काळात सोशल मीडिया नव्हता .फोन नव्हते. त्यामुळे मी बचावलो.

27 वर्षांचा पोरगा मी. पुरता घाबरून गेलो. गोंधळून गेलो. काय करावे समजेना. कर्मचारी अतिशय वाईट भाषेत बोलू लागले. माझ्या पाठीमागे जरी बोलत होते पण ते मला कळत होते. आता या वयात मी टीकेने हलत नाही, पण त्या वयात मी भेदरलो. टीका वाढायला लागली. नंतर पत्रव्यवहार सुरू झाला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी माझे निवेदन साप्ताहिक साधना मध्ये छापले. त्यातून अनेक मान्यवर कार्यकर्ते यांनी पत्र पाठवले. ते माझे निवेदन गुजराती भाषेत अनुवादित झाले. त्यातून गुजरातमधून पत्र येऊ लागले. हिंदीत गेल्याने विविध राज्यातून पत्र आले. कौतुक करणारी पत्र किमान 250 पेक्षा जास्त होतो. पण त्याचवेळी शिव्या देणारी पत्र ही येऊ लागली. एका पत्रात तर नोकरी सोडून बायकोला वेश्या व्यवसाय करायला लाव, अशी भाषा होती. नोकरी सोड हा सल्ला तर प्रत्येक पत्रात असायचा. शिव्यांचा त्रास व्हायचा, पण हळूहळू त्याला सरावत गेलो.

माझ्या गावाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दशरथ सावंत व दिवंगत प्राचार्य रमेश खांडगे सर त्यावेळी शरद जोशी यांना भेटायला गेले. शरद जोशी यांना त्यांनी हा प्रकार सांगितला.जोशी म्हणाले की, असे असेल तर त्या मुलाचा सत्कार करायला मी तुमच्या गावात येतो. आमच्या गावाच्या महाविद्यालयाने माझा सत्कार आयोजित केला. प्राध्यापक वर्गाने त्यावर बहिष्कार टाकला. भावनिक पातळीवर खूप वाईट वाटत होते, पण त्याचवेळी शरद जोशीसारखा आंतरराष्ट्रीय विचारवंत माझ्यासारख्या 27 वर्षाच्या मुलाच्या सत्काराला आले होते. मी काहीसा भांबावून गेलो होतो. मी भाबडेपणाने भाषण केले. शरद जोशी अतिशय आक्रमकपणे बोलले. नोकरशाहीवर त्यांची टीका अत्यंत भेदक अशी होती.

आमच्या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शरद जोशी यांनी मला जनसंसदेला येण्याचे निमंत्रण दिले. स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाले म्हणून स्वातंत्र्याने काय दिले, यावर अमरावती येथे त्यांनी अधिवेशन आयोजन केले होते. मी हो म्हणालो. मी अमरावती येथे गेलो. माझ्या आयुष्यातील अशा सार्वजनिक व्यासपीठावर मी प्रथमच जात होतो. समोर 25 हजार शेतकरी होते. शरद जोशी यांनी मला बोलायला सांगितले. मी अतिशय आक्रमक रितीने बोललो. शेतकरी टाळ्या वाजवत होते. तेव्हापासून कायमचा मी शेतकरी संघटनेशी जोडलो गेलो. शरद जोशींविषयी कायम प्रेम वाटत राहिले. पुढे त्यांच्या मृत्युपर्यंत जोडलेला होतो. त्यांच्या विचाराने मला बौद्धिक दिशा मिळाली. सुरुवातीला मी भावनिक पातळीवर विचार मांडत होतो. पण शरद जोशींनी मला स्पष्टता दिली. अर्थशास्त्र, खुली व्यवस्था समजली. त्यामुळे मी खुल्या व्यवस्थेचा समर्थक झालो. सरकारी व्यवस्था, पगार आणि कल्याणकारी राज्य याचे वास्तव अभ्यास केल्यावर अधिक उलगडत गेले. त्यातून मी शेतकरी संघटना परिवाराचा घटक बनून गेलो.

त्यानंतर जळगाव, औरंगाबाद येथे माझे सत्कार आयोजित करण्यात आला. पण प्रत्यक्षात आजूबाजूला सतत हेटाळणी सुरूच होती. एकदा एका शाळेत मला परीक्षक म्हणून बोलवावे, असे मुख्याध्यापक म्हणताच संघटना शिक्षकांनी त्यांना अजिबात बोलावायचे नाही असे सांगितले. एकदा शिक्षक प्रशिक्षणाला गेलो. तिथे संघटना शिक्षकांनी भाषणात माझा निषेध केला. एकदा तर प्रशिक्षणात उभे राहून भाषण करू नका, असा विरोध. असे अनेक प्रकार घडायचे. हे दिसणारे प्रकार तरी सोपे पण पाठीमागे वाईट बोलणे सतत सुरू असायचे. तेव्हा माझे लग्न झालेले नव्हते. लग्न जमतानाही हा मुद्दा आलाच. आमच्या मामाने माझ्यासाठी एक मुलगी बघितली. त्या आई वडिलांना माझे खूप कौतुक. पण लग्नाचे विचारताच त्यांनी स्पष्ट नकार दिला. मुलगा व्यवहारी नाही, असा शेरा मारला. असे 3 ते 4 अनुभव आले. बाकी सगळे चांगले आहे पण पगार नको म्हणणारा जावई कोणालाच नको होता. नंतर माझे लग्न झाले. लग्नानंतर मी शाळेत गेलो. लग्नानंतर मी सोलापूर,कोल्हापूर, महाबळेश्वरला गेलो. एक शिक्षक म्हणाला ‘लग्नानंतर फिरण्याचा खर्च गरिबांना का नाही दिला? उगाच कशाला स्वत:साठी खर्च केला.’ हे उदाहरण अशासाठी दिले की, एकदा तुम्ही वेगळी भूमिका घेतली की ताळतंत्र सोडून माणसे व्यक्तिगत आयुष्याचा पंचनामा मांडतात. मला 25 वर्षानंतर त्या शिक्षकाचा तो डंख अजूनही आठवतो आहे आणि विशेष म्हणजे असे बोलणारे लोक काही समाजासाठी काहीही करत नसतात. फक्त बोलत राहणे इतकेच त्यांना येत असते.

मी प्रतिज्ञापत्र दिले पण पगार काही कमी झाला नाही. मी सर्व विभागांकडे अर्ज दिला. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले पण कोणीच निर्णय घेईना. असे दोन महिने झाले. अधिकारी फक्त तोंडी सांगायचे की, असे एका व्यक्तीसाठी वेगळा पगार करता येणार नाही. शेवटी तेव्हाच्या अर्थमंत्री यांनी मला पत्र पाठवले की, ‘आपण जी भावना व्यक्त केली आहे. ती भावना महत्त्वाची व कौतुकास्पद आहे. आपण पगार स्वीकारावा व आवडीच्या कामासाठी खर्च करावा.’ प्रत्यक्ष नगरला ते आल्यावर पत्रकार मित्रांनी त्यांना माझ्यावर प्रश्न विचारला, त्यावेळीही ते असेच म्हणाले. त्यामुळे मग इलाज नव्हता. पगार जमा झाला. दोन पगारात 1,965 रुपये फरक होता. त्यातून मग मी वेगवेगळ्या सामाजिक कामांना मदत देणे सुरू केले. सुमारे 4 लाखांपेक्षा जास्त रक्कम अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यापासून अनेक आंदोलनांना दिली. पण माझा मित्र अशोक सब्बन याने मला थांबवले. तो म्हणाला, अशी क्षुल्लक रक्कम वाटत बसण्यापेक्षा निवृत्तीला जी रक्कम हाती येईल, त्यातून योग्य रक्कम बाजूला काढून आपण सामजिक आंदोलनांना उपयोगी पडेल, असे कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र आपण बांधू या. त्यामुळे सध्या आम्ही त्यावर विचार करत आहोत. त्याहीपलीकडे आता मला पगार घेवून त्यातील काही रक्कम बाजूला देण्यापेक्षा नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता व्हावा असे वाटते आहे. 2028 ला निवृत्ती आहे, पण पुढील वर्षी VRS मी घेतो आहे व पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता व्हायचे असा निर्णय घेतला आहे.

जेव्हा मी पगार घेतला त्यानंतर मग वेगळीच खिल्ली उडवणे सुरू झाले. ‘मग काय घेतला ना पगार…?’ असे भेटेल तिथे विचारणे सुरू झाले. म्हणजे एक तर पगार नाकारण्याची भूमिका घेतली तेव्हा शिव्या आणि दुसरीकडे, पगार घेतला तर त्याची खिल्ली असे एकूण वर्तन होते. मी कुठेही गेलो की, सगळे विषय सोडून यावरच बोलले जायचे. खूप कंटाळून जायचो. तेच प्रश्न आणि तीच उत्तरे. अनेक वर्षे हे सुरू होते. त्यातून मध्यमवर्ग व मी यात काहीसे अंतर कायमचे निर्माण झाले आहे. मी त्या विषयाच्या पलीकडे जाऊन अनेक प्रकारची कामे केली. 11 पुस्तके लिहिली. विविध विषयावर लेखन केले पण अनेकांसाठी हेरंब कुलकर्णी म्हणजे ‘तोच तोच तो पगार नाकारणारा…’ माणूस राहिला. माझ्या छोट्या आयुष्यातील या अनुभवाने मला मोठा फायदा हा झाला की, या घुसळणीतून माझी एक वैचारिक भूमिका नक्की व्हायला मदत झाली. त्यातून मी राज्यातील असंघटित वर्गाच्या आंदोलनांशी कायमचा जोडला गेलो. ‘नाही रे’ वर्गाच्या ‘वेदने’शी मी कायमचा जोडला गेलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!