Mango blossom : आंबा मोहोर व्यवस्थापन करायचे कसे?
1 min read❇️ आंब्यावरील महत्त्वाच्या किडी
आंब्याच्या झाडावर एकूण 125 प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील थोड्याच किडी आंबा मोहाेराचे नुकसान करतात. परंतु, या किडींचे स्वरूप इतके भयानक असते की, वेळीच उपाययोजना केली नाही तर मोहोर गळून जाऊन संपूर्ण पीक हातचे जाते.
❇️ आंब्यावरील तुडतुडे
ही आंब्यांवरील खूपच हानीकारक कीड असून, दरवर्षी मोहाेरावर हमखास आढळून येते. या किडीच्या तीन जाती आहेत. त्यापैकी एकाच जातीचा प्रादुर्भाव फार प्रकर्षाने जाणवतो. या किडीचे पूर्ण वाढ झालेले तुडतूडे पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांची लांबी सुमारे 4 मी.मी. असते. तुडतुडे करड्या रंगाचे असून, डोक्यावर गर्द तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात. आंब्याखेरीज ही कीड मोसंबी वर्गातील फळझाडांवर तसेच चिकू, तुती या वनस्पतीवर आढळून येते.
❇️ नुकसानीचा प्रकार
अपूर्णावस्थेतील तसेच पूर्ण वाढ झालेले हजारो कीटक आंब्याच्या मोहाेरातील कोवळ्या फुटीमधील तसेच लहान फळातील रस शाेषून घेतात. परिणामतः अन्नरस मोठ्या प्रमाणावर शाेषून घेतल्यामुळे मोहोर आणि लहान फळे गळून पडतात. या व्यतिरिक्त हे कीटक मधासारखा चिकट द्रवपदार्थ आपल्या शरीराद्वारे बाहेर टाकतात. त्यावर आर्द्रतेतुळे काळी बुरशी चढते. परिणामतः संपूर्ण झाड काळे पडते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन त्याच झाडाच्या वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. झाडावरील शिल्लक फळांवर काळे डाग पडतात. त्यामुळे फळांचा दर्जा खालावत असून, बाजारपेठेत फळांना योग्य भाव मिळत नाही. या किडीची मादी कोवळ्या फुटीच्या आणि मोहाेराच्या पेशीमध्ये अंडी घालते. अंडी 4 ते 6 दिवसात उबतात व त्यातून पिल्ले बाहेर पडतात. ते पंखरहीत असल्यामुळे वाढू शकत नाही. त्यांची वाढ 1 ते 2 दिवसांत आठवड्यातून पूर्ण होते. या कालावधीत पिल्ले पाचवेळा कात टाकतात. किडीची पूर्ण वाढ 15 ते 20 दिवसांत होते. तुडतुडे आंब्याच्या झाडावर वर्षभर राहतात. हिवाळ्यात आंब्याच्या खोडात ते आश्रय घेतात आणि फांद्यांच्या सालीखाली स्वत:स सुरक्षित करतात. हिवाळ्यात प्रजोत्पादन खूपच कमी असते. परंतु मोहाेरावर प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ही कीड जेव्हा प्रचंड संख्यने वाढत असते, तेव्हा झाडावर चढताना तडतड असा आवाज येतो आणि शरीरातून बाहेर पडत असलेला चिकट द्रव कधीकधी मोहाेरातून खाली पडलेला सुद्धा आढळतो.
❇️ व्यवस्थापन
तुडतुडे वर्षभर आंब्याच्या झाडांवर आढळत असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन / नियंत्रण करणे एक अविभाज्य अंग आहे. मोहोर निघल्यानंतर मोहोरावर कार्बारिल 50 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी तसेच गंधक (300 मेश) प्रत्येकी 20 ग्राम पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा डायमोथोएट 10 मी.ली. किंवा मिथिल डिमेटॉन 8 मि.ली. या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 20 ग्राम गंधकासोबत 10 ते 15 दिवसांच्या अंतराने प्रादुर्भाव आढळून आल्यास फवारणी करावी. फवारणी फाद्यांवर, शेंड्यावर, खोडावर व मोहोरावर दोन आठवड्यांच्या अंतराने केल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
❇️ पेंडा पोखरणारी अळी
ही कीड दुय्यम स्वरुपाची म्हणून समजल्या जाते. या अळीचा पतंग लहान आणि काळसर करड्या रंगाचा असतो. अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पिवळसर दिसते. नंतर तिचा रंग गुलाबी होऊन पांढरे डाग दिसतात. पूर्ण वाढ झालेली अळी 16 ते 18 मि. मी. लांब व 2 ते 3 मि.मी. रुंद असते.
❇️ नुकसानीचा प्रकार
अळी पानाच्या देठातून कोवळ्या फांदीत शिरते आणि छिद्रातून विष्ठा बाहेर पडते. अशी विष्ठा कोवळ्या फांदीवर आढळून आल्यास प्रादुर्भाव झाला असे समजावे. 12 ते 15 दिवस अळी फांदीत उपजीविका करते. परिणामतः फांदी वाळते व कोवळ्या फांदीखेरीज अळी मोहोरावर पण आढळून येते. मोहोर पोखरल्या गेल्यास तो सुकतो आणि मोहोर फुटण्यापूर्वी अळी आंत शिरली तर मोहोर फुटत नाही किंवा मोहोर फुटण्याची क्रिया मंदावते.किडीच्या जीवन क्रमामध्ये मादी पतंग कोवळ्या पानाच्या देठाकडील बाजूस मध्य शिरेजवळ अंडी घालते. 2 ते 3 दिवसांत अंडी उबून त्यातून अळी बाहेर पडते. अळी 1 ते 2 दिवसांत देठ पोखरून कोवळ्या फांदीत शिरते. 10 ते 15 दिवसांत अळीची वाढ पूर्ण होऊन 10 ते 12 दिवस कोषावस्था असते. किडीची एक पिढी 30 ते 33 दिवसांत पूर्ण होते.
❇️ व्यवस्थापन
किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच एन्डोसल्फान किंवा कार्बारिल 0.2 टक्केचा फवारा करावा. किडग्रस्त फांद्या छाटून टाकाव्या व अळीसह नष्ट कराव्या.
❇️ भुरी रोग
हा रोग आंब्याच्या फुलोऱ्यावर आढळून येतो. पिकाच्या फुलोऱ्यावर पांढुरक्या बुरशीची वाढ झपाट्याने होते. परिणामी, फुलोरा गळतो व फळधारणा कमी होते व उत्पादनात घट येते.भुरी रोगास प्रतिबंध घालण्याकरिता आंबा मोहोरावर लक्षणे दिसून येताच पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्राम किंवा डिनोकॉब 10 मि.ली. किंवा ट्रायडेमार्क 5 मि.ली. यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून करावी.