Citrus dieback : लिंबूवर्गीय फळझाडावरील सुत्रकृमीचे व्यवस्थापन कसे कराल?
1 min readमहाराष्ट्राच्या कॅलिफोर्निया म्हणजेच विदर्भात सिट्रस डायबॅक (Citrus dieback) या रोगाच्या प्रादुर्भावामुळे लिंबुवर्गीय फळबागा शेंड्यांकडून सुकत जाऊन त्याचे उत्पन्न हळूहळू प्रत्येक वर्षी कमी कमी होत आहे. या रोगास ‘आरोह’ असे संबोधतात. हा रोग निरनिराळ्या कारणांमुळे होतो. पैकी लिंबूवर्गीय फळझाडावरील सुत्रकृमी (टायलेनकुलस सेमीपेनेट्रन्स – Tylenculus semipenetrans), विषाणू (virus) वाहून नेणारे कीटक (insect), बुरशी (fungus), अनुजीव (alive), मायक्रोप्लाझमा (Microplasma) आणि विषाणू (virus) हे या रोगास कारणीभूत आहे, असे आढळून आले आहे.
सद्यपरिस्थितीत हा रोग अमरावती जिल्ह्यातील वरूड व मोर्शी तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्वर, या तालुक्यांमध्ये माेठ्या प्रमाणात आढळून येत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी अत्यंत तातडीची उपाययोजना करणे जरुरीचे आहे. लिंबूवर्गीय फळझाडावरील सुत्रकृमीमुळे फळांच्या उत्पादनात जवळजवळ 15 टक्के घट येते.
सुत्रकृमी हा जमिनीत राहणारा अतिसूक्ष्म दोऱ्यासारखा प्राणी आहे. त्याची लांबी 0.2 ते 0.5 सें. मी. असतो. तो जमिनीत अगर झाडाच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करीत असल्याने त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानीकडे आतापर्यंत फारसे लक्ष देण्यात आले नाही.
❇️ जीवनक्रम
या सुत्रकृमीमध्ये नर आणि मादी असे दोन्ही प्रकार दिसून येत असले तरी नराच्या मीलनाशिवाय प्रजोत्पत्ती होऊ शकते. मादी सरासरी 90 ते 100 अंडी चिकट पदार्थाच्या वेष्टनात पुंजक्या पुंजक्याने घालते. अंडी लंबाकृत असून, त्यास पातळ कवच असते. अंडी आठ दिवसात उबतात. परंतु 24 अंश सेल्सिअस तापमानात अंडी उबलण्याकरिता 12 ते 14 दिवसाच्या कालावधी लागतो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या दाेन प्रकारच्या असतात. आखुड आणि जाड अळ्या पूर्ण वाढीनंतर नर बनतात तर लांबट पातळ अळ्या माद्या बनतात. नर आणि मादी अळ्याची वाढ चार अवस्थांमध्ये पूर्ण होते. मादीचा जीवनक्रम दीड ते दोन महिन्यांचा असतो. मादी 5 वेळा कात टाकते. नराचा आयुष्यकाळ 14 ते 16 दिवसांत पूर्ण होतो. प्रथम अवस्थेतील अळ्यांमध्ये तोंडतील सुईसारखा सुक्ष्म आणि तीक्ष्ण अवयव येत नाही. दुसऱ्या अवस्थेत हा अवयव आढळतो. पूर्णावस्थेतील नरांची लांबी 0.306 ते 0.401 मि. मी. असते. जनन इंद्रियांची पूर्ण वाढ झालेली मादी काजूच्या बियासारखी असते.
❇️ नुकसानीचा प्रकार
दुसऱ्या अवस्थेतील मादी अळी पिकांना उपद्रवी बनवते. या सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात जास्त दिसून येते. ही अळी तोंडातील तोंडतील सुईसारखा सुक्ष्म अवयव मुळांच्या सालीत खुपसून सालीला जखम करून आंतर भागातील अन्नद्रव शोषून घेते. याच अवयवाद्वारे आपल्या पोटातील विशिष्ट प्रकारचा विषारी द्रव झाडात सोडते. त्यामुळे मुळातील पेशी मरण पावतात. त्या मुळाचे विस्तार तपकिरी काळसर पडते. परिणामी, मुळांच्या अन्नशाेषण कार्यात अडथळा निर्माण होऊन झाडाची वाढ खुंटते. नंतर पाने पिवळी पडून गळतात. फळाचा आकार लहान होतो. ती पक्क होण्या अगोदर उपद्रवामुळे लिंबूवर्गीय फळझाडे शेंड्यापासून खोडाकडे सुकतात व परिणामी पाने गळतात. यालाच आरोह (सिट्रस डायबॅक) असे म्हणतात. या व्यतिरीक्त स्प्रिंग सुत्रकृमी मुळावर गाठी निर्माण करणारे सुत्रकृमी, लिंबूवर्गीय फळझाडांवर आढळतात. तथापि, त्यामुळे फारसे नुकसान होत नाही.
❇️ व्यवस्थापनाचे उपाय
✳️ शक्यतो निर्जंतुक रोपवाटिकेत वाढलेली रोपे लागवडीकरिता वापरावी.
✳️ रोपे लावताना ती सुत्रकृमीला प्रतिकारक असलेल्या झाडापासून केलेली आहे. याची खात्री करून घ्यावी.
✳️ लागवडी अगोदर रोपांची मुळे गरम पाण्यात (450 सेंटीमीटर) सुमारे 25 मिनिटे किंवा फेनसल्फोथिऑनच्या 0.07 टक्के द्रावणात बुडवावी.
✳️ सुत्रकृमीचे प्रादुर्भाव जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याच्या जास्त प्रमाणात असते. अशावेळी कार्बोफ्युरॉन 3 टक्के दाणेदार हेक्टरी 30 ते 35 किलो या प्रमाणात झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीने 15 सें. मी. खोलीवर टाकून मातीने झाकून नंतर पिकास पाणी द्यावे.
✳️ झेंडू, सदाफुली आणि शेवंती यासारखी फूलझाडे वाफ्यात लावली तर सुत्रकृमीस प्रतिबंध होतो.
✳️ सूत्रकृमीच्या व्यवस्थापणाकरिता निंबोळी अथवा करंजीच्या पेंडींचा प्रति हेक्टरी 1,500 किलो या प्रमाणात वापर करावा. त्यामुळे नियंत्रणाबरोबर जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते.
✳️ पाच वर्षावरील संत्रावर्गीय झाडाकरीता 750 ग्राम ते 1 किलो निंबोळी चुरा झाडाच्या भोवती बांगडी पद्धतीने 15 सें. मी. खोलीवर टाकून मातीने झाकून नंतर पिकास पाणी द्यावे.