krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agricultural land documents : शेतजमिनीच्या कागदपत्रांबाबत उपयुक्त माहिती

1 min read
Agricultural land documents : शेतकऱ्यांसह नागरिकांना त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा, गाव नमुना आठ अ, नकाशा यासह इतर कागदपत्रांची (Agricultural land documents) आवश्यकता भासते. शिवाय शेतजमिनीच्या माेजमापाबाबत माहिती हवी असते. त्यामुळे या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न!

❇️ शेतजमिनीचे माेजमाप
1 हेक्टर = 10,000 चौरस मीटर.
1 एकर = 40 गुंठे
1 गुंठा = 33 फुटx33 फुट = 1,089 चौरस फुट
1 हेक्टर= 2.47 एकर = 2.47×40 = 98.8 गुंठे
1 आर = 1 गुंठा
1 हेक्टर = 100 आर
1 एकर = 40 गुंठे x (33×33) = 43,560 चौरस फुट
1 चौरस मीटर = 10.76 चौरस फुट

❇️ 7/12 (सातबारा) वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असते. त्याचा अर्थ पीक लागवडीसाठी योग्य नसलेले क्षेत्र. परंतु, ते मालकी हक्कात मात्र येते.
❇️ नमुना नंबर 8 म्हणजे एकूण जमिनीचा दाखला. यामध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील (तलाठी साझा) मधील जमिनीचे एकूण क्षेत्राची यादी असते.
❇️ जमिनीची ओळख ही त्याच्या तलाठ्यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात.

❇️ ग्रामपंचायत
ग्रामपंचायत एक स्वराज्य संस्था जिथे घटनेच्या चौकटीत राहून स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते, याबाबत ही माहिती.

❇️ गाव नमुना नंबर-1
या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो. ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात तसेच जमिनीचा आकार (ॲसेसमेंट) बाबतची माहिती असते.

❇️ गाव नमुना नंबर-1 अ
या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

❇️ गाव नमुना नंबर-1 ब
या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-1 क
या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादारांना दिलेल्या जमिनीबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

❇️ गाव नमुना नंबर-1 ड
या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-1 इ
या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-2
या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-3
या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.

❇️ गाव नमुना नंबर-4
या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-5
या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-6 (हक्काचे पत्रक किंवा फेरफार)
या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला, याची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-6 अ
या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-6 क
या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-6 ड
या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-7 (7/12 उतारा)
या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार इतर बाबतीची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर 7 अ
या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-8 अ
या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-8 ब, क व ड
या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-9 अ
या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-10
या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-11
या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-12 व 15
या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-13
या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-14
या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-16
या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-17
या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-18
या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडळ अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

❇️ गाव नमुना नंबर-19
या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-20
पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

❇️ गाव नमुना नंबर-21
या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

®️ संकलन
राजेंद्र अटकळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!