krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Caring for Orchards : शेतकऱ्यांनाे, फळ आणि फळबागांची काळजी कशी घ्यायची?

1 min read
Caring for Orchards : विदर्भासह महाराष्ट्रातील हवामान, विविध प्रकारच्या जमिनी व पाणी यांच्या अनुकूलतेनुसार आंबा, केळी, पपई, पेरू, डाळिंब, चिकू तसेच संमेक व लिंबू इत्यादी पिकांची निरनिराळ्या भागात लागवड केली आहे. त्यापैकी केळीचे पीक अल्पकालावधीचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या प्रकोपापासमन संरक्षण मिळण्याकरिता फळबागायतीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

🌐 आंबा
✳️ जानेवारी महिन्यात अतिशय थंडी असल्यामुळे व याच काळात आंब्याचा बहार किंवा फुलोरा येतो. थंडीमुळे मोहोरावर भुरी व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होते. फुलोरा असतांना फुलोऱ्यावर पांढुरकी बुरशीच्या उपद्रवामुळे फुलोरा गळुन फळधारणा कमी होते. अशी लक्षणे आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा ट्रायडोमार्फ 5 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

✳️ तुडतुडे आंब्याच्या पानामधील रस शोषून घेतात व त्यामुळे पानावर चिकट व तांबूस द्रवरूप पदार्थ दिसू लागतो. कालांतराने कालांतराने त्यावर काळजी धरते. त्यामुळे पाने सुकुन गळतात. त्यामुळे तुडतुड्यांच्या नियंत्रणाकरिता 200 लिटर पाण्यात 500 मि. लि. मॅलेथिऑन 100 लिटर पाण्यात किंवा कार्बारिल 200 ग्राम 100 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे. नंतर प्रादुर्भाव आढळून आल्यास पुन्हा दोन दोन आठवड्यांनी 3 ते 4 वेळेस फवारणी करावी.

✳️ खोडकिड्यांच्याप्रादुर्भावामुळे खोडावर छिद्रे व खोडाच्या लहान भेगात भुसा आढळून येतो. अशा ठिकाणी साल पटाशीने काढावी व त्याचा नायनाट करावा. पेट्रोलमध्ये बुडविलेले कापसाचे बोळे छिद्रात ठेवून छिद्र ओल्या मातीने बंद करावे. सडलेल्या व कुजलेल्या फांदा तोडून त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाचा लेप लावावा. झाडावर बांडगुळ आढळल्यास कापून काढावे. फळे काढल्यानंतर रोग स्वरुपाचा फुलोरा झाडावर आढळल्यास तोडणे आवश्यक आहे.

🌐 केळी
केळीच्या चांगल्या वाढीसाठी मातृवृक्षापासून निघणारे इतर मुनवे काढून टाकावे. कारण ते मुनवे मुळ फळझाडातून अन्नद्रव्य शाेषून घेते. परिणामतः मुख्य झाडाची वाढ खुंटते. खोडाभोवती मातीचा थर द्यावा. उंच वाढणाऱ्या खोडासाठी एकच खाेड ठेवावे. फळधारणा झाल्यानंतर केळीफूल कापून टाकावे. केळीची लागवड थंडीमध्ये करू नये. केळीच्या बागेचे संरक्षण ऊन व थंडीपासून करणे अगत्याचे आहे. उन्हामुळे केळीची सूर्यप्रकाशाकडील उघड्या भागावरील साल वाळते व काळी पडते. त्याकरिता केळीचे घड वाळलेल्या पानाने पूर्णपणे झाकून टाकणे अगत्याचे आहे. थंडीपासून बागेचे संरक्षण करण्याकरिता बागेस ओलीत द्यावे. रात्री बागेत शेकोट्या पेटवाव्या. वाऱ्यापासून संरक्षण देण्याकरिता उंच झाडांना बांबूचा आधार द्यावा.

🌐 पेरू
फळधारणेकरिता फेब्रुवारी ते मे याकालावधीत पेरू पिकास ओलित देणे बंद करावे. पाणी देण्यापूर्वी अथवा पावसाळ्यापूर्वी प्रत्येक झाडास 5 ते 8 टोपल्या कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत आणि 500 ग्राम नत्र, 250 ग्राम स्फुरद व 250 ग्रॅम पालाश द्यावे. कँकर रोगापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी उपसर्ग झालेल्या झाडाचा भाग व फळे काढून नष्ट करावी. त्यावर 4:4:50 बोर्डो मिश्रणाचा किंवा इतर ताम्रयुक्त औषधांचा फवारा 15 दिवसाच्या अंतराने करावा.

🌐 पपई
पावसाळ्यात लागवड झालेल्या झाडांना या वेळेस फुले येण्यास सुरुवात होते. फुले आलेल्या झाडांना 1 टक्का पुंकेसर फुले आलेली झाडे संकरणासाठी ठेवून इतर झाडे (पुंकेसर फुले आलेली ) काढून टाकावी. प्रत्येक झाडास 4 किलो शेणखत व 8 महिन्यापर्यंत 50 ग्राम एन.पी.के. प्रति झाडास देणे आवश्यक आहे. जास्त फळधारणा झाली असल्यास लहान लहान निकृष्ट फळे काढून टाकावी. बुरशीपासून पपईच्या झाडाचे डायमेथोएट अधिक बाव्हीस्टिन वापरून पीक संरक्षण करावे.

🌐 डाळिंब
डाळिंबाचे पीक घेण्याकरिता डळिंबावरील एक बहार निश्चित करावा. फुलोरा येण्यापूर्वी 2 ते 3 महिन्याआधी झाडास ताण देणे आवश्यक आहे. प्रत्येक झाडास 30 ते 40 किलो शेणखत व 625 ग्राम नत्र, 250 ग्राम स्फुरद व 250 ग्राम पालाश ताण देण्यापूर्वी द्यावे. खोडकिडांचा बंदोबस्ता आधी नमुद केल्याप्रमाणे करावा. डाळिंबावरील अळीचा (सुरसा ) बंदोबस्त करावा. फळधारणा होण्याच्या मोसमात पाण्यात विरघळणारी कार्बारील 50 टक्के, भुकटी ग्राम, 10 लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी. थंडीपासून बागेचे संरक्षण करण्याकरिता बागेस ओलीत द्यावे. म्हणजे बागेचे उष्णतामान कमी होत नाही.

🌐 चिकू
या सुमारास चिकू परिपक्व झालेले असतात. त्यासाठी बागेची नांगरट करून बाग ताणविरहीत ठेवावी. आंतरपीक घेतले असल्यास त्याची काढणी करावी. खोड किडीचा उपद्रव असल्यास कीटकनाशकाची फवारणी करून झाडाचा किडीपासून बचाव करावा. पाने कुरतडणा-या अळींचा बंदोबस्त करण्याकरिता मिथिल डेमेटॉनची फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करून किडीचा बंदोबस्त करावा.

🌐 लिंबूवर्गीय फळे
संत्री, मोसंबी, कागदी लिंबे या फळपिकांची फळधारणा वर्षातून तीन हंगामामध्ये होते. यासाठी निश्चित ठरलेल्या हंगामात फळपिकांची फुलोरा येण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे या पिकास ताण देणे आवश्यक आहे. फुलोरा येण्यापूर्वी 50 किलो चांगले कुजलेले शेणखत व 2 ते 3 किलो अमोनियम सल्फेट किंवा 1 किलो नत्र व अर्धा किलो स्फुरद फळधारणा होत असलेल्या झाडास द्यावे. तसेच फळधारणा झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 किलो अमोनियम सल्फेट द्यावे. खोडाचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्याकरिता बोर्डोपेस्टचे द्रावण किंवा ताम्रयुक्त औषधाचा थर खोडाला ज्या ठिकाणापासून मुळे फुटतात, तेथून 1 मीटर उंचीवर लावावा. नवीन पालवीवर पांढऱ्या किंवा काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, डायमेथोएट किंवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 20 मि.मि व त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम मिसळून 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. लिंबाच्या झाडावर कँकर किंवा खैऱ्या (फळे, पाने व देठावर फिक्कट तपकिरी/नारंगी रंगाचे ठिपके) रोगापासून झाडाचे संरक्षण करण्याकरिता जास्त रोगट पाने, फांद्या व फळे काढून टाकावीत व वेळोवेळी झाडावरील भर वेळोवेळी काढून टाकावा. तसेच अनुक्रमे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व फेब्रुवारी या महिन्यात चार फवारण्या कराव्या. सर्वप्रथम 0.3 टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी करावी. त्यानंतर 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन (100 पी.पी.एम) अधिक 30 ग्रॅम (0.3 टक्के) कॉपर ऑक्सिक्लोराईडची 10 लिटर पाण्यात मिसळून वरील प्रमाणे चार फवारण्या कराव्या. खोडवर एंडरबेला खोड किडा किंवा जाळी आढळल्यास काढून टाकावी. खोडाच्या छिद्रामध्ये पेट्रोल 5 मि. लि. टाकून त्यावर मातीचा लेप द्यावा.
या नुसार फळबागेची हिवाळ्यात (थंडीत ) काळजी घेणे फळ बागायतदारांचे तसेच तसेच फळबाग निर्मात्याचे आणि शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे.
✳️ वरीलप्रमाणे काळजी घेतल्यास फळांचे नुकसान होणार नाही व योग्य देखरेखीमुळे फळबागेचे आयुष्य निश्चित वाढून फळ उत्पादनात वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!