krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Gandhi Baba Yatra : गांधीजींच्या नावाने यात्रा भरवणारं देशातलं अनोखं गाव… उजेड त्याचे नाव…..!!

1 min read
Gandhi Baba Yatra : ए मेरे वतन के लोगो.. जरा आंखो में भरलो पाणी.. जो शहिद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी... ह्या गाण्याचे बोल ऐकल्यानंतर डोळे भरून येतात... मनात कृतज्ञतेचा भाव दाटून येतो...अन सगळं वातावरण चैतन्याने भरून आणि भारून जातं... तो प्रसंग असतो, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे महाराष्ट्र दिन किंवा मराठवाड्यात 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन... हे दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञतेच्या भावनेनी साजरा करतो... पण असं एक गाव लातूर जिल्ह्यात आहे.. त्या गावाचे नाव 'उजेड' आहे. त्यागावात 24 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत "राष्ट्रपिता महात्मा गांधी बाबा यात्रा महोत्सव" असतो.

पाच दिवस हे गाव राष्ट्रप्रेमाने न्हाऊन निघतं…. गावाला पूर्ण यात्रेचे रुप येतं.. यात्रेनिमित्त घरोघरी पावणे – रावळे येतात… लेकी बाळी येतात.. 24 ला महात्मा गांधीजींच्या मूर्तीची स्थापना होते… त्या दिवशी सर्व रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर होते.. येणारी प्रत्येक व्यक्ती मूर्तीला हार घालून नमस्कार करतो.. गावात जागोजागी मिठाईचे दुकाने थाटली जातात… जेलबी तर क्विंटलने विकली जाते…टिपिकल यात्रेत दिसणारे वेगवेगळे रहाट पाळणे… स्पिकरवर देशभक्तीपर गीतं. एकूणच राष्ट्रप्रेमाच्या चैतन्याने बहरलेलं वातावरण….

🌐 ही परंपरा कशी आणि कधी सुरू झाली
गावातले लोकं सांगतात, स्वातंत्र्यपूर्व काळी गावात पीराची यात्रा भरायची. 1948 ला हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पोलीस ऍक्शन नंतर ही यात्रा बंद झाली. 1950 ला देश प्रजासत्ताक झाल्यानंतर या गावातील लोकांनी एकत्र येऊन यात्रेबाबत मंथन केले. त्यातून गावात पुन्हा यात्रा सुरु करायची तर मग कोणाच्या नावाने… सर्वांना मान्य असलेलं नाव ठरलं महात्मा गांधी… आणि तारीख ठरली 26 जानेवारीचा आठवडा… अन नाव ठरले “महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव” त्यानुसार 26 जानेवारी 1951 पासून या आगळ्या वेगळ्या यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी गावचे पहिले सरपंच शिवलिंग स्वामी. त्या काळातील गावची असामी चांद पटेल, रामराव रेड्डी, गोविंद मास्तर, माधवराव जाधव, विश्वंभरराव पाटील, अण्णाराव बिराजदार, गोविंदराव चिमनशेट्टे, व्यंकटराव ढोबळे, अंबादास जाधव या सर्व गावकऱ्यांनी ठरवले.. ना कोण्या देवाची, ना कोण्या धर्माची, आपण लोकशाहीची यात्रा महात्मा गांधी बाबांच्या नावाने 26 जानेवारीला सुरू करायची. तेव्हापासून मधले कोविडचे दोन वर्षे अपवाद सोडून, सगळे गाव एकत्र येऊन सार्वजनिक रित्या वर्गणी गोळा करून ही जत्रा करत असते. येणारा प्रत्येक माणूस महात्मा गांधीच्या मूर्ती समोर नतमस्तक होतो. यात्रेत जाऊन जिलेबी खातो. या यात्रेत 50 ते 60 क्विंटल साखरेची जिलेबी विकली जाते, असे ग्रामस्थ सांगतात. सातारा शहरात पण 26 जानेवारीला रस्त्या रस्त्यावर जिलेबीचे स्टॉल लागतात. प्रजासत्ताक दिन म्हणजे जेलबी खाऊन तोंड करायलाच हवं. अशी जणू परंपराच इथे पडलेली आहे. 26 जानेवारीला देशभर प्रचंड उत्साह असतो. देशभक्तीचे स्फूरण असते. पण, उजेड सारखा उत्सव देशात कुठेच होत नाही.

🌐 पाच दिवस असते कार्यक्रमाची रेलचेल
✳️ यावर्षीच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात 23 जानेवारी रोजी ग्रामस्वच्छतेने झाले. 24 जानेवारी रोजी महात्मा गांधीच्या मूर्तीची स्थापना झाली, त्यानंतर सर्व रोग निदान व उपचार शिबिर, रक्तदान शिबिर झाले. बुधवार दि. 25 जानेवारी रोजी शालेय क्रीडा स्पर्धा व भजन ( दरवर्षी पशु चिकित्सा होते. पण, यावर्षी लंम्पिमुळे रद्द केल्याचे सांगितले.)
✳️ 26 जानेवारी रोजी झेंडावंदन प्रभात फेरी, संगीत वाद्य गायन व बक्षीस वितरण, रात्री 9 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम, 27 जानेवारीला जंगी कुस्त्याचे सामने, रात्री सेवालय संस्थेच्या वतीने हॅपी म्युझिक शो आणि 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून यात्रेचा समारोप होतो.
✳️ उजेड म्हणजे प्रकाश पेरणारे गाव.. लोकशाहीचा महोत्सव करणारे गाव.. गेली 71 वर्षे अविरतपणे गावपातळीवर 8 हजार लोकसंख्या असलेल्या गावात अशी जत्रा भरते म्हटलं तर खरं वाटणार नाही… एकबार अनुभव घ्या आणि गांधी बाबाच्या जत्रेला जाच..
✳️ लातूर शहरापासून 60 किलोमीटर एवढ्या अंतराव उजेड ( हिसामाबाद ) हे गाव येते…. एक आगळावेगळा अनुभव आहे.. एक गाव लोकशाहीचा आनंदोत्सव गेली सात दशक साजरा करत आहे.. हे प्रचंड आनंद देणारी गोष्ट आहे.
✳️ भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…!!
✳️ जय हिंद…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!