Cotton Import : दर दबावात ठेवण्यासाठी कापूस आयात वाढविली
1 min read🌍 आयात 9.77 लाख गाठींनी वाढली
सन 2020-21 च्या कापूस वर्षात (1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर) एकूण 14.५३ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आली हाेती. सन 2021-22 च्या हंगामात ही आयात 9.77 लाख गाठींनी (1 गाठ 170 किलाे रुई) वाढून 24.30 लाख गाठींवर पाेहाेचली. विशेष म्हणजे, सन 2020-21 च्या हंगामातील कापसाची आयात प्रत्येक महिन्यात थाेड्याफार फरकाने सारखी हाेती. आयातीचा हा फरक सन 2021-22 मधील मे-2022 पर्यंत कायम हाेता. या हंगामातील पहिल्या आठ महिन्यात म्हणजेच 1 ऑक्टाेबर 2021 ते 31 मे 2022 या काळात 9.18 लाख गाठींची तर शेवटच्या चार महिन्यात म्हणजेच 1 जून ते 30 सप्टेंबर 2022 या काळात 16.12 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आली. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टाेबर 2022 या काळात कापसावरील 11 टक्के आयात शुल्क तात्पुरता रद्द करण्यात आल्याने भारतीय कापड उद्याेजकांनी कापसाच्या आयातीचा सपाटा लावली हाेता.
🌍 आधीच साठा, त्यात ऑस्ट्रेलियन कापसाची भर
विशेष म्हणजे, दरवर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन कापूस बाजारात यायला सुरुवात हाेते. याच काळात कापसाची आयात वाढविण्यात आली. 1 ऑक्टाेबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळात कापूस व सूत तुटवड्याच्या खाेट्या बाेंबा ठाेकत कापड व गारमेंट उद्याेजकांनी 24.30 लाख गाठी कापसाची आयात करून पुरेसा साठा (stock) केल्याने कापसाच्या मागणीत (Demand) घट हाेणे स्वाभाविक हाेते. त्यामुळे कापसाचे दर सुरुवातीपासून दबावात राहिले. यात ऑस्ट्रेलियन कापसाने भर टाकली. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापारी करारानुसार भारतीय कापड उद्याेगांना ऑस्ट्रेलियातून 3 लाख गाठी कापूस आयात करण्याची मुभा देण्यात आला. आयातदारांना (Importer) या कापसावर 11 टक्के आयात शुल्क (Import duty) द्यावा लागणार नाही. हा कापूस पिमा व गिझा (28 मिमी लांब धागा) प्रकारातील आहे. त्यामुळे भारतातील सुविन, डीसीएच व तत्सम लांब धाग्याच्या दर्जेदार मजबुती व शुभ्रता असलेल्या कापसाच्या दरावर परिणाम झाला आहे.
🌍 सन 2020-21 च्या हंगामातील कापसाची आयात (आकडे गाठीत – 1 गाठ 170 किलो रुई)
❇️ ऑक्टोबर 2020 – 1.04
❇️ नोव्हेंबर 2020 – 0.86
❇️ डिसेंबर 2020 – 1.15
❇️ जानेवारी 2021 – 1.72
❇️ फेब्रुवारी 2021 – 1.06
❇️ मार्च 2021 – 1.21
❇️ एप्रिल 2021 – 1.02
❇️ मे 2021 – 1.24
❇️ जून 2021 – 1.60
❇️ जुलै 2021 – 1.37
❇️ ऑगस्ट 2021 – 1.03
❇️ सप्टेंबर 2021 – 1.24
❇️ एकूण – 14.53
🌍 सन 2021-22 च्या हंगामातील कापसाची आयात (आकडे गाठीत-1 गाठ 170 किलो रुई)
❇️ ऑक्टोबर 2021 – 1.09
❇️ नोव्हेंबर 2021 – 1.80
❇️ डिसेंबर 2021 – 1.07
❇️ जानेवारी 2022 – 0.81
❇️ फेब्रुवारी 2022 – 0.81
❇️ मार्च 2022 – 1.07
❇️ एप्रिल 2022 – 0.94
❇️ मे 2022 – 1.59
❇️ जून 2022 – 2.17
❇️ जुलै 2022 – 3.20
❇️ ऑगस्ट 2022 – 5.13
❇️ सप्टेंबर 2022 – 5.62
❇️ एकूण – 24.30
(माहिती स्रोत – केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्रालय)
🌍 कापसाचा वापर कमी करण्यावर भर
सन 2021-22 च्या हंगामात देशात 315.32 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाल्याचे काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाने (Cotton Association of India) त्यांच्या काॅटन बॅलेन्स शीटमध्ये (Cotton Balance Sheet) नमूद केले आहे. वास्तवात या हंगामात बाजारात 307.60 लाख गाठी कापसाची आवक झाली. या हंगामात 15 लाख गाठी कापसाची आयात तर 40 लाख गाठींची निर्यात (Export) करण्यात आली. या हंगामातील कापसाचा वापर (consumption) 315 लाख गाठींचा दाखविण्यात आला. सन 2022-23 च्या हंगामातील कापसाचा क्लाेसिंग स्टाॅक (Closing stock) वाढविण्यासाठी कापसाचा वापर कमी करून त्याला पर्याय म्हणून पाॅलिस्टरच्या धाग्यांचा (Polyester yarn) वापर करणार आहे.
🌍 शिल्लक साठ्याचा वापर दर पाडण्यासाठी
सन 2022-23 च्या हंगामात कापसाची आयात आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. तुलनेत कापसाची निर्यात हाेताना अथवा वाढताना सध्या तरी दिसून येत नाही. देशात सन 2021-22 च्या हंगामामध्ये कापसाचा ओपनिंग स्टाॅक (Opening stock) 71.84 लाख गाठींचा तर क्लाेसिंग स्टाॅक 47.16 लाख गाठींचा असल्याचे काॅटन आसाेसिएशन ऑफ इंडियाने त्यांच्या काॅटन बॅलेन्स शीटमध्ये नमूद केले आहे. म्हणजेच सन 2022-23 च्या हंगामातील कापसाचा ओपनिंग स्टाॅक 47.16 लाख गाठींचा सीएआयने दाखविला. या हंगामात कापसाचे उत्पादन घटणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. मागील दाेन वर्षांपासून कापसाचे चढे दर टेक्सटाईल आणि गारमेंट इंडस्ट्रीजला खुपत असल्याने दर नियंत्रित ठेवण्यासाठी फ्यूचर मार्केटमधील कापसाच्या साैद्यांवर तात्पुरती काही हाेईना बंदी घालण्यात आली. कापसाची माेठ्या प्रमाणात निर्यात हाेणार नाही, याची देखील काळजी घेतली जात आहे. कापसाची किमान 50 लाख गाठींची निर्यात झाली नाही तर सीएआय सन 2022-23 च्या हंगामातील क्लाेसिंग आणि सन 2023-24 च्या हंगामातील ओपनिंग स्टाॅक हा किमान 50 ते 55 लाख गाठींची दाखवेल. कापसाच्या याच शिल्लक साठ्याचा वापर (Carry forward stock) सन 2023-24 च्या हंगामातील कापसाचे दर पाडण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी सावध राहणे तसेच कापसावरील वायदेबंदी हटविणे व निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.