krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton rates, SEBI, CCI : कापसाचे दर पाडण्यासाठी ‘सेबी’ व ‘सीसीआय’चा वापर!

1 min read
Cotton rates, SEBI, CCI : मुक्त आयात (Free import), निर्यात व वायदे बंदी (Export and futures ban), स्टाॅक लिमिट (Stock limit)चा वापर करून देशांतर्गत बाजारातील शेतमालाचे दर पाडणे, हा केंद्र सरकारचा उपद्व्याप नवीन नाही. शेतमालाचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकार अत्यावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act), विदेश व्यापार कायदा 1992 (Foreign Trade Act), विदेश व्यापार नीती 2015-2020 (Foreign Trade Policy) चा नेहमीच वापर करते. सध्याच्या हंगामात (सन 2022-23) कापसाचे उत्पादन कमी व खर्च अधिक असल्याने तसेच सन 2021-22 च्या हंगामात कापसाला 10,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने यावर्षी किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा बाळगत शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. मात्र, केंद्र सरकारने कापसाची दरवाढ (Cotton rates) राेखण्यासाठी सेबी (SEBI) आणि सीसीआय (CCI) चा पद्धतशीर वापर करून खुल्या बाजारातील कापसाचे दर दबावात आणले आहेत.

🌍 दरवाढीच्या विराेधाची पार्श्वभूमी
सन 2021-22 च्या हंगामात कापसाचे 9,000 रुपये प्रति क्विंटलची पातळी ओलांडायला सुरुवात करताच तिरुपूर एक्स्पाेर्टर असाेसिएशन (TEA – Tiruppur Exporters Association), साऊथ इंडिया मिल्स असाेसिएशन (SIMA – South Indian Mills Association)च्या पदाधिकाऱ्यांनी कापसाचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला हाेता. त्यावेळी त्यांनी सीसीआयने किमान आधारभूत किमतीने कापसाची खरेदी करावी, वायदे बाजारातील कापसाच्या साैद्यांवर बंदी घालावी, 11 टक्के आयात शुल्क रद्द करावा आदी महत्त्वाच्या मागण्या रेटून धरल्या हाेत्या. यासाठी दाेन्ही असाेसिएशनने त्यांचे युनिट बंद ठेवून आंदाेलन देखील केले हाेते. मात्र, त्यावेळी केंद्र सरकारने काेणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे कापसाच्या दराने कमाल पातळी गाठली हाेती. सन 2022-23 च्या हंगामात कापसाचे दर सुरुवातीपासून चढे राहिले. कापड उद्याेजकांनी या दरवाढीला उघड उघड विराेध करण्याऐवजी काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया (CAI – Cotton Association of India)ला हाताशी धरून दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला आणि त्यांना यात बऱ्यापैकी यश आले.

🌍 सेबीची निर्मिती आणि उद्देश
सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI – Securities and Exchange Board of India)ची स्थापना 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी गैर-वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली. 12 एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली. केंद्र सरकारने सेबी कायदा 1992 ला मंजुरी देऊन सेबीला वैधानिक अधिकार दिले. कंपन्या/संस्था यांना आपल्या प्रतिभूतींच्या (शेअर्स, डिबेंचर्स इत्यादी) विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे, वायदे बाजाराचे संवर्धन करणे, गुंतवणूकदारांचे हित संरक्षण करणे, सर्व रोखे बाजाराच्या व्यवस्थापनाचे परिणामकारक नियमन करणे, रोखे बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक, योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, रोखे बाजारांचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वांवर चालण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हा सेबीच्या निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. कमाेडिटी मार्केट (Commodity Market) सेबीच्या अधिपत्याखाली कार्य करते.

🌍 कापसाच्या वायद्यांवर बंदी
सन 2021-22 च्या हंगामात कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी फ्यूचर मार्केटमधील कापसाच्या साैद्यांवर बंदी घालण्याची मागणी जरी करण्यात आली हाेती. तरी, त्यावेळी ती मागणी गांभीर्याने घेण्यात आली नव्हती. 26 ऑगस्ट 2022 राेजी सेबीच्या मुंबई स्थित कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कापसाच्या एमसीएक्स या एक्स्चेंजवरील जानेवारी 2023 व त्यानंतरच्या साैद्यांवर (Contract trading)वर बंदी घालण्यात आली. कापूस कायदा बाजारात माेठे बदल करण्याची गरज असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. आवश्यक ते बदल करण्यासाठी किमान 30 दिवसयांचा काळ आहे. बदल केल्यानंतर पुन्हा Contract trading पूर्ववत सुरू केले जाईल. सर्व्हिलान्स सिस्टम मजबूत करणे, काॅटन ॲडव्हायझरी कमिटीत बदल करणे, या कमिटीत नवीन सदस्यांचा समावेश करणे, व्यवहारात पारदर्शकता आणणे यासह अन्य महत्त्चाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

🌍 वायदे बाजारावर ठपका
सन 2021-22 च्या हंगामात कापसाच्या दरात जागतिक स्तरावर तेजी हाेती. त्याला भारतीय बाजारपेठ अपवाद नव्हती. दर वाढल्याने कमी दरात कापूस हवा असणाऱ्या काही भारतीय कापड उद्याेगांनी कापसाची खरेदी थांबविली. पुढे त्यांनी त्यांचे युनिट बंद ठेवले व त्यासाठी कापूस दरवाढीचा हवाला दिला. या दरवाढीला वायदा बाजार जबाबदार असल्याचा ठपकाही या उद्याेजकांनी ठेवला. वास्तवात, या दरवाढीला वायदा बाजार जबाबदार नव्हता. कापसाचे कमी उत्पादन आणि वाढता वापर व मागणीमुळे ही दरवाढ झाल्याने ती नैसर्गिक हाेती. मात्र, ही बाब काही कापड उद्याेजक मान्य करायला तयार नाही.

🌍 सेबीची चालाखी
वास्तवात, ही बैठक 26 ऑगस्ट 2022 राेजी पार पडली. सेबीला आवश्यक असलेले बदल करण्यासाठी 30 दिवसांचा म्हणजेच एका महिन्याचा काळ हवा आहे. सेबीला कापसाच्या Contract trading वर बंदी न घालता आवश्यक बदल व सुधारणा करून ते विशिष्ट तारखेपासून लागू करता आले असते. शिवाय, सेबीने सप्टेंबर अथवा ऑक्टाेबर किंवा नाेव्हेंबर 2022 यातील काेणत्याही एका महिन्यातील कापसाच्या Contract trading वर बंदी घालून त्यांना पाहिजे ते बदल करायला हवे हाेते. मात्र, ते बदल करण्यासाठी सेबीने मुद्दाम जानेवारी 2023 ची निवड केली. कारण, या काळात कापूस खरेदी-विक्रीचा हंगाम जाेरात असताे. या काळात कापसाच्या Contract trading बंदी घातल्यास किमान दाेन महिने कापसाचे दर दबावात येतील आणि त्याचा फायदा देशातील कापड उद्याेजकांना हाेईल, असा त्यामागचा तर्क हाेता.

🌍 सीसीआयची निर्मिती आणि उद्देश
काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया (CCI – Cotton Corporation of India)ची निर्मिती 31 जुलै 1970 राेजी कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1956 (Company Registration Act) अंतर्गत करण्यात आली. सीसीआय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या (Ministry of Textiles) अखत्यारित काम करते. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालय (Ministry of Agriculture) आणि सीसीआयचा आपसात फारसा संबंध नसताे. देशातील कापड उद्याेगांना चांगल्या प्रतिचा व वाजवी दरात कापूस (रुई) उपलब्ध देणे, देशांतर्गत बाजारात कापसाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करणे, खुल्या बाजारात बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदी करणे, कापसाची निर्यात करणे या मूळ उद्देशासाठी सीसीआयची निर्मिती करण्यात आली. वास्तवात, सीसीआयने निर्मितीपासून आजवर कापड उद्याेजकांचे आर्थिक हित डाेळ्यासमाेर ठेवून कापसाची खरेदी व व्यापार केला आहे.

🌍 सीसीआयने बाजारातील स्पर्धा संपविली
सन 2021-22 च्या हंगामात मागणी करूनही सीसीआयने देशभरात एकही कापूस खरेदी केंद्र (Procurement centers) सुरू केले नव्हते. यावर्षी सीसीआयने कापूस खरेदी करावी, अशी कुणीही मागणी केली नाही. मात्र, सीसीआयने 15 डिसेंबर 2022 पासून देशात महाराष्ट्र आणि ओडिशात प्रत्येकी दाेन असे चार कापूस खरेदी केंद्र सुरू केले. 21 जानेवारी 2023 पर्यंत सीसीआयने देशभरात एकूण 20 कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, त्यातील 8 खरेदी केंद्र महाराष्ट्रात आहेत. सीसीआय चढ्या दराने कापूस खरेदी करून खुल्या बाजारात स्पर्धा निर्माण करेल आणि कापसाच्या निर्यातीसाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा हाेती.मात्र, त्यांनी कमाल दराने कापूस खरेदी करण्याऐवजी किमान किंवा सरासरी दराने कापूस करून बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणली. सीसीआयने जर कमाल दराने कापूस खरेदी केला असता तर व्यापाऱ्यांनी त्यापेक्षा अधिक दराने कापूस खरेदी केला असता आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता.

🌍 कापूस निर्यातीबाबत केंद्र सरकार उदासीन
सीसीआय कापसाची निर्यात देखील करते. सन 2021-22 मध्ये देशातून 46 लाख गाठींची निर्यात करण्यात आली हाेती. सन 2023-24 च्या हंगामातील कापसाचा शिल्लक साठा (Carry forword stock) कमी करण्यासाठी यावर्षी कापसाची निर्यात (Export) करणे अत्यावश्यक आहे. याच शिल्लक साठ्याचा वापर पुढील हंगामातील कापसाचे दर पाडण्यासाठी केला जाणार असल्याने कापसाची निर्यात करणे गरजेचे असले तरी केंद्र सरकार अथवा सीसीआयने अद्याप कापूस निर्यातीचा निर्णय घेतला नाही. खरं तर, जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतीय बाजारात कापसाचे दर अधिक असल्याने निर्यातीला साखरेप्रमाणे इन्सेटिव्ह (Incentive) देणे आवश्यक आहे. सन 2014-15 ते 2020-21 या सहा वर्षात कापसाचे खुल्या बाजारातील दर किमान अधारभूत किमती (MSP – Minimum Support Price)पेक्षा कमी हाेते. त्यामुळे सीसीआयने माेठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला. या खरेदीत झालेले नुकसान भरून (Compensation) देण्यासाठी केंद्र सरकारने सीसीआयला नाेव्हेंबर 2021 मध्ये 17,408.85 काेटी रुपये दिले हाेते. याच धर्तीवर केंद्र सरकारने सीसीआयला कापूस निर्यातीला इन्सेटिव्ह दिल्यास देशांतर्गत बाजारात स्पर्धा निर्माण हाेऊन दर वाढण्यास मदत हाेईल. शिवाय, सन 2023-24 च्या हंगामाताील कापसाचा शिल्लक साठा नगण्या राहणार असल्याने त्या हंगामातील कापसाचे दर दबावात येणार नाही.

🌍 व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
मुळात खुल्या बाजारातील कापसाचे दर जागतिक बाजारातील मागणी, पुरवठा व उत्पादनावर ठरतात. फ्यूचर मार्केटमधील Contract trading मुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना कापसाची भविष्यातील संदर्भ किंमत (Reference price) कळण्यास व भविष्यातील दराबाबत अंदाज बांधण्यास मदत हाेते. सेबीने कापसाचला वायदे बाजारातून वगळले नाही. मात्र, जानेवारी 2023 व नंतरच्या Contract trading वर बंदी घातल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना कापसाची संदर्भ किंमत कळणे बंद झाले व भविष्यातील दराचा अंदाज बांधणे अशक्य झाले. सीसीआयने कमी अथवा सरासरी दरात कापूस खरेदी करण्याचे धाेरण अवलंबिल्याने तसेच सेबीने कापसाच्या Contract trading वर बंदी घातल्याने कापसाचे उत्पादन कमी हाेऊनही दर अनैसर्गिकारित्या दबावात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 600 ते 800 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. फ्यूचर मार्केटमधील कापसाचे Contract trading नेमके कधी पूर्ववत केले जाईल, हेही सेबीने स्पष्ट केले नाही. सीसीआय व सेबीने हा प्रकार केंद्र सरकारच्या सूचनेवरून आणि केंद्र सरकारने कापड उद्योजक लॉबी (Textile Mills Lobby)च्या दबावाखाली केल्याचे स्पष्ट होते. या गंभीर प्रकाराबाबत एकही राजकीय पक्ष व नेता शब्दही बोलायला तयार नाही.

कृषिसाधना....

1 thought on “Cotton rates, SEBI, CCI : कापसाचे दर पाडण्यासाठी ‘सेबी’ व ‘सीसीआय’चा वापर!

  1. या बंदीला सर्वच राजकीय पक्षांच्या पाठिंबा असल्याचे लक्षात येण्या इतका शेतकरी खुळा नाही. परंतू शरद जोशीच्या विचार कार्य करते तेव्हढेच विरोध प्रगट करता पण छोट्या छोट्या गोष्टीवर आंदोलन करणारे विरोधी पक्ष व संस्थांनी झोपेचे सोंग घेवून बसले आहेत. आता कांद्याचे भाव ३० रु ते ४० रुपयावर जावू द्या सगळे गळ्यात कांद्याच्या माळा घालून रस्त्यावर उतरतात व आम्ही शेतकर्यां साठी खुप काही करतो हे दाखवितात सगळे एकाच मालेतील मनी आहे म्हणूनच शरद जोशी म्हणायचे सगळे राजकिय पक्ष चोर आहे १०० टक्के सत्य आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!