krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agriculture Truth : भारतीय कृषी क्षेत्रातील व्यक्ती साक्षेप सत्य!

1 min read
Agriculture Truth : मानवी जीवनामध्ये 'सत्य' हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य मानले जाते. महात्मा गांधीजींनी सत्याला असाधारण महत्त्व दिले होते. सुरुवातीला ते 'ईश्वर ही सत्य है' असे म्हणायचे. नंतर त्यात 'सत्यही ईश्वर है' असा बदल केला.

‘पृथ्वी स्थिर असून, सूर्य तिच्या भोवती भ्रमण करतो’ हे सत्य हजारो वर्षे मानले गेले होते. सन 1530 ला कोपर्निकस शास्त्रज्ञाने हे खोटे ठरवून ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे सांगितले. यालाच आपण त्रिकालबाधित सत्य (Universal Truth) म्हणत होतो. कालांतराने असे सिद्ध झाले की, सूर्य पण स्थिर नसून, संपूर्ण सूर्यमालाच आकाशगंगेच्या (Milky Way) केंद्राभोवती परिभ्रमण करते. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियमाला कालांतराने अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताने दुरुस्त्या सुचविल्या. वरील काही उदाहरणांवरून हे लक्षात येते की, कुठलेही सत्य हे चिरंतन व अबाधित नसते.

पंढरपूरला पांडुरंगाकडे जाण्याचे जसे अनेक मार्ग आहेत. तद्वत शेतकऱ्यांचे हित हे अंतिम उद्दिष्ट साधण्यासाठी शेतकरी संघटनेने वेगवेगळे मार्ग अवलंबलेले दिसतात. महात्मा ज्याेतिबा फुलेंनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणून त्यांना समर्थपणे संघटित करून दाखवणाऱ्या शरद जोशींचे मानाचे स्थान आहे हे निर्विवाद. त्यांनी ‘शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे’ या एककलमी कार्यक्रमावर भर दिला व आपल्या आंदोलनाचे मुख्य सूत्र ठेवले.

काही जण ‘आम्हाला भीक नको, मदत नको फक्त स्वातंत्र्य द्या’, अशी भूमिका घेतात. सुभाष पाळेकरांचा भर उत्पादन खर्च कमी करण्यावर असून ते नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करण्याचा सल्ला देतात. उसाच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलायचे झाले तर, काही जण ‘साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट नको’ या मागणीचा निर्धाराने पाठपुरावा करतात. काहींना ‘साखरेला एकरकमी एफआरपी दिल्यास सर्व प्रश्न सुटतील’ असे वाटते.

काही जण ‘कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण हेच तीन शेतकरी विरोधी कायदे बदलल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही’, अशी भूमिका मांडतात. काही जण ‘परदेशातील शेतकऱ्यांप्रमाणे अनुदान मिळावे’, अशी मागणी करतात. काहींना फक्त जमिनीच्या आरोग्याची काळजी आहे. काही जण बीटी बियाणे, जीएम तंत्रज्ञानाची मागणी करतात तर, काही जण विषमुक्त अन्नासाठी रासायनिक शेती करू नका, असा सल्ला देतात.

दिल्लीच्या आंदोलनात हमीभाव कायद्याची मागणी पुढे आली तर, काही जणांना सरकारचा शेतमाल बाजारातील हस्तक्षेप हा आक्षेपार्ह आहे. काही जणांच्या मते अन्नसुरक्षा कायदा व रेशन व्यवस्थामुळे (PDS-Public Distribution System) शेतमालाचे भाव पडतात, भ्रष्टाचाराला वाव मिळतो, अन्नधान्याची नासाडी होते व शेतमजूर मिळणे दुरापास्त झाले आहे वगैरे. काहींना यासंदर्भात दारिद्र्य रेषेखालील कष्टकऱ्यांच्या भूकबळी, कुपोषणाचा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. काही जण सन 1991 मधील मुक्त अर्थव्यवस्थेचे स्वागत करतात तर, समाजवादी त्याच्यावर खा.उ.जा. (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) अशी उपरोधिक टीका करून, त्यानंतरच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले, असा दावा करतात.

इतके परस्परविरोधी विधाने ऐकल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये वैचारिक गोंधळ होतो. वरील सगळे मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहेत, यात दुमत नाही. असे विविध विचारांची मांडणी करणाऱ्या शेतकरी नेत्यांबद्दल व विचारवंतांबद्दल मला मनापासून आदर आहे. कारण त्यांनी अक्षरशः आयुष्यभर आपल्या तत्वप्रणालीची फारकत घेतली नाही व पाठपुरावा करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले आहेत. एक गोष्ट पक्की आहे की, हे सर्व जण आपल्या विचारांवर, मागण्यांविषयी ठाम आहेत व शेतकऱ्यांच्या हिताबद्दल प्रामाणिक आहेत, यात वादच नाही. मग अशी मतभिन्नता का? कोण खरे बोलत आहे?

याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ‘राशोमान’ हा ऑस्कर विजेता जापनीज कलात्मक चित्रपट समजून घ्यावा लागेल. यामध्ये एका घडलेल्या घटनेचा वृत्तांत सांगताना चार साक्षीदार आपापल्या पद्धतीने वर्णन करतात. त्यात कमालीची मतभिन्नता असते. त्यामुळे नेमके काय घडले व सत्य काय आहे हे चित्रपट संपला तरी कळत नाही. यालाच कालांतराने ‘राशोमान इफेक्ट’ म्हटले गेले. जगभरात हा शब्द प्रचलित झाला. त्यात असा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला आहे की, ‘सत्य’ हे सुद्धा व्यक्तिसाक्षेप असते. (कोण सांगावे या सिद्धांताला ही पुढे कोणी खोटे ठरवेल).

प्रत्येक माणसाचे वाचन, प्रवास, संस्कार, अनुभव, सहवास, आजूबाजूची परिस्थिती या सर्व घडामोडींच्या एकत्रित परिणामातून त्याचे व्यक्तीत्व घडत असते, आकार घेत असते, बदलत असते. त्यामुळे एकाच दृष्य घटनेचे वर्णन विविध लोक त्यांच्या व्यक्तित्वानुसार, स्मरणशक्तीनुसार, दृष्टिकोनातून, विचार करण्याच्या पद्धतीप्रमाणे, भिन्नपणे करू शकतात. ते तसे घडले असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. याचा अर्थ ते खोटे बोलतात असे नाही.

बरेच वेळा हे लोक परस्परांशी वाद घालून भांडतात. एकमेकांना दुखवतात व शक्तीचा अपव्यय करतात. दिल्ली आंदोलनाच्या काळामध्ये वैचारिक मतभेदांमुळे शेतकरी नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली. ही परिस्थिती पाहिल्यानंतर बुद्धांची ‘हत्ती व सात आंधळे’ गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काहींना हत्ती म्हणजे सुपासारखा आहे तर कोणाला हत्ती सापासारखा भासतो.

एखादा सिद्धांत तर्कशास्त्राच्या आधारावर मांडल्यानंतर तो सिद्ध करण्यासाठी एखादा प्रयोग यशस्वी व्हावा लागतो. फक्त स्वातंत्र्याची एकांगी मागणी करणाऱ्यांनी उत्तर द्यावे. फळे व भाजीपाल्याची बाजार समितीतून नियमन मुक्ती करून स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर त्यांच्या विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था (Support) नसल्यामुळे शेतकऱ्यांची वाताहत झाली. त्यांचे प्रश्न सुटले का? दुधाला स्वातंत्र्य आहे. सरकारी हस्तक्षेप नाही. तरी दूध 17 रुपये लिटरने का विकावे लागले? खासगी व सहकारी दूध संघाच्या संघटित रॅकेटपासून त्यांना कोण ‘संरक्षण’ देणार?

फक्त अमुक अमुक करा म्हणजे सगळे प्रश्न सुटतील, शेतकरी सुजलाम्-सुफलाम् समृद्ध होईल, असा खोटा आशावाद कोणी दाखवू नये किंवा खूप मोठा सिद्धांत मांडल्याचा आव आणू नये. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. भिषण परिस्थिती आहे. आपण उत्तरासाठी, निकालासाठी ट्रायल अँड एरर (Hit & Miss) पद्धत वापरून आता अनेक दशके वाट पाहू शकत नाही.

कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत जटिल व क्‍लिष्ट (Complex) असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी परिणामकारक ठरेल, असे बहुआयामी संपूर्ण उपाययोजनांची (Multi Dimensional Total Solutions) ची जरुरी आहे. कारण, कृषी अर्थव्यवस्था हे डायनॅमिक सायन्स आहे. म्हणून पूर्वी मांडलेल्या विचारांची काल सुसंगत चिकित्सा करून त्यात वारंवार बदल करावेच लागतील.

✳️ एकच ध्यास – शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!