Cotton production : कापसाचे उत्पादन 339 ऐवजी 300 लाख गाठींवर स्थिरावणार
1 min read🌎 सीएआयचा कापूस उत्पादनाचा अंदाज
1 ऑक्टाेबर 2022 पासून सन 2022-23 चा कापूस हंगाम सुरू झाला. हंगाम सुरू हाेताच चालू हंगामात (1 ऑक्टाेबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023) देशभरात एकूण 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाचे (CAI-Cotton Association of India) अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला हाेता. हा चालू हंगामातील कापूस उत्पादनाचा पहिला अंदाज हाेता. नाेव्हेंबर 2022 मध्ये सीएआयने कापूस उत्पादनाचा दुसरा म्हणजे देशभरात 365 लाख गाठींचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.डिसेंबर 2022 मध्ये सीएआयचा तिसरा व चाैथा अंदाज बाजारात आला. यावेळी देशभरात 343 गाख व नंतर 339 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचे सीएआयने स्पष्ट केले. जानेवारी 2022 व त्यानंतर सीएआयचे आणखी अंदाज येतील. त्यात कापसाचे एकूण उत्पादन 310 ते 315 लाख गाठींवर येण्याची शक्यता आहे. सन 2021-22 च्या हंगामात देशभरात कापसाचे एकूण 362 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. त्यानंतर हा अंदाज अनुक्रमे 360 लाख,335 लाख, 325 लाख गाठींवरून खाली उतरत 315 लाख गाठींवर थांबला. वास्तवात, या काळात एकूण 307.6 लाख गाठी कापूस देशभरातील बाजारात आला हाेता.
🌎 कापसाची घटती आवक
चालू हंगामात सुरुवातीपासून आजवर देशांतर्गत बाजारातील कापसाची आवक ही संथ राहिली आहे. बाजारात पुरेसा कापूस येत नसल्याने देशभरात फार थाेडे जिनिंग प्रेसिंग सुरू असून, ते ही आठवड्यातील एक ते दाेन दिवस चालतात व उर्वरित दिवस बंद असतात. 1 ऑक्टाेबर ते 22 नाेव्हेंबर 2022 या दीड महिन्याच्या काळात 36,15,850 गाठी कापूस बाजारात आला. 1 ऑक्टाेबर ते 22 नाेव्हेंबर 2021 या काळात मात्र 63,32,000 गाठी कापूस बाजारात आला हाेता. अर्थात आधीच्या हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात कापसाची आवक ही 27,16,150 गाठींनी कमी आहे. 1 ऑक्टाेबर 14 डिसेंबर 2022 या काळात 58,08,684 गाठी तर 1 ऑक्टाेबर 14 डिसेंबर 2021 या काळात 1,06,14,500 गाठी कापूस बाजारात आला. आधीच्या हंगामाच्या तुलनेत ही आवक 48,05,816 गाठींनी कमी हाेती. 1 ऑक्टाेबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या काळात 80,86,184 गाठी कापूस बाजारात आला. 1 ऑक्टाेबर 2021 ते 2 जानेवारी 2022 या काळात 1,32,06,900 गाठी कापूस बाजारात आला हाेता. म्हणजेच आधीच्या हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात 51,20,716 गाठी कमी कापूस बाजारात आला. 1 ऑक्टाेबर 2021 ते 2 जानेवारी 2022 या काळात एकूण उत्पादनाच्या (307.6 लाख गाठी) 43.02 टक्के कापूस बाजारात आला हाेता तर 1 ऑक्टाेबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या काळात एकूण उत्पादनाच्या (सीएआयचा अंदाज-339 लाख गाठी) 23.86 टक्के कापूस बाजारात आला. म्हणजेच आधीच्या हंगामाच्या तुलनेत कापसाची आवक 19.16 टक्क्यांनी कमी झाली. 1 ऑक्टाेबर ते 14 डिसेंबर 2022 या काळात कापसाची आवक ही 17.63 टक्क्यांनी कमी हाेती.
🌎 कापसाची आवक (गाठींमध्ये -1 गाठ 170 किलो रुई)
🔆 01 ऑक्टाे. 2022 ते 02 जाने. 2023 – 01 ऑक्टाे 2021 ते 02 जाने. 2022
🔆 पंजाब – 1,11,949 – 3,78,000 – 2,66,051 कमी
🔆 हरयाणा – 5,14,335 – 6,96,000 – 1,81,665 कमी
🔆 राजस्थान – 14,92,800 – 13,51,000 – 1,41,800 अधिक
🔆 नाॅर्थ झाेन – 21,19,084 – 24,25,000 – 30,5,916 कमी
🔆 गुजरात – 24,86,000 – 33,24,000 – 8,38,000 कमी
🔆 महाराष्ट्र – 11,20,500 – 30,63,000 – 19,42,500 कमी
🔆 मध्य प्रदेश – 5,89,500 – 9,78,000 – 3,88,500 कमी
🔆 सेंट्रल झाेन – 41,96,000 – 73,65,000 – 31,69,000 कमी
🔆 तेलंगणा – 5,19,500 – 14,22,500 – 9,03,000 कमी
🔆 आंध्र प्रदेश – 4,78,300 – 6,85,500 – 2,07,200 कमी
🔆 कर्नाटक – 6,24,000 – 10,96,500 – 4,72,500 कमी
🔆 तामिळनाडू – 1,08,600 – 51,600 – 57,600 अधिक
🔆 साऊथ झाेन – 17,30,400 – 32,56,100 – 15,25,700 कमी
🔆 ओडिशा – 32,700 – 70,800 – 38,100 कमी
🔆 इतर राज्य – 8,000 – 90,000 – 82,000 कमी
🔆 एकूण – 80,86,184 – 1,32,06,900 – 5,120,716 कमी
🌎 या राज्यात आवक वाढली
देशातील 11 प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी राजस्थान व तामिळनाडू या दाेन राज्यांमध्ये 1 ऑक्टाेबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या काळात कापसाची आवक मागील हंगामातील या काळाच्या तुलनेत वाढली आहे. या काळात राजस्थानमध्ये 1,41,800 गाठी कापसाची आवक अधिक आहे. मागील हंगामात ही आवक 13,51,000 तर चालू हंगामात 14,92,800 गाठी कापसाची आवक हाेती. तामिळनाडूमध्ये 57,600 गाठींनी कापसाची आवक वाढली असून, मागील हंगामात ही आवक 51,600 तर चालू हंगामात 1,08,600 गाठी एवढी हाेती. पंजाबमध्ये 2,66,051, हरयाणात 1,81,665, गुजरातमध्ये 8,38,000,महाराष्ट्रात 19,42,500, मध्य प्रदेशात 3,88,500, तेलंगणात 9,03,000, आंध्र प्रदेशात 2,07,200, कर्नाटकमध्ये 4,72,500, ओडिशात 38,100 आणिइतर राज्यात 82,000 गाठी कापसाची कमी आवक झाली आहे. झाेन निहाय विचार केल्यास नाॅर्थ झाेनमध्ये 30,5,916, सेंट्रल झाेनमध्ये 31,69,000 व साऊथ झाेन मध्ये 15,25,700 गाठी कापसाची कमी आवक झाली असून, देशभरातील हा आकडा 5,120,716 गाठींचा आहे. मागील हंगामात याच काळात 1,32,06,900 गाठी आला हाेता तर चालू हंगामात 80,86,184 गाठी कापूस बाजारात आला आहे. नॅशनल काॅटन ब्राेकर असाेसिएशनच्यामध्ये 1 ऑक्टाेबर ते 31 डिसेंबर या काळात एकूण उत्पादनाच्या म्हणजेच 351.75 लाख गाठींपैकी 84.75 लाख गाठी कापूस बाजारात आला असून, 267 लाख गाठी कापूस बाजारात येणे बाकी आहे. चार महिन्यात यातील 200 लाख गाठी कापूस बाजारात येणे अपेक्षित असले तरी कापसाचे उत्पादन घटल्याने ते कठीण वाटत आहे. मात्र, कापसाच्या उत्पादनात वर्षागणिक घट हाेत असल्याचे कुणीही मान्य करायला तयार नाहीत.
🌎 01 ऑक्टाे. ते 31 डिसें. 2022 पर्यंत कापसाची आवक (लाख गाठी)
🔆 राज्य – अंदाज – आवक – येणे बाकी
🔆 गुजरात – 95 – 25 – 70
🔆 कर्नाटक – 21 – 5.5 – 15.5
🔆 तेलंगणा – 48 – 9 – 39
🔆 महाराष्ट्र – 90 -10 – 80
🔆 आंध्र प्रदेश – 20 – 4 – 16
🔆 मध्य प्रदेश – 19 – 5.75 – 13.25
🔆 नाॅर्थ झाेन (पंजाब’ हरयाणा, राजस्थान) – 45 – 23 -22
🔆 ओडिशा – 3.75 – 0.5 – 3.25
🔆 तामिळनाडू – 8 – 1.5 – 6.5
🔆 इतर राज्य – 2 – 0.5 – 1.5
🔆 एकूण – 351.75 – 84.75 – 267
🌎 कापूस वापर व उत्पादनात घट
चालू हंगामातील मुसळधार व अति मुसळधार पाऊस (Heavy rainfall), गुलाबी बाेंडअळीचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव, सततचे ढगाळ व प्रतिकूल हवामान (Cloudy weather) यासह अन्य कारणांमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. या हंगामात देशभरात 339 लाख गाठींचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला. कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गाेविंद वैराळे यांच्या मते 300 ते 320 लाख, कापूस उत्पादक तथा जिनर अशाेक निलावार यांच्या मते 330 ते 340 लाख, काॅटन ॲडव्हायझरी बाेर्डचे माजी सदस्य, जिनर तथा कापूस उत्पादक विजय निवल यांच्या मते 320 लाख, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा हिंगणघाट, जिल्हा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुसुदन हरणे यांच्या मते मागील हंगामाच्या तुलनेत 15 ते 20 टक्के कमी, प्रयाेगशील शेतकरी गणेश नानाेटे यांच्या मते 300 ते 325 लाख तसेच माझ्या मते 295 ते 300 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कापसाच्या उत्पादनात घट हाेणार असली तरी कापसाचा वापरही कमी हाेणार आहे. काेराेना संक्रमणामुळे सन 2021-22 मध्ये भारतासाेबत जगात कापसाचा वापर 3.७ टक्क्यांनी वाढून 345 लाख गाठी हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात हाेता. कापसाचे दर वाढल्याने वस्राेद्याेगांनी सुताला पर्याय म्हणून पाॅलिस्टरचे धागे वापरल्याने हा वापर 317 लाख गाठींवर स्थिरावला. सीएआयच्या मते, चालू हंगामात भारतात कापसाचा वापर 292 लाख गाठींचा असेल. तर गाेविंद वैराळे यांच्या मते 300 लाख गाठींचा वापर हाेईल. माझ्या मते कापसाचा वापर किमान 312 ते 315 लाख गाठींचा असेल. काेराेना संक्रमण वाढल्यास वापर कमी हाेईल. संक्रमण नसल्यास वापर वाढणार असल्याचे गणेश नानाेटे यांनी सांगितले. कापसाचे उत्पादन व वापर विचारात घेता या हंगामातील कापसाचा क्लोसिंग स्टॉक जवळपास शून्यावर असायला हवा. पुढील हंगामातील चांगल्या दरासाठी कापसाचा कॅरी ओव्हर स्टॉक कमी असणे व त्यासाठी कापसाची निर्यात वाढविणे आवश्यक आहे.