krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton prices : कापसाच्या घसरत्या दरास कारणीभूत झारीतील शुक्राचार्य कोण?

1 min read
Cotton prices : अशाश्वत असा व्यवसाय म्हणजे शेती आणि या शेतीला लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती, निसर्गाचा लहरीपणा, मजुरांची टंचाई, भेसळयुक्त बियाणे, रासायनिक खत आणि इलेक्ट्रिक मोटरपंपसाठी लागणारी विद्युत या सगळ्या बाबींच्या अडथळ्यांना पार करून प्रचंड कष्ट करून मेहनतीने शेतकरी शेतीमालाचे उत्पादन काढत असतो. हे सर्व करत असताना शेतीमालाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि त्या पटीत त्या शेतीमालाला बाजारात मिळणारा भाव यामध्ये प्रचंड तफावत असल्याने शेती तोट्यात आलेली आहे.

काही वर्षापासून राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी आश्वासने देत आहेत. मात्,र तसे होताना दिसत नाही. शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती दुप्पट झाल्या. शेतकऱ्यांवर अप्रत्यक्षरीत्या काही जीवघेणे कर लादण्यात आले. त्यांच्या विरोधामध्ये काळे कायदे ध्येयधोरण चुकीच्या पद्धतीने लादण्यात आले. त्यामुळे शेतीची पार वाट लागली. मागच्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला. कापूस (Cotton) एक नगदी पीक (Cash crop) असल्याने बऱ्यापैकी शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणूनच शेतकऱ्यांनी कापसावर यावर्षी अधिक भर दिला.चांगल्या उत्पादनासाठी अधिक खर्च केला. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने कापसाचे उत्पादन निमपट झाले.

सुरुवातीला कापसाचे दर 15 हजार रुपये प्रति क्विंटलवर जाईल, अशा अफवा उडवल्या. कापसाने दहा हजारी पार केली व शेतकरी सुखावला. उत्पादन कमी असलं तरी भाववाढ झाल्याने बरोबरी होऊन जाईल, अशी आशा हाेती. मात्र, दर (prices) अचानक सात हजारांवर येऊन थांबले. मग असं का झालं? कशामुळे झालं? या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण आहे? असा प्रश्न तमाम शेतकऱ्यांच्या मनामध्ये उभा राहिला. कापसाचे भाव वाढतील या भाबड्या आशेवर या शेतकऱ्याने सावकाराचे व्याज वाढलं तरी चालेल, मात्र कापूस विकणार नाही, अशी भूमिका घेऊन कापूस विकण्याचं थांबवलं.

अभ्यासकांच्या मते कापसाच्या किमती वाढणार नाहीत, अशा बातम्या येऊ लागल्या. आधीच उत्पदन कमी झाल्याने खचलेला शेतकरी आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या अंदाजानुसार बऱ्याच बाजार अभ्यासक व तज्ज्ञांनी आपापले विचार मांडले. काहींच्या मते देशातील व्यापारी वर्ग सरकार दबाव आणत आहेत, त्यामुळे भाव पडले. काही ना असे वाटते, यामध्ये आयात शुल्क कमी अधिक केल्याने भाव पडले. काही तज्ज्ञांच्या मते याला काही कायदे कारणीभूत व धोरणं कारणीभूत आहेत. त्यापैकी काही अभ्यासाकांनी असा विचार मांडला की, सीसीआयने कापूस खरेदी सुरू केल्यामुळे भाव कमी झाले. काही तज्ज्ञांना सेबीची कापसाच्या गाठींची अघोषित वायदे बंदी जबाबदार आहे असे वाटते. काहींच्या मते चीनमध्ये कोरोनाची आलेली लाट हेही कापसाची घसरण होण्याचं प्रमुख कारण आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालय याबाबतीत काही निर्णय घेत नाही. देशाचे पंतप्रधान शेतीला दुय्यम मानतात, अशी अनेक कारण कापसाच्या घसरलेल्या बाजाराबद्दल बोलले जातात. सत्तेतले, विरोधातले राजकीय नेते, शेतकरी नेते, की अजून दुसरे कोणी कोण जबाबदार आहे कशामुळे सगळं झालं आहे? हा झारीतला शुक्राचार्य कोण आहे? हे मात्र कळायला मार्ग नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!