Increase in sugar production : देशाच्या साखर उत्पादनात 5 टक्के वाढ
1 min read🌐 साखर निर्यातीचे करार
देशभरातील साखर कारखान्यांनी 45 ते 50 लाख टन साखरेच्या निर्यातीसाठी करार (Contract for Export of Sugar) केले आहेत. सन 2021-22 या विपणन वर्षात भारताने विक्रमी म्हणजे 111 लाख टन साखरेची निर्यात केली होती. या महिन्यात 8 ते 9 लाख टन साखर निर्यात केली जाणार असल्याचेही इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा)कडून सांगण्यात आले आहे.
🌐 578 लाख हेक्टरवर रब्बी पिकांच्या पेरण्या
16 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील विविध राज्यांमध्ये 578.10 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरण्या (Sowing of rabi crops) पूर्ण झाल्या आहेत. रब्बी पिकांखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 552.28 लाख हेक्टरच्या तुलनेत 4.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाखालील (Wheat) क्षेत्र 3 टक्क्यांनी वाढले आहे. गव्हाखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या 278.25 लाख हेक्टरवरून 286.5 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. ज्वारी वगळता सर्वच पिकांखालील क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे.धान (Paddy) व मका (Maize) पिकाखालील क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. तेलबिया (Oil seed) पिकाखालील क्षेत्र 8.2 टक्क्यांनी वाढून 97.94 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. सर्व पिके चांगल्या स्थितीत असून, येत्या काही दिवसांमध्ये हवामान अनुकूल राहिल्यास देशाच्या रब्बी उत्पादनात चांगली वाढ बघायला मिळण्याची शक्यताही केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
🌐 खोबऱ्याच्या हमीभाव वाढीस मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत सन 2023 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या (Coconut) हमीभावात वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली. कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या (The Commission for Agricultural Costs & Prices) शिफारसीनुसार ही वाढ करण्यात आली आहे. सरासरी चांगल्या गुणवत्तेच्या सत्त्व काढण्यासाठीच्या खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत 10,860 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. गोटा खोबऱ्यासाठी हमीभाव 11,750 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. यंदा सत्व काढण्यासाठीच्या नारळाच्या दरामध्ये 270 प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे तर, गोटा खोबऱ्याच्या दरामध्ये 750 प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.