Tur crop pest management : तुरीवरील शेंगा पाेखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
1 min read🟢 शेंगा पाेखरणारी अळी (हाेलीकाेवर्पा) या किडीची मादी पतंग फुले शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मी. लांब पोपटी रंगाची असून, पाठीवर तुटक रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.
🟢 धिमारी पतंग : या पतंगाची अळी 12.5 मि.मी. लांब, हिरवट, तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.
🟢 शेंग माशी : या माशीची बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.
एकात्मिक व्यवस्थापन या तिन्ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.
🟢 उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी जेणेकरून जमिनीतील किडींचे कोष उन्हामुळे, नांगराच्या फाळामुळे मरतात. तसेच नांगरणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावर आलेले किडने कोष पक्षी वेचून खातात.
🟢 कीड प्रतिबंधक वाणांचा वापर करावा.
🟢 तुरीसोबत ज्वारी, बाजरी, मका ही आंतरपिके घ्यावीत.
🟢 प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अन्या खाऊन फस्त करतात.
🟢 तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील. त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
🟢 शेंगा पोखरणाऱ्या नियंत्रणाचे उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कळी अवस्थेत पहिली फवारणी निम कीटकनाशकाची (ॲझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मि.ली./10 लिटर पाणी) करावी म्हणजे किडींचे शत्रु कीटकांना अपाय होणार नाही व नैसर्गिक संतुलन राखले जाईल. तसेच या किडी कीटकनाशक फवारलेल्या तुरीवर अंडी घालण्यास प्राधान्य देणार नाही.
🟢 पहिल्या फवारणीस विलंब झाल्यास व बारीक अळ्या दिसू लागल्यास कीटकनाशकाच्या ऐवजी रासायनिक कीटकनाशकाची (क्विनॉलफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली./10 लिटर पाणी) फवारणी करावी. त्यानंतरही गरज भासल्यास इमामेक्टिनोट बेझाेएट 5 टक्के 3 ग्राम,लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅनिलीप्राेल 18.5 टक्के प्रवाही 25 मि.ली. या कीटकनाशकांच्या 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या.
🟢 फवारणी केल्यास आपल्या उत्पादनामधील घट टाळून फवारणीचा खर्च भरून निघेल अन्यथा फवारणीचा खर्च वाया जावू शकतो, याची शेतकरी बंधूनी कृपया नोंद घ्यावी.
खालील कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या (नॅपसॅक) पंपाने फवारणी करावी. पाॅवर पंपाने फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
🟢 क्विनॉलफॉस 20 टक्के प्रवाही 20 मि.ली.
🟢 इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 3 ग्राम
🟢 डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मि.ली.
🟢 लॅब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मि.ली.
🟢 क्लोरॅट्रॅनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 2.5 मि.ली.