Cotton production arrival : कापसाची घटलेली आवक व उत्पादन ; शेतकऱ्यांनी पॅनिक सेल टाळावा!
1 min read पेरणीक्षेत्रात वाढ व उत्पादनात घट
सन 2021-22 च्या हंगामात संपूर्ण देशात एकूण 115 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड (Cotton Sowing area) करण्यात आली हाेती. सन 2022-23 च्या हंगामात यात 10 लाख हेक्टरची वाढ झाली आणि देशभरातील कापसाचे पेरणीक्षेत्र 125 लाख हेक्टरवर पाेहाेचले. सुरुवातीच्या काळात पिकाची अवस्था चांगली असल्याने सीएआयने देशात चालू हंगामात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. मात्र, 15 जुलै ते 24 ऑक्टाेबर या काळात काेसळलेल्या मुसळधार व अति मुसळधार पाऊस (Heavy rainfall), सततचे ढगाळ वातावरण, पिकाची खुंटलेली वाढ, पावसामुळे आंतरमशागतीला वेळ न मिळणे, राेग व किडींचा प्रादुर्भाव यासह अन्य कारणांमुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात माेठी घट हाेणार असल्याचे दिसून येते. सीएआयने सन 2021-22 च्या हंगामात देशात एकूण 362 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. वास्तवात, 1 ऑक्टाेबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळात एकूण 307.6 लाख गाठी कापूस देशातील बाजारपेठेत आला. या हंगामात सीएआयने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा 54.4 लाख गाठी कापसाचे उत्पादन कमी झाले. मात्र, सीएआयच्या मते या हंगामात 315 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले. सीएआयने 7.4 लाख गाठी कापूस कुठून आणला, हे कळायला मार्ग नाही. मागील वर्षीचे एकूण उत्पादन तसेच दाेन्ही वर्षातील बाजारातील कापसाची आवक विचारात घेता सन 2022-23 च्या हंगामात देशात 290 ते 300 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचे संकेत मिळतात. म्हणजेच, सीएआयने व्यक्त केलेल्या एकूण उत्पादनाच्या 45 ते 50 लाख गाठी कमी उत्पादन हाेणार आहे.
बाजारपेठेतील कापसाची आवक
1 ऑक्टाेबर ते 14 डिसेंबर 2021 या काळात देशभरातील बाजारपेठांमध्ये 106 लाख 14 हजार 500 गाठी म्हणजेच एकूण उत्पादनाच्या (307.6 लाख गाठी) 34.46 टक्के कापूस देशांतर्गत बाजारात आला हाेता. सन 2022-23 मध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र 10 लाख हेक्टरने वाढून 125 लाख हेक्टरवर पाेहाेचले. त्यामुळे या काळात किमान 118.83 लाख गाठी कापूस बाजारात येणे अपेक्षित असताना 58 लाख 09 हजार 684 गाठी कापूस बाजारात आला.
देशभरातील कापसाची आवक
(1 ऑक्टाेबर ते 14 डिसेंबर) (गाठी)
राज्य सन-2021 सन-2022
पंजाब – 3,10,000 – 81,249 – 2,28,249 (कमी)
हरयाणा – 5,60,000 – 4,27,335 – 1,32,665 (कमी)
राजस्थान – 11,50,000 – 11,28,800 – 21,200 (कमी)
गुजरात – 26,10,500 – 17,00,000 – 9,10,500 (कमी)
महाराष्ट्र – 23,30,000 – 7,49,000 – 15,81,000 (कमी)
मध्य प्रदेश – 7,54,500 – 4,57,000 – 2,97,500 (कमी)
तेलंगणा – 11,50,000 – 3,39,500 – 8,10,500 (कमी)
आंध्र प्रदेश – 5,90,000 – 3,50,800 – 2,39,200 (कमी)
कर्नाटक – 9,50,500 – 4,52,000 – 4,98,500 (कमी)
तामिळनाडू – 50,000 – 1,00,000 – 50,000 (अधिक)
ओडिशा – 70,000 – 15,000 – 55,000 (कमी)
इतर – 90,000 – 8,000 – 82,000 (कमी)
एकूण – 1,06,14,500 – 58,08,684 – 48,05,816 (कमी)
1 ऑक्टाेबर ते 14 डिसेंबर या काळात मागील वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात 48 लाख 05 हजार 816 गाठी कापूस कमी बाजारात आला. देशातील गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या माेठ्या कापूस उत्पादक राज्यातील कापसाची आवक ही 8 ते 15 लाख गाठींनी कमी आहे. तामिळनाडू व राजस्थान वगळता प्रमुख कापूस उत्पादक राज्यांचीही हीच अवस्था आहे. सततच्या मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे कापसाचे वेचे लांबणीवर गेल्याने 15 नाेव्हेंबरपर्यंत बाजारातील कापसाची कमी असणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यानंतर आवक वाढायला हवी हाेती. मात्र, 1 ऑक्टाेबर ते 7 डिसेंबर या काळात कापसाची आवक ही 12.38 टक्क्यांनी कमी हाेती.
शेतकऱ्यांनी स्टाॅकिस्ट व्हावे
काही तांत्रिक कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या बाजारातील कापूस साठवणूक क्षमता सध्या संपल्यागत झाली आहे. त्यातच 1 डिसेंबरपासून जागतिक बाजारासाेबतच देशांतर्गत बाजारातील कापसाचे दबावात आले आहेत. या काळात जगतिक बाजारातील रुईचे दर 98 ते 100 सेंट (1 डाॅलर) प्रति पाउंड तर देशांतर्गत बाजारात 7,800 ते 8,600 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. या काळात कापसाची आवक वाढल्यास बाजारातील आर्थिक दबाव आणखी वाढू शकताे. अशा परिस्थितीत दर काेसळण्याची भीती असते. हा आर्थिक दबाव वाढू नये, यासाठी शेतकऱ्यांनीच स्वत: स्टाॅकिस्ट (Stockist) हाेऊन बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवणे गरजेचे आहे.
अशी व्यवस्था व मानसिकता निर्माण व्हावी
देशात छाेट्या शेतकऱ्यांची संख्या किमान 85 टक्के आहे. या शेतकऱ्यांना दरवर्षी सरासरी 20 ते 35 क्विंटल कापसाचे उत्पादन हाेते. शिवाय, अनेकांकडे दिर्घ काळ कापूस साठवून ठेवण्यासाठी पुरेशी व सुरक्षित जागा नसते. त्यामुळे बहुतांश छाेटे शेतकरी शक्य तितक्या लवकर कापूस विकतात. 10 ते 15 टक्के शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस साठवून ठेवतात. प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन 35 ते 50 टक्क्यांनी घटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पादन विचारात घेता, कापसाला किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी आशाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापसाला दरवर्षी किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, याच दराच्या अनुषंगाने सरकी (Cotton seed), रुई (Lint), सूत (Yarn) आणि कापडाचे (Fabrics) दर स्थिर हाेती, अशी व्यवस्था व उद्याेजकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.
फार थाेड्या जिनिंग प्रेसिंग सुरू
एक जिनिंग-प्रेसिंग पूर्ण क्षमतेने चालवायला राेज किमान 1 हजार क्विंटल कापसाची आवश्यकता असते. या जिनिंग-प्रेसिंगला राेज 150 ते 200 क्विंटल कापूस मिळत आहे. त्यामुळे त्यांना आठवड्यातून केवळ एक ते दीड दिवस जिन चालवावा लागताे. अनेक जिनिंग-प्रेसिंग मालकांकडे कापूस खरेदीत दीर्घ काळ गुंवणूक करण्यासाठी माेठी रक्कम नाही. त्यामुळे त्यांनी कापूस खरेदी करणे टाळल्याने अनेक जिनिंग-प्रेसिंगसध्या बंद आहेत. गुंतवणूक करण्यासाठी पुरेसा पैसा असूनही रुईच्या गाठींना भरीव मागणी नसल्याने सध्या जिनिंग प्रेसिंग चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे देशातील फार थाेडे जिनिंग प्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली.
शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ टाळावा
‘भारतासाेबत जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन कमी हाेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कमी उत्पादन आणि स्थिर किंबहुना वाढत्या मागणीमुळे कापसाचे दर वाढू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता गरजेपुरता कापूस विकावा. उर्वरित कापूस टप्प्याटप्प्याने विकावा’, असा सल्ला कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक श्री गाेविंद वैराळे यांनी दिला. ‘सध्या कापसाच्या दरात चढ-उतार असला, तरी कापसाचे दर स्थिर हाेतील. बाजारात कापसाची आवक वाढली तर दर काेसळतील. सध्या सरकीचे दर कमी झाल्याने त्याचा कापसाच्या दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कापसाचे दर प्रति क्विंटल 200 ते 600 रुपयांनी उतरले आहेत. परंतु, शेतकऱ्यांनी या परिस्थितीला न घाबरता बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी’, असे मत काॅटन ॲडव्हायझरी बाेर्डचे माजी सदस्य श्री विजय निवल यांनी व्यक्त केले.