krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton yarn : होय! ह्याच सुताने स्वर्ग!!

1 min read
Cotton yarn : थंडीचे दिवस. कापूस फुटून वावरं पांढरी झालेली. दिवस लहान. पहाटे थंडीचा कडाका जास्तच. तरीही खेड्यातल्या पोरीबाळी सकाळी लवकर उठून कापूस (Cotton) वेचायला (Picking) वावरात जातात. त्यांच्या आया घरातली कामे आटोपून वावरात जातात. मग पोरीबाळी घरी येऊन, आंघोळ जेवण उरकून शाळेला जातात. दिवसभर शेतकऱ्यांच्या घरलक्ष्म्या कापूस वेचतात. पैसा वाचवायला स्वत:च्या वावरात. पैसा कमवायला दुसऱ्याच्या वावरात. कापूस वेचण्याच्या मजुरीचे दरही बरेच वाढलेत.

शेतीतील वजाबाकी व कापसाची बेरीज
पाठीवरच्या खांदाडीत कापसाचे ओझे जेवढे जास्त तेवढा घरलक्ष्मीचा चेहरा जास्त उजळतो. खांदड्या ओतून कापसाची गाठोडी बांधतांना शेतकरणीच्या चेहऱ्यावर हसू फुलते.पऱ्हाटीच्या नख्या, फांद्यांनी अंगावर ओरखडे आले तरी काही वाटत नाही. कारण तिने वावरातले पांढरे सोने वेचले असते. पांढरे सोने वेचतांना कमरेची काडी आणि पाठीचे खापर होते. पण एकदा गाठोडी घरी आली, काट्याला लागली की, शीण पळून जातो. घरधन्यानी कापसाचे वजन सांगितले की, तिला राजाची राणी झाल्यासारखे वाटते. शेतीत नेहमी वजाबाकीच असते. पण दर 2-3 वर्षांनी का होईना हा कापूसच बेरजेचे गणित करून देतो.

इंग्रज व विदर्भातील कापूस
पूर्वी स्थिती अशी होती की, एक गाडी कापूस विकायचा आणि एक तोळा‌ सोने घ्यायचे. हळूहळू
कापसाचे उत्पादन, कापसाचा उत्पादन खर्च आणि कापसाचा भाव यांचा ताळमेळ बसेनासा झाला. सोने घेणे शेतकऱ्याला अशक्य होऊ लागले. तरीही‌ शेतकरी सरकी पेरत राहिला, पऱ्हाटीची देखभाल करत राहिला. शेतकऱ्यांच्या घरलक्ष्म्या पावसापाण्यात, हाताची बोटे फुटली तरी पऱ्हाट्या निंदत राहिल्या. अंगावर ओरखडे झेलत कापूस वेचत राहिल्या. पाठीवर, डोक्यावर ओझी वागवत राहिल्या. इंग्रज साहेबालाही, त्याच्या देशातल्या गिरण्यांसाठी विदर्भातला कापूस आवडला होता. विदर्भातल्या कापसाची बाजारपेठ आणि वाहतुकीची व्यवस्था त्यानी स्वत:साठी केली.
काहींना वाटले की वाईसरायनी किती‌ छान सुधारणा केल्या. मॅंचेस्टर, लॅंकशायर इथल्या गिरण्यांना कापूस पुरवठा व्हावा म्हणून यवतमाळ – मूर्तिजापूर, अमरावती – बडनेरा, आर्वी – पुलगाव, खामगाव – जलंब रेल्वेमार्ग झाले. कापसाचा पुढचा प्रवास मुंब‌ई बंदरातून होऊ लागला. पण या व्यवहाराचा परतावा मात्र नव्हता.
‘कच्चा माल मातीच्या भावे।
पक्का होतासी चौपटीने घ्यावे।
मग, ग्रामजन कैसे सुखी व्हावे।
पिकवूनीया उपवासी।
राष्ट्रसंतांनी नेमक्या शब्दात वर्णन केलेले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर कापूस उत्पादनाचे क्षेत्र तेच आणि तसेच राहिले. गिरण्यांच्या जागा आणि गिरण्यांचे मालक तेवढे बदलले. आता गाजणाऱ्या आणि गजबजणाऱ्या ‘समृद्धी’ महामार्गावरून समृद्धीचे येणे जाणे दोन्ही कडून व्हावे ही शुभेच्छा आहे.

एकाधिकार कापूस योजना
1972 साली महाराष्ट्र सरकारने कापूस व्यापार हातात घेतला. कापूस ते कापड या प्रक्रियेतला
फायदा शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकाधिकार कापूस (Cotton monopoly) योजना सुरू झाली. हेतू चांगला होता. पण परिणाम भलतेच आणि भयंकर दिसले. योजना राबवताना पुढाऱ्यांची, त्यांच्या सग्या सोयऱ्यांची सोय झाली. ग्रेडर लोकांच्या मर्जीने कापसाची ग्रेड ठरू लागली. स्वत:च्याच कापसाच्या दर्जाबद्दल शेतकरी उदासीन झाला. ग्रेडर लोकांनी बंगले बांधले. घोळ आणि घोटाळे उजेडात येऊ‌ नये म्हणून ‘सरकारी’ कापूस पेटू लागला. शेतकऱ्याच्या घरात चुलीपर्यंत कापूस रचलेला असायचा. पण कधी बोंड पेटत नव्हते. योजनेतील नोकरशाहीमुळे त्या योजनेचा व्यापारी झालेल्या सरकारला फायदा होईना. शेवटी एकाधिकार कापूस खरेदी योजना गुंडाळावी लागली. केंद्र सरकारचीही कापूस खरेदीसाठी योजना – व्यवस्था आहे. पण शेवटी तीही सरकारीच! आयात निर्यातीचे धोरणच नेहमी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतले जाते, तेव्हा शेतकऱ्याचा शेतमाल कवडीमोलाचा होतो.

अर्थव्यवस्था बळकट करणारे पीक
2017 साली भारत वस्त्रोद्योग (टेक्सटाईल इंडिया) या कार्यक्रमात मा. पंतप्रधानांनी खूप महत्त्वाचा संदेश दिला होता. ते म्हणाले होते ‘कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी कृत्रिम वस्त्रांपेक्षा कापूस उत्पादन आणि सुती कापडावर भर दिला पाहिजे. विकास आणि समृद्धीसाठी नाविन्य‌ आणि संशोधन हाच मंत्र आहे.’ पण अजूनही म्हणावे असे संशोधन‌ शेतीक्षेत्रासाठी झाले नाही. 7 ऑक्टोबर 2020 ला दुसरा जागतिक कापूस उत्सव (कापूस दिवस) झाला. मा. स्मृती इराणी तेव्हा वस्त्रोद्योग मंत्री होत्या. त्या उत्सवात भारत‌ जगात कापूस उत्पादनात‌ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कापसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 60 लाख शेतकरी कुटुंबांची उपजीविका कापसावर आहे. हे कौतुकाने सांगण्यात आले. याच उत्सवात भारतीय कापसाच्या सूताला (Yarn) ब्रॅंड आणि लोगो मिळाला. भारताचे उत्तम सूत आता ‘कस्तुरी सूत’ (Kasturi Cotton) या नावाने ओळखले जाते. हिरव्यागार पऱ्हाटीच्या पानावर उमललेले कापसाचे पांढरे शुभ्र चमकदार बोंड असे मानचित्र मिळाले आहे. अर्थव्यवस्था बळकट करणारे, बळकट ठेवणारे कापसाचे नगदी पीक हे गतीने धावणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या हरिणाच्या नाभीतील कस्तुरीच आहे. मात्र त्याची‌ जाण शासनाला‌ नाही.

कृत्रिम धागे मानवी आरोग्य व पर्यावरणाला हानिकारक
कृत्रिम धागा (synthetic yarn) तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आयात करावा लागतो. कृत्रिम धाग्याचे कापड भारतीय हवामानात शारीरिक स्वच्छता आणि त्वचेच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यात घाम शोषला जात नाही. त्यामुळे त्वचा-विकार होतात. अपघाताने कपडे पेटल्यास त्वचेला चिकटतात. त्या जखमा चिघळतात. मुख्य म्हणजे त्या कपड्यांचे विघटन होत नाही. कृत्रिम कपड्यांचे मोठमोठाले ढीग कचऱ्यात पडलेले दिसतात. जमीन, पाणी, हवेच्या प्रदूषणाविरुद्ध फक्त कांगावा करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी कृत्रिम धाग्यांच्या कपड्यांचे हे पर्यावरणावर होणारे विध्वंसक आक्रमण लक्षात घेतले पाहिजे.

जनुकीय बदल व कृषितंत्रज्ञान
कापसाचे उत्पादन आणि साठवणूक याकडे लक्ष दिले तर वाढत्या लोकसंख्येला सुती कपड्यांचा पुरवठा सहज होऊ शकतो. त्यासाठी जनुकीय सुधारणा केलेले जीएम बियाणे ( Genetically modified organisms) शेतकऱ्यांना मिळायला हवे. जीएम बियाणे म्हटल्यावर काही लोकांच्या चेहऱ्यावर भयग्रस्त प्रश्नचिन्ह दिसते. खरेतर निसर्गच अनेक वनस्पतींमधे जनुकीय बदल घडवून आणतो. आंबे, पेरू, द्राक्ष, केळी या अस्सल भारतीय फळांमधे किती प्रकारची विविधता आपण अनुभवत आहोत. वांगी, टमाटे, मिरची, भोपळा या भाज्यांमध्येही कितीतरी प्रकार आहेत. वांगी तर जांभळी, हिरवी, पांढरी, रेषांची काटेरी, काही अगदी छोटी, काही एकाच वांग्याच वजन अर्धा किलोपेक्षा जास्त. मिरचीचे लवंगी मिरचीपासून भोपळी मिरचीपर्यंतचे सगळे प्रकार आवडीने खातो. आंब्याचे अक्षरश: शेकडो प्रकार आंबा महोत्सवात असतात. हे सगळे बदल जमीन, हवा, पाणी या घटकांमुळे निसर्ग घडवून आणतो. हे बदल अतिशय सावकाश होतात. काही वर्षांचा कालावधी लागतो. हेच बदल कमी‌ वेळात, प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ घडवून आणतात. जास्त लोकसंख्येला चांगल्या पद्धतीने जगता येण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यासाठी कृषिक्षेत्रात‌ प्रगत तंत्रज्ञान येणे आवश्यक‌ आहे. शिक्षणक्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, संवाद क्षेत्र, दळणवळण, बांधकाम क्षेत्र, युद्धक्षेत्र सगळीकडे जगातील अद्ययावत् तंत्रज्ञान आणण्याची घाई असते. पण शेतीक्षेत्रात मात्र तंत्रज्ञानाला बंदी आहे. देशातील विचारवंतांनी, बुद्धीवंतांनी शेतीक्षेत्रात तंत्रज्ञानाचा आग्रह धरला पाहिजे. शेतीशी संबंध नसलेले बुद्धीवादी अमेरिका आणि इस्राएलमधल्या शेतीचे उदाहरण देतात. त्या देशांमध्ये शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे आणि बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आहे तर आपल्या देशात शेतकऱ्याच्या हातापायात वेगवेगळ्या बंदीच्या बेड्या आहेत.

सरकीचा मानवी खाद्य म्हणून वापर
भारतात शेतीक्षेत्रातल्या उदासीनतेमुळे भारतीय संशोधक परदेशात जाऊन संशोधन करत आहेत. जास्त दर्जेदार कापसाच्या जास्त उत्पादनाबरोबरच जास्त उपयुक्तता देखील विचारात घेतली जाते. सरकीत असणारे गॉसिपॉल (Gossypol) हे संयुग मानवी पचन संस्थेला हानिकारक आहे. मात्र‌ खाल्लेले अन्न रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते अतिशय लाभकारक आहे म्हणून गाई म्हशींना सरकी खाऊ घालण्याची पद्धत आहे. संशोधकांनी जनुकीय सुधारणा करून सरकीतील गॉसिपॉल हे संयुग काढून‌ टाकण्यात यश मिळवले आहे. त्या वाणाच्या कापसाची सरकी माणसांच्याआहारासही उपयुक्त आहे. म्हणजे नुसते वस्त्रच‌ नव्हे तर उत्तम खाद्यतेलही ह्या सुधारित वाणापासून आपल्याला मिळू‌ शकते.

समृद्धीसाठी कृषिक्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता
जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाला मागणी आहे. देशातील बाजारपेठेतही सुती कपड्याला भरपूर‌ मागणी‌ आहे. कापसाचे उत्पादन, साठवणूक आणि कापूस ते कापड प्रक्रिया यात आधुनिक‌ तंत्रज्ञान आले तरच देशात समृद्धी येईल. स्वर्ग ही काही उंच आकाशात ढगांच्या पलीकडे असलेली वसाहत नव्हे. स्वर्ग म्हणजे शांत, समृद्ध, सुरक्षित, सुखी, समाधानी समाज! अशा समाजाच्या स्थैर्यासाठी कृषिक्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याची आवश्यकता आहे. हाच सुताचा धागा समाजाला स्थैर्य आणि समृद्धी देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!