Maize export ban : मक्यावर निर्यात बंदी लादण्याचे संकेत
1 min read मक्याच्या दरात वाढ
सध्या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मक्याच्या किमती 2,150 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त आहेत. एगमार्कनेटवरील उपलब्ध आकडेवारीनुसार 1 ते 12 डिसेंबर दरम्यान देशभरातील बाजारपेठांमध्ये मक्याचा सरासरी भाव 2,174 रुपये प्रति क्विंटल होता. मक्याचा भाव गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1,654 रुपये प्रति क्विंटल आणि मक्याच्या 1,962 रुपये प्रति क्विंटलच्या हमीभावापेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे मक्याच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याचे संकेत मिळतात, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.
भारतीय मक्याला भरीव मागणी
बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, श्रीलंका, इंडोनेशिया, तैवान या देशातून भारतीय मक्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मक्याचे दर चढेच राहिले आहेत. देशातील खरीप मक्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या 22.63 दशलक्ष टनांवरून 23.1 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जीएम मोहरीमध्ये अधिक उत्पादन क्षमता
जीएम मोहरी डीएम-11 (GM Mustard DM-11) या वाणाची तीन वर्षांपासून चाचणी घेतली जात आहे. माेहरीच्या या वाणाचे सध्याच्या तुलनेत सुमारे 28 टक्के अधिक उत्पादन हाेत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.
गव्हाच्या घाऊक किमतीत वाढ
सरकारी आकडेवारीनुसार जानेवारीपासून देशभरात गव्हाच्या सरासरी घाऊक किमतीत (Average wholesale prices of wheat) 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये गव्हाचा सरासरी घाऊक दर 2,228 रुपये प्रति क्विंटल होते. ते नोव्हेंबरमध्ये 2,721 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. गव्हाचे अखिल भारतीय मासिक सरासरी घाऊक दर
जानेवारी 2022 – 2,228 रुपये
फेब्रुवारी 2022 – 2,230 रुपये
मार्च 2022 – 2,339 रुपये
एप्रिल 2022 – 2,384 रुपये
मे 2022 – 2,352 रुपये
जून 2022 – 2,316 रुपये
जुलै 2022 – 2,409 रुपये
ऑगस्ट 2022 – 2,486 रुपये
सप्टेंबर 2022 – 2,516 रुपये
ऑक्टोबर 2022 – 2,571 रुपये
नोव्हेंबर 2022 – 2,721 रुपये
प्रति क्विंटलपर्यंत वाढले.
गव्हाच्या उत्पादनात घट
मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गहू उत्पादनात घट झाली. तसेच रशिया – युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे गव्हाच्या किमती वाढल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली.
रब्बी पीक पेरणीक्षेत्र वाढले
चालू हंगामात (सन 2022-23) देशभरात रब्बी पीक पेरणीक्षेत्रात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार देशात 9 डिसेंबर 2022 पर्यंत 526.27 लाख हेक्टरमध्ये विविध रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी हे क्षेत्र 457.80 लाख हेक्टर एवढे होते. यात सर्वाधिक वाटा गव्हाचा असल्याचेही केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
विविध पिकांचे लागवडक्षेत्र
देशात मागील वर्षी (सन 2021-22) 203.91 लाख हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली हाेती.हे क्षेत्र यावर्षी 255.76 लाख हेक्टरवर पाेहाेचले आहे. रब्बी कडधान्याखालील क्षेत्रात 3.30 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मागील वर्षी देशात 123.77 लाख हेक्टरमध्ये कडधान्याची पेरणी करण्यात आली हाेती तर यावर्षी हे क्षेत्र 127.07 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र 2.14 लाख हेक्टरने वाढले आहे.भरड आणि पौष्टिक धान्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात 4.34 लाख हेक्टरची वाढ नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या 32.05 लाख हेक्टरमध्ये या पिकांची पेरणी करण्यात आली हाेती. यावर्षी हे क्षेत्र 36.39 लाख हेक्टरवर पाेहाेचले आहे.