krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agritourism : कृषी पर्यटन आणि अभावातले सुख….!

1 min read
Agritourism : ऐकून विचित्र वाटेल. पण सध्या अभावातले सुख (Lack of happiness) अनुभवण्याची फॅशन (Fashion) आहे. फॅशन म्हणजे श्रीमंत लोकांनी सुरू केलेली एखादी पद्धत! श्रीमंत लोकांना अधूनमधून अभाव अनुभवायला सुद्धा गंमत येते. कोविडने केलेली नाकेबंदी संपली आणि शहरांनी पुन्हा गती घेतली. शहरातल्या रस्त्यारस्त्यावर घड्याळाच्या काट्यांवर चाके गरगरू लागली. खेड्यात‌ शेतीची कामे अजूनही कोंबड्याच्या बागाला सुरू होऊन एक प्रहर रात्र होऊन गेली की संपतात. घड्याळ्या इतक्याच काटेकोरपणे शेतीची कामे करावी लागतात. कोविड काळात तशीही फक्त शेतीचीच कामे सुरू होती. दोन वर्षे कुठेच जाता आले नाही म्हणून बेचैन झालेले शहरवासी विशेषत: नोकरदार पर्यटनासाठी नव्या उत्साहाने निघाले.

कृषी-पर्यटन आणि सुखाची कल्पना
सध्या कृषि-पर्यटन (Agritourism) बरेच लोकप्रिय होत आहे. या पर्यटनासाठी कुठल्याही खेड्यात नाही तर कृषि-पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एखाद्या ‘स्पॉट’वर जायचे. तिथे खूप छान गवताच्या झोपड्या, गवताने किंवा‌ बारीक कौलांने‌ शाकारलेले ‘खेड्यावरचे कौलारू घर, शेणामातीने सारवलेली जमीन, भिंती, भिंतीवर चुन्याची नक्षी, त्यात गेरूचे ठिपके, चुलीवरचा सैपाक (स्वयंपाक) आणि स्वच्छ मोकळी हवा..! असा आनंद अनुभवून पर्यटक म्हणतात, खेड्यात आणि शेतीत इतकं सुख असताना… तुम्ही काय मोर्चे काढता? आंदोलनं करता? तुम्ही सुखी आहात, हे तुम्हाला समजत नाहीये…’

🌐 अव्यवहार्य सल्ले
याला अभावातले सुख म्हणतात आणि ते सुख 2-4 दिवसच सुखाचे वाटते. पंखे, कुलर, एसी, चारचाकी गाड्या, गुळगुळीत टाईल्सचे लखलखत्या दिव्यांचे बंगले. पंचतारांकित हॉटेलमधले पिणे आणि खाणे. अशा‌ राहणीमानात राहताना सहज बदल म्हणून ही मंडळी कृषी-पर्यटनाला खेड्यात येतात. दोन दिवस त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतल्या सुखाच्या अभावात त्यांना गंमत वाटते. कारण त्यांना माहीत असते की, पुन्हा 2-4 दिवसांनी आपण आपल्या‌ नेहमीच्या पद्धतीत जगायला लागणार आहोत. हे लोकं मग कृषी-पर्यटनाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. शेती एके शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कृषी-पर्यटन जास्त फायदेशीर आहे, असे‌ सांगू लागतात. आपले बोलणे अव्यवहार्य आहे, हे‌ त्यांच्या लक्षात येत नाही. या लोकांचा प्रत्यक्ष शेतीशी काहीही संबंध नसतो. त्यांच्याजवळ पैसा भरपूर असतो. त्यामुळे ‘सावली, हिरवळ, खळ्यात-मळ्यात’ असे काहीतरी छान नावं असलेल्या या शेतांची प्रवेश फी ते सहज देऊ शकतात.

🌐 शेतीतल्या सुखाचे नाटक
अशा ठिकाणी मुद्दाम लावलेल्या दुतर्फा झाडीतून लाल रंगाचा मातीचा अरुंद रस्ता असतो. 5-7 एकराच्या परिसरात शेताचे नेपथ्य उभारले जाते. झोपड्या, समोर छोटी पडवी, तिथे एका‌ खांबाला कंदील‌ टांगलेला. सैपाकासाठी चूल, ओसरीवर पाण्यासाठी रांजण. भाजीचा मळा, थोडा‌ मका किंवा ज्वारी-‌बाजरी‌ पेरलेली. थोडी फळझाडे. फुलबाग, पाण्याचे पाट, रहाट किंवा खिराडी ‌असलेली‌ विहीर, पोहण्यासाठी वेगळी‌ विहीर, आंब्याच्या झाडाला बांधलेले झोके, गोठा- गोठ्यात शोभेसाठी गाई वासरे, थंडीच्या दिवसात शेकोटी, परसदारी कोंबड्यांचे खुराडे आणि काम करायला‌ खास खेडवळ वेशात राहणारा, खेडवळ बोली बोलणारा नोकरवर्ग…! शेतीतल्या सुखाचे
एक नाटक उभे राहते. ज्यांच्या एक दोन पिढ्यांपूर्वी शेतीशी‌‌ संबंध होता, असे लोक चुकूनही अशा‌ खेड्यातल्या-शेतीतल्या सुखासाठी पैसे मोजत नाहीत. कारण त्यांनी त्या अभावातच दिवस काढले असतात. त्या वातावरणाचे त्यांना मुळीच कौतुक‌ नसते. उलट त्या वातावरणापासून, खेड्यांपासून, मुख्य म्हणजे शेतीपासून दूर झाल्यावर एक सुटकेचा‌‌ नि:श्वास ते सोडतात.

🌐 राजकारणातील अर्थकारण आणि फार्म हाऊस
याच्या उलट चित्र म्हणजे फार्म हाऊस (Farm house). इतर अनेक मार्गांनी पैसा मिळवणाऱ्यांचे‌ फार्म हाऊस असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण असते. अवतीभवती शेत आणि मधे सगळ्या अत्याधुनिक‌ सुखसोईंनी सुसज्ज असा श्रीमंत बंगला. या फार्म हाऊस भोवती गूढ काहीसे दहशतीचे वातावरण आणि भितीचे कुंपण असते. खास लोकांना खास प्रसंगानाच इथे प्रवेश असतो. मिळवलेला‌ पैसा शेतीतच कमावल्याचे भासवले‌ जाते. राजकारणातील अर्थकारण ज्यांना समजले त्यांचे फार्म हाऊस असते.

🌐 नोकरदारांचा भावाला सल्ला
अनेक कुटुंबांमधे नोकरदार भावाला शेतीवर जगणाऱ्या भावाच्या शेती करण्याच्या‌ पद्धतीत‌ चुकाच चुका‌ दिसतात. ‘आमच्या ऑफिसमधल्या अमक्याचा तमका कशी पद्धतशीर शेती करतो. भरपूर उत्पन्न होते त्याला. त्याच्या‌ शेतावर जाऊन‌ बघा…!’ असा सल्ला ते‌ देतात. अर्थात काही कुटुंबात‌ आपली साहेबी शहरातच ठेऊन वडिलांना, भावाला मदत करताना, कडबा रचू लागणारे, ओलीत करू लागणारे, सहजपणे छतावर वाळवण चढवणारे, खाली उतरवणारेही भाऊ असतात. पण, असे फारच कमी. काही साहेब लोक आपल्याच खेड्यात कृषी-पर्यटनाला येतात. शेतीच्याच वातावरणात लहानाचे मोठे झालेल्या साहेबांना, ‘शेतीत दरवर्षी वजाबाकी आणि 2-3 वर्षांनी एखादी‌ बेरीज’ हे आता पटत नाही.

🌐 शेतकरी भावाला दिलेली प्रशस्तीपत्रे
या पर्यटकांची आणखी एक गंमत असते. हे खेड्यात आले की, शेतकरी भावाच्या कुटुंबाला शहाणे करून सोडायचे असे ठरवतात. शेतकरी भावाचे राहणीमान, बोलभाषा, घरातला वापर, खाण्या जेवण्याच्या सवयी, सगळेच यांना कमी प्रतीचे, खेडवळ वाटू लागते. शहरात आपण कसे स्वच्छ घरात राहतो, मॅनर्स पाळतो, हे सांगणे सुरू होते. यांना चुलीतल्या धुराचा, अंगणातल्या‌ धुळीचा त्रास होतो. शेणाच्या वासाने डोके दुखते, विहिरीच्या पाण्याने पोट दुखते. जर शेतकरी भावाला शेतीसाठी पैसा दिला असेल तर दुखणे गंभीर होते. यांचे एक घोषवाक्य असते. ‘शेतकऱ्याकडे काय सगळेच तर घरचे असते’ भुईमूग, गहू, ज्वारी, तूर, चणा घरचेच, लिंबे, कैऱ्या, चिंचा घरचेच. दूधही घरचेच…! मग शेतकरी भावाला त्याच्या कुटुंबाला यथासांग उपदेश करून ही मंडळी निघताना घरचेच पिशव्या भरून घेतात आणि डाळीत डोळ खूप आहेत, ज्वारीत‌ बोंडे राहिली आहेत, गव्हात कुशा जास्त आहेत, तांदुळात चुरी आहे.., अशी प्रशस्तीपत्रे देऊन जातात.

🌐 शेतीतला माल घरचाच, फुकटचाच
शेतकऱ्यांच्या कुटुंबात आधी गव्हाचा ‌मातेरा, तुरीचे मुलण, शेंगदाण्याची फूट हे स्वच्छ करून वापरून संपवण्याची पद्धत असते. उडीद, मूग, मटकी, चणा, चवळीही ठसठशीत ते बियाला ठेवायचे. बाजाराला पाठवायचे आणि आधी बारीक चुरीक स्वच्छ करून कांडून भरडून सैपाकात वापरून संपवायचे, अशी पद्धत असते. पण या अनुभवातून गेलेल्यांना साहेब झाल्याबरोबर या काटकसरीचा विसर पडतो. शहरात कसे सगळे स्वच्छ आणि चांगले मिळते, हे बोधवाक्य ते ऐकवून जातात. शहरात अनेक व्यवसाय, त्यांची अनेक दुकाने, पण घरचाच माल म्हणून साड्या, कपडे, भांडी, खेळणी, औषधे कोणी पिशवी भरभरून देताना‌‌ दिसत नाही. शेतीतला माल मात्र घरचाच. फुकटचाच!

🌐 शेतकऱ्यांचे पर्यटन व अभ्यास दौरे
शेतकरी सुद्धा कधीकधी पर्यटनाला‌ निघतो. त्याची धाव जवळपासच्या यात्रेजत्रेपर्यंत. खिशाला परवडेल इतकेच पर्यटन. चुकून माकून मोठ्या शहरात गेला तर तिथला झगमगाट पाहून, पुन्हा खेड्यात आल्यावर स्वत:लाच हरवून बसतो. आजकाल अनेक संस्था, कधी सरकारी यंत्रणा, काही शेतकऱ्यांना परदेशात शेतीच्या अभ्यासासाठी पाठवतात. अशा शेतकऱ्यांचे प्रमाण किती? अशा अभ्यास दौऱ्यांचा इतर शेतकऱ्यांना उपयोग किती? त्यांना इथल्या व्यवस्थेची मदत किती? हा अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास झाल्यानंतर, नवीन तंत्रज्ञान, नवीन उपकरणी, विशेषत: नवीन सुधारित बियाण्यांना शेतीच्या धुऱ्यावरच अडवले जात असेल तर या अभ्यास दौऱ्यांचा उपयोग काय?

🌐 कृषी-पर्यटनाचे बोन्साय
परदेशातले कृषी-पर्यटन डोळे दीपवणारे असते. पुराणकालीन मंदिरे, इतिहासकालीन गड किल्ले, गावे बघण्याचा अनेकांना छंद असतो. अनेकजण त्याचा अभ्यासही करतात. पण त्यांचेही ते ‘बघणेच’ असते. जगणे नव्हे. प्रचंड मोठे, शेकडो पारंब्यांनी विस्तारणाऱ्या वडाच्या भव्य झाडाचे फूटभर बोन्साय करावे, त्याचे तिकीट लावून प्रदर्शन करावे, असे आपल्या देशातील कृषी-पर्यटन आहे. दरवर्षी अस्मानी सुलतानीचे भूकंप आणि आर्थिक अडचणींच्या दरडी कोसळून, दबत, खचत जाणारी कृषिप्रधान देशाच्या कृषh संस्कृतीची गढी, पर्यटनापुरती तरी जिवंत राहील का? कृषी संस्कृतीचे मोहंजोदरो होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!