Soybean rate : शेतकऱ्यांनाे साेयाबीन विकण्याची घाई करू नका!
1 min read🌍 स्टाॅक लिमिट व वायदे बंदी
देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलाचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने 8 ऑक्टाेबर 2021 राेजी सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाेबतच तेलबियांवर 31 मार्च 2022 पर्यंत व नंतर 30 जून 2022 ते 31 डिसेंबर 2022 या काळासाठी स्टाॅक लिमिट लावले. पुढे केंद्र सरकारच्या आदेशान्वये सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) 20 डिसेंबर 2021 राेजी वायदे बाजारातील (Future market) तेलबियांच्या साैद्यांवर बंदी घातली. यात साेयाबीनचाही समावेश हाेता. परिणामी, मागच्या हंगामात 10,000 रुपये प्रति क्विंटलवर गेलेले साेयाबीनचे दर झपाट्याने खाली आले.
🌍 राज्यांना अधिकार
केंद्र सरकारने स्टाॅक लिमिट लावल्यानंतर खाद्यतेल आणि तेलबियांचे स्टाॅक ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला हाेता. त्यामुळे बहुतांश राज्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती. या निर्णयामुळे बाजारातील किरकाेळ व घाऊक विक्री साखळी प्रभावित झाल्याने तसेच व्यापाऱ्यांना माेठे व्यवहार करणे व स्टाॅकिस्टला माेठी गुंतवणूक करून साेयाबीनचा स्टाॅक करणे कठीण झाल्याने खुल्या बाजारात इतर तेलबियांसाेबत साेयाबीनचे दर दबावात आले हाेते. हा दबाव आजही कायम आहे. स्टाॅक लिमिट काढल्याने व्यापाऱ्यांना माेठे व्यवहार व स्टाॅकिस्टला त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करून साठा करण्यास मुभा मिळाल्याने हा दबाव हळूहळू कमी हाेत असून, साेयाबीनच्या दरात सुधारणा हाेत आहे.
🌍 दरात सुधारणा
आंतरराष्ट्रीय बाजारात नाेव्हेंबरच्या सुरुवातीपासून सोयाबीन, सोयातेल आणि सोयाढेपेच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली आहे. याचे परिणाम देशांतर्गत बाजारातील साेयाबीनच्या दरावर जाणवायला लागले आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनचे दर 3,700 ते 4,800 रुपये प्रति क्विंटल होते. मागील सहा दिवसात (नोव्हेंबरचा पहिला आठवडा) साेयाबीनच्या दरात प्रति क्विंटल 200 ते 450 रुपयांची वाढ झाल्याचेही दिसून आले. मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन व अशोकनगर तर राजस्थानातील कोटा व बाराण, महाराष्ट्रातील लातूर, अकोला व नागपूर बाजारपेठेत सोयाबीनच्या कमाल दराने प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपयांपर्यंत मजल मारली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थानातील काही बाजारपेठांमध्ये हेच दर 5,000 ते 5,200 रुपये प्रति क्विंटलवर पाेहाेचले हाेते. आंतरराष्ट्रीय बाजारात नाेव्हेंबरच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर प्रति बुशेल (1 बुशेल म्हणजे 28 किलो) 14.54 डाॅलरवरून 14.39 डाॅलरवर आले. या दरात राेज 10 ते 45 सेंट प्रति बुशेलचा चढ-उतार सुरू आहे. सोयाढेपेचे दर 436 डाॅलर प्रतिटनावरून 429.40 डाॅलरवर आले आहे. साेयाढेपेच्या दरातही 4 ते 7 डाॅलर प्रति टनाचा चढ-उतार सुरू आहे. सोयातेलाचे दर 2 टक्क्यांनी वाढून 73.40 सेंट प्रतिपाऊंडवर पोहाेचले आहेत. त्यामुळे भारतात साेयाबीनला सरासरी 4,950 रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला.
🌍 सहा हजाराचा टप्पा गाठणार
रशियाने युक्रेनसाेबतचे व्यापार व निर्यात करार संपुष्टात आणले आहे. त्यामुळे रशियाची युक्रेनमधून हाेणारी सूर्यफूल तेलाचा थांबली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. दिवसागणिक साेयाबीनमधील ओलावा (माॅईश्चर – Moisture) कमी हाेत असून, बाजारातील साेयाबीनची आवक हळूहळू वाढत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय साेयाढेपेची मागणी (Demand) कमी असल्याने निर्यात (Export) थांबल्यागत आहे. नाेव्हेंबरमध्ये ढेपेच्या उत्पादनासाेबत मागणी व निर्यातीत हळूहळू वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या महिन्यात साेयाबीनचे दर 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साेयाढेपेची मागणी आणि निर्यात वाढल्यास डिसेंबर 2022 मध्ये साेयाबीनचे दर 6,500 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, हे दर चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला मिळणार.
🌍 आवक स्थिर ठेवणे महत्त्वाचे
प्रत्येक बाजारपेठेचे कॅश लिमिट, गाड्या लाेडिंग-अनलाेडिंग, स्टाॅक यासह अन्य बाबींची मर्यादा ठरलेली असते. साेयाबीनची आवक वाढल्यास ही मर्यादा प्रभावित हाेण्याची शक्यता असते. अशावेळी दर कमी हाेतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळणे व चांगला दर मिळविण्यासाठी बाजारातील साेयाबीनची आवक (Arrival) स्थिर ठेवणे आणि टप्प्याटप्प्याने विक्री करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साेयाबीन विकण्याची घाई न करता बाजारपेठेतील दरावर लक्ष ठेवून साेयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा.
चांगली उपयुक्त माहिती देता
Nice information