krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer problem : बळीराजाची बोगस बोंब नव्हे, लुटरूंचा कांगावा हाेय!

1 min read
Farmer problem : शेतकर्‍यांवर बरेच तोंडसुख घेतले जाते. शेतकरी नुकसानीबद्दल नेहमीच बोंबलत असतात. ज्यावर्षी शेतीत चांगलं पिकतं, त्यावर्षीची कमाई ते सोने खरेदीवर उडवतात. पिकलेल्या वर्षीची कमाई नापिकीच्या वर्षासाठी वापरली तर मदत करा, कर्जमाफी द्या, अनुदाने द्या, अशा बोंबा मारण्याची गरज पडणार नाही. ही बळीराजाची बोगस बोंब आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या बोंबलण्याकडे दुर्लक्ष करावे. शेतकरी कोणत्याही प्रकारचा कर भारत नसतात. करदात्यांनी भरलेल्या रकमेतून त्यांना मदत करणे थांबवले पाहिजे. शेतकर्‍यांच्या Farmer अडचणी Problem आणि शेतीतील धोक्यांचा अभ्यास न करता असे व्यक्त होणे हे समस्त उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांचेही आहे. शेतकरी फुकटे, दारुबाज, अडाणी, कर्ज काढून पोरींचे लग्न करणारे, उठसूठ तालुक्याच्या गावी जाणारे, लफडी करणारे, चैन करणारे म्हणून टिंगल टवाळी करणारी मध्यमवर्गीय मानसिकता फार जुनी आहे.

🌐 केवळ कष्ट, कष्ट आणि कष्ट
परवा मी नदीवाडी ता. निलंगा, जिल्हा लातूर येथे माझे मित्र शिवाजी पाटील यांचेकडे गेलो होतो. माझे चांगले मित्र, राजकारणात गेले असते किंवा ठरवले असते तर करोडपतीही झाले असते आणि मोठ्या राजकीय पदावर आसनस्थ झाले असते. सज्जन आणि हुशार ग्राहस्थ, अर्थशास्त्र आणि राजकारणाचे चांगले जाणकार. शेतीवर प्रचंड प्रेम करतात, म्हणून शेतातच अडकले. दोन दिवस मी त्यांचे कुटुंबीय आणि ते काय काय करतात ते पाहत होतो. त्यांची चार जागी तुकड्यात विखुरलेली चाळीस एकर शेती आहे. (डाव्याच्या भाषेत गावातले अंबानी) मोठे शेतकरी, दोन मुलं, ते स्वतः आणि एक सालदार नोकर मिळून शेती करतात. नातूही अलीकडे शिकत शिकत त्यांना मदत करतो. शेती गावापासून दोन किलोमीटर अंतरावर. अनेक कूपनलिका घेवून झाल्या. पाण्याने टांग मारली. खर्च वाया गेला. दहा बारा वर्षापूर्वी मोठे कर्ज काढून नदीवरून दोन तीन किलोमीटर पाईपलाईन केली. पण अपवाद वगळता नदीला पाणीच थांबले नाही. बँकेचे काढलेले कर्ज आणि व्याज कोरडवाहू पिकाच्या उत्पादनातून भरावे लागले. अनेक वर्षाच्या खंडानंतर धनेगावच्या धरणात पाणी साठले म्हणून नदीला पाणी आले. जुनी पाईपलाईन कामाला आली. या वर्षी चार एकर ऊस लावला. कुटुंबात एक मोटरसायकल. पहाटेपासून कामाची लगबग चालू होते. न्याहारी, दुपारचं जेवण, घरून शेताकडे जाणे येणे, अचानक लागणार्‍या वस्तूंची ने आण करणे, बाजार गावाला जाणे, लाइटच्या लहरीप्रमाणे मोटर चालू बंदवर लक्ष ठेवणे, पाहुण्या मित्रांचे कार्यक्रम उरकणे, या सर्व कामासाठी मोटरसायकल अपुरी पडते. मोबाईलमुळे एकमेकांशी संपर्क करणं सोपं झालं असलं तरी धावपळ व्हायची ती होतेच. घरातील तीन ते चार गडी आणि एक सालदार गडी दिवसरात्र कामात व्यस्त असतात.

🌐 डोळ्यासमोर होत्याचे नव्हते होते
फिरत मळ्यात गेलो. ऊस पाण्याला आलेला. या वर्षी पाऊस सलगपणे पडला, म्हणून मध्यंतरी नदीवरील मोटार काढली. आता पावसाने उघडीप दिली. त्यामुळे मोटर बसवायची आहे. नदीपर्यंत वाहन जात नाही. माणसांनी ती उचलून न्यावी लागते. पाच सहा माणसांची गरज असते. मळ्यातील सोयाबीन पावसाअभावी सुकायला लागलंय. त्याला विहिरीवरील स्प्रिंकलरने पाणी चालू केलाय. पाऊस नाही आला तर बाकीच्या तुकड्यातील सोयाबीन कितपत हाती लागेल माहिती नाही. म्हशी आणि बैलांना वेळच्या वेळी चारापाणी करावे लागते. दोन एकर सोयाबीन खूप पातळ झालय. त्याला पाळी घालायचीय. पाळी घातल्यानंतर पाऊस नाही पडला तर ओल उडून जाऊ शकते. त्यामुळे रबीचे पीक उगवण्याची शक्यता मावळते. घाई करावी लागणार असते. पुढे शेंडेपावसाचे प्रमाण वाढू शकते, त्याची चिंता असतेच. मध्येच शिवाजीराव यांना चार दिवस गावाबाहेर जावे लागले. मुलं आणि सालदार गडी शेतीच्या अन्य कामात गुंतल्यामुळे सोयाबीनकडे दुर्लक्ष झाले. औषधी फवारायला उशीर झाला. अळ्यांनी खाल्ले, 30-40 टक्के नुकसान झाले. हरणांचे कळप, लाइटच्या लहरीप्रमाणे रात्रीअपरात्री शेताला पाणी देणे, शेतात निघणारे विंचू, साप, आदीपासून असुरक्षितता, डुकरांच्या झुंडी, गोगलगाई, तुडतुडे, मोरं, उंदीर, पाखरं आदीपासून पिकांचे संरक्षण, अतिवृष्टी, उघडीप, अवेळी पडणारा पाऊस, न पडणारा पाऊस, वादळ, गरपीट, या पैकी कोणत्या आपत्तीला कधी सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. बघता बघता डोळ्यासमोर होत्याचे नव्हते होऊन जाणे हा त्यांचा नित्याचा अनुभव.
एवढी क्रूर मानसिकता कशामुळे तयार होत असावी?

🌐 मध्यमवर्गीयांची मानसिकता
शेती बंद दाराआड केला जाणारा उद्योग नाही. उत्पादन किती येईल, त्याला भाव काय मिळेल, हाती किती पैसे लागतील, काही भरवसा नाही. हे वास्तव मध्यमवर्गीयांना सांगणार कोण? नैसर्गिक आपत्तीचा दणका केवळ शेतकर्‍यांनी सोसावा आणि आम्हाला स्वस्तात धान्य उपलब्ध करून द्यावे. ही क्रूर मानसिकता कशामुळे तयार होत असावी? सुरक्षित पगार, वरकमाई, महागाई भत्ते, दारात गाड्या, इंग्रजी शाळेत शिकणारी मुलं असे सुखवस्तू मध्यमवर्गीय, विकेंडला हजारोंची उधळण करतात. त्यांना हे कसं सांगायचं की अरे बाबांनो, या माझ्या शेतकरी मित्रासाठी सहकुटुंब फिरायला जाणे ही चैन आहे. आयुष्यात तो एकदाही बायकोसोबत बाहेर पडला नाही. कोणते व्यसन नाही, अतिरिक्त खर्च नाही, चांगले उत्पादन सातत्याने घेतो. आवश्यक असून अद्याप त्याला घर बांधता आले नाही.

🌐 स्वप्नांचा चुराडा
दोन्ही मुले शेतीच्या बाहेर पडले नाहीत ही सल मनात असलेल्या या मित्राने नातवंडांना शिकवण्यासाठी लातूरला भाड्याने घर घेतले. एक नात बेसबॉल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेली चांगली खेळाडू. तिला तिकडे भविष्य असेलही, पण ती रिस्क परवडत नाही म्हणून विज्ञान शाखेत घालावे लागले. अन्य नातवंडांचीही काही स्वप्नं असतील. शेतकर्‍यांना आर्थिक मर्यादेत राहूनच भविष्याचे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांना स्वप्ने बघण्याचा हक्क नाही. आपल्या मुलानातवंडांच्या स्वप्नांचा चुराडा होताना बघणे क्लेशकारक असले तरी त्या डागण्या सोसत आयुष्य कंठावे लागते. देशातील काेट्यवधी शेतकरी असेच जगतात.

🌐 माफक अपेक्षा
एवढे आघात सहन करूनही माझा मित्र तुम्हाला कोणतीही मदत मागत नाही. कर्जमाफी, अनुदान, नुकसान भरपाई काही काही मागत नाही. केवळ स्वातंत्र्य मागतोय. मला माझ्या मर्जीप्रमाणे शेती करु द्या. माझ्या मर्जीप्रमाणे माझा माल विकू द्या. माझ्या शेतात मर्जीप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान वापरूद्या. मध्यमवर्गीय नागरिकांना धान्य स्वस्तात मिळवून देण्यासाठी सरकारने माझ्या शेतीमालाचे भाव पाडण्यासाचे कारस्थान करू नये. एवढीच त्याची माफक अपेक्षा आहे. शेतात भरभरून पिकले तर खुशाल माझ्या मालाचे भाव पडू द्या. तुम्ही स्वस्त घेवून खा. पण माझ्याकडेच कमी पिकले आणि माल थोडा महाग झाला तर तुम्ही ओरडून सरकारवर दबाव आणू नका. काही दिवस थोडे महाग घेवून खा. ही माझी बोगस बोंब नाही, तुम्हीही विनाकारण कांगावा करू नका!

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!