krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton Researchers : कापसाचे आद्य संशोधक महर्षी गृत्समद आणि कॉटन वेंकय्या!

1 min read
Cotton Researchers : महर्षी गृत्समद (Maharishi Gritsamad) हे ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाच्या ऋचांचे रचनाकार आणि कापसाचे आद्य संशोधक (Cotton Researchers). यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावाला त्यांनी कापसाच्या लागवडीचा पहिला प्रयोग केला, अशी पुराण व इतिहासात नाेंद आहे. म्हणजे ऋग्वेद काळाच्या पूर्वीपासून कापूस आणि त्याचा उपयोग भारतीय खंडात माहिती होता. ऋग्वेदात फेटा, पागोटे या अर्थाचे शब्द‌ वाचून आश्च्‌र्य वाटते. त्यावरून कापूस, धागा व कापडाची प्रचिती येते.

🟢 रम्य‌‌ भूतकाळ आणि समृद्ध भविष्यकाळ
हा इतिहास कापसाच्या धाग्याचा (Cotton Yarn) रम्य‌‌ भूतकाळ आणि समृद्ध भविष्यकाळ यांना जोडणारा आहे. त्यासाठी आपण वर्तमानात कापसाकडे चांगले लक्ष देणे ही काळाची गरज आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतातील सुती कापड (Cotton cloth) जगभर जात असे. इजिप्तमधील ममींना भारतात विणलेल्या सुती कापडाने गुंडाळले जात असे. संपूर्ण भारतात‌ कापसाची पैदास मोठ्या प्रमाणात होत‌ होती. पूर्वीही कापूस पेरण्याचे (Cotton sowing) आणि वेचण्याचे (Picking) काम स्त्रीयांकडे होते. कापसाची बोंडं‌ फुटली की, आजही ‘सीतादेवी’ची पूजा करून मग कापूस‌ वेचणे सुरू होते. सूत कातण्याचे‌ काम स्त्रीयाच करत.

🟢 सूतकताईमध्ये गरजेनुसार बदल
सूतकताईसाठी (Spinning) ‘टकळी’ हे यंत्र हजारो वर्षे वापरले गेले. गरजेनुसार त्यात बदल केले गेले. टकळीची फिरण्याची गती कमी असल्यामुळे जास्त‌ श्रमात कमी उत्पादन होत असे. शिवाय, धागा काहीसा भरड (जाड) आणि‌ सुताची लांबी मर्यादित होती. पुढे चरख्याच्या रचनेत टकळीला जागा मिळाली आणि क्रांती झाली. हात चरख्याची चाके फिरू लागली. सूत अतिशय बारीक‌ आणि लवकर कातले जाऊ लागले. सिंधू संस्कृतीत‌ लोक सुधारित चरखा वापरत‌ होते. पण, या चरख्याचा शोध, प्राथमिक अवस्था आणि सुधारणा कोणी, कशा आणि कुठे केल्या‌ याचे पुरावे‌ उपलब्ध नाहीत. अर्थात पुराव्याचा अभाव म्हणजे काही अभावाचा‌ पुरावा नव्हे.

🟢 कापडांवरून गावांची प्रसिद्धी व व्यापार
भारतभर‌ अनेक गावे आणि शहरे सूत‌ कातणे (Spinning) आणि ते मागावर ‌‌(Loom) विणणे यासाठी ख्रिस्तपूर्व काळापासून‌ प्रसिद्ध होती आणि आजही आहेत. सगळ्या जगात भारतीय सुती कापडाला‌ प्रचंड मागणी होती. इतर जग लोकरीच्या कपड्यांवर समाधान मानत होते. बुद्ध साहित्यातही‌ अनेक प्रकारच्या सुती कापडांचे उल्लेख आहेत. आज बनारस, उज्जैन, इंदौर, पैठण, कांचीपूरम, मछलीपट्टनम् अशी अनेक शहरे विणकरांच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध‌ आहेत. गुजरात, राजस्थान‌ आणि दक्षिण भारतातल्या विणकरांची‌ कला विस्मित करणारी आहे. भारताच्या विस्तृत किनारपट्टीवरील अनेक बंदरातून कापडाचा व्यापार (Trading in textiles) जगभर चालत होता.

🟢 कोषांपासून कापड तयार करणारे कोष्टी
अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर ग्रीकांना ‘कापसाचे’ रहस्य कळले. भारतात फुलपाखरे सूत काततात आणि पऱ्या कापड विणतात, असे पाश्चात्य जगात म्हटले
जाई. असा गौरवशाली इतिहास या पांढऱ्या सोन्याने घडवला आहे. रेशमाच्या आणि कापसाच्याही कोषांपासून कापड तयार करतात ते कोष्टी! भारतभर पसरलेल्या कोष्टी समाजात व्यवसायातील कौशल्य आणि वैशिष्ट्यांमुळे 15 पोटजाती‌ आहेत.

🟢 हातमागाची लोककथा
हातमागाबद्दल (Handloom) एक‌ लोककथा प्रसिद्ध आहे. मार्कंडेय ऋषींची पत्नी सूर्यकन्या होती. तिच्या मदतीने त्यांनी देवांसाठी कमळाच्या‌ तंतूंपासून कापड विणले. मग सूर्यकन्येला कापसापासून कापड विणायचे होते. तिच्या कामात‌ एक राक्षस‌ व्यत्यय आणत होता. मार्कंडेय ऋषींनी त्याला ठार करून त्याच्या हाडांपासून हातमाग तयार केला. अशी ही लोककथा. कापूस, सूत, हातमाग आणि सुती कापड यांचा वापर अती प्राचीन‌ काळापासून होत होता, हेच सूचित‌ करते.

🟢 व्यवसायाशी निगडीत रीतीरिवाज
प्राचीन काळापासून चालत आलेले रीतीरिवाज व्यवसायाशीच निगडीत असतात. काही कोष्टी समाजात वर आणि वधूने हातमागाचे (Handloom) पूजन केल्यावरच विवाह विधीची पूर्तता होते. काही कोष्टी समाजात व्यक्तीच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनाचे वेळी हातमागाचे चित्र रेखाटले जाते. कापूस, सूत, हातमाग यावर उपजीविका करणाऱ्या या समाजाने‌ या कष्टाच्या व्यवसायात कौशल्य, सौंदर्य आणि ऐश्वर्य आणले. एक शालीन आणि समृद्ध संस्कृती उदयाला आली, एवढेच नव्हे तर ही संस्कृती स्थिर झाली आणि जगभर प्रसिद्ध झाली.

🟢 आणखी एक गृत्समद अर्थात कॉटन वेंकय्या
भारतावर पहिले आक्रमण इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरने केले. नंतर वारंवार परकियांची आक्रमणे होत राहिली. लढायांच्या काळातही या व्यवसायातले सातत्य‌ आणि कौशल्य अबाधित राहिले. पुढे भारतातला कापूस इंग्रज मॅंचेस्टरला‌ नेऊ लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात आणखी एक गृत्समद भारताला मिळाले. ते म्हणजे श्री. पिंगली वेंकय्या! (Pingli Venkaia) आंध्र प्रदेशातील मछलीपट्टनम् जवळ भातलपेनुमारू‌ येथे जन्मलेले वेंकय्या अतिशय बुद्धीवान आणि कल्पक होते. आधी‌ चेन्न‌ई, नंतर केम्ब्रीज विद्यापीठात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. दुसऱ्या बोअर युद्धात ते ब्रिटीश इंडियन आर्मीत होते. महात्मा गांधींच्या‌ विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. वेंकय्या भारतात परत आले आणि सन 1906 ते 1911 या काळात कापसाच्या वेगवेगळ्या जातींच्या संशोधनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या कपाशीच्या अभ्यासामुळे त्यांना ‘पट्टी वेंकय्या’ (‘Patti Venkaiya) किंवा ‘कॉटन वेंकय्या’ (Cotton Venkaiya) म्हणत. ‘पट्टी’ म्हणजे कापूस!

🟢 भारतीय राष्ट्रध्वजाचा रंग, रूप आणि आकार
पिंगली वेंकय्यांनीच आपल्या तिरंगी राष्ट्रध्वजाचे (Indian National Flag) रंग रूप आणि आकार ठरवला. राष्ट्रध्वज फक्त खादीचाच असावा, असाही नियम होता. पण नंतर कृत्रिम धाग्याच्या कापडाचे राष्ट्रध्वज तयार करण्याची ‘सुधारणा’ करण्यात आली. वयाच्या 87 व्या वर्षी या आधुनिक गृत्समदाने अत्यंत गरिबीत शेवटचा श्वास घेतला. कृषिप्रधान देशात कृषी वैज्ञानिकाचा असा शेवट झाला. 2009 साली त्यांच्या ‘सन्मानार्थ’ डाक तिकीट काढण्यात आले. यंदा तिरंगा महोत्सवात त्यांना अभिवादन करून सगळ्यांनी आपली सुटका करून घेतली.

🟢 गाव हे शेतीसाठी ‘क्लस्टर’
आयात केलेल्या पेट्रोलियम प्रॉडक्टपासून तयार झालेल्या पॉलिस्टर (Polyester) कपड्याचा ‘तिरंगा’ तयार करणे बंद झाले आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तर त्या कृषि वैज्ञानिकावर आजपर्यंत झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल. त्यासाठी शेतीला ‘उद्योग’ समजले‌ पाहिजे. आज उद्योग जगात ‘क्लस्टर’ (Cluster) ही संकल्पना महत्त्वाची झाली आहे. जिथे काम तिथे अधिवास असा ‌सोप्या भाषेत त्याचा अर्थ सांगता येईल. आजही भारतीय‌ खेडी शेतीसाठी ‘क्लस्टरच’ आहेत. गरज आहे ती शेती या उद्योगात तंत्रज्ञान आणून त्याचे नूतनीकरण करण्याची.

🟢 कापसाची गुणवत्ता व तंत्रज्ञानातील बदल
कापसाच्या गुणवत्तेच्या चाचणीत रंग, चमक, धाग्याची लांबी, जाडी, सारखेपणा, लांब आणि‌ आखूड तंतू यांचे प्रमाण, बळकटपणा, तन्यता, तलमपणा दर्शवणारा सूतांक आणि ‘कचऱ्याचे’ प्रमाण सुद्धा लक्षात घेतले जाते. अनेक देशात‌ कापसाची वेचणी यंत्राने होते. वेळ वाचतो, मनुष्यबळाची गरज नसते. पण कचऱ्यामुळे कापसाचा दर्जा खालावतो. भारतीय शेतकरी बोंडे परिपक्व होऊन फुटल्यावरच कापूस वेचतो. साधारण 6-7 वेचे होतात. उमललेल्या बोंडातील कापूस तेवढा हलक्या हाताने वेचला जातो. त्यात वाळलेली पाने, नख्या असा कचरा नसतो. आधी देशी, मग विदेशी वाणांशी संकरीत, जैव तंत्रज्ञानाने संशोधित अशी बियाण्यांची प्रगत वाटचाल आहे. पऱ्हाटीतले तण निंदून काढणे अतिशय कष्टाचे काम. ते सुद्धा वेळेतच झाले पाहिजे. पूर्वी निंदणामुळे मजुरीचा खर्च खूपच असे. निंदण बहुधा महिला‌ शेतकरी आणि मजूर महिलाच करतात. पावसाळी हवेत सतत विळा आणि गवत हाताळून त्यांची बोटे अक्षरश: फुटत. आता तणनाशकाला न जुमानणाऱ्या जाती संशोधित केल्यामुळे पऱ्हाटीच्या झाडाला सुरक्षा मिळाली. या नवीन बियाण्यांमुळे तणनाशक फवारल्यावर पऱ्हाटी सुरक्षित राहते‌, तण तेवढे वाळून मातीत मिसळते. त्यामुळे मातीचा कस वाढतो व पोत सुधारतो. या संशोधित बियाण्यांमुळे मजुरीचा खर्च आणि मजुरांचे कष्ट वाचले आहेत. आजही शेतकऱ्याची मानसिकता कापूस पिकवण्यासाठी खूपच अनुकूल आहे. फक्त तणनाशकाला न जुमानणारे बियाणे आणि योग्य तणनाशक मोकळ्या हाताने शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत.

🟢 कृत्रिम धाग्यांच्या कापडाला‌ शह देण्याची क्षमता
नवीन बियाण्यांचा कापूस राजीवस्त्राला म्हणजेच
कृत्रिम धाग्यांच्या कापडाला‌ शह देण्याइतका दर्जेदार
आहे. पर्यावरणवाद्यांनी हे लक्षात घ्यावे. यासाठी देशातील संशोधकांना संशोधनाची दिशा आणि गती
ठरवावी लागेल. कृषी विद्यापीठांची हजारो हेक्टर जमीन पडीत आहे. तिथल्या इमारती,बं गले तेवढे
अवाढव्य प्रशस्त दिसतात. हे चित्र बदलावे‌ लागेल.
संशोधन वेतनापुरते‌ न राहता शेतातल्या मातीमधून
उगवले व तरारले पाहिजे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान हा फक्त भाषेचा अनुप्रास अलंकार‌ न राहता प्रत्यक्ष कृतीत यायला हवा. त्यासाठी महर्षी गृत्समद आणि पिंगली वेंकय्या यांच्यासारखी‌
संशोधन वृत्ती हवी.
महर्षी गृत्समद आणि श्री. पिंगली वेंकय्या यांना विनम्र
अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!