krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Lumpy sick animals : शेतकरी बंधुनो! लम्पीग्रस्त जनावरांची सुश्रुषा करा आणि मरतूक टाळा!!

1 min read

Lumpy sick animals : राज्यात मागील दोन अडीच महिन्यांपासून गोवंशात लम्पी (Lumpy) आजाराची (Disease) साथ (Epidemic disease) चालू असून, लसीकरण (Vaccination) जवळपास पूर्ण होवूनही काही जनावरांना (Animals) या आजाराची लागण होताना दिसत आहे. आजाराची साथ चालू झाल्यापासून पशुसंवर्धन विभाग (Department of Animal Husbandry) तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (Maharashtra Animal and Fisheries Science University, Nagpur) यांच्यावतीने या आजारावर योग्य पद्धतीने उपचार केले जात आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित पशुंमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर 100 टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र, शेतकऱ्यांनी ज्या जनावरावर तात्काळ योग्य उपचार करून घेतला, ती जनावरे बरी होत आहेत.

🛑 प्रतिकूल वातावरण व कीटकांची उत्पत्ती
मागील 15-20 दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार चालू असल्याने बऱ्याच आजारी जनावरांना योग्य निवारा उपलब्ध न झाल्याने तसेच अशी जनावरे पावसात भिजल्याने ओलसर जागेवर अथवा चिखलात बसल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येवून आजार बळावत आहे. प्रसंगी मृत्युमुखी पडत आहेत. पावसामुळे प्रतिकूल वातावरण त्याचप्रमाणे कीटकांची वाढलेली उत्पत्ती ही आजाराच्या प्रसारास आणि तीव्रतेस कारणीभूत ठरत आहेत. उपचारपद्धती, बाधित जनावरांची प्रतिकारशक्ती तसेच पशुपालकांकडून आपल्या आजारी जनावरांचे व्यवस्थापन व सुश्रुषा या सर्व बाबींचा आजारातून बरे होण्यावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशावेळी शेतकऱ्याच्या दारामध्ये त्याच्या रोगी जनावरांचे व्यवस्थापन व सुश्रुषा व्यवस्थितपणे केल्यास अशी जनावरे दुय्यम लक्षणांतूनही लवकर व पूर्णपणे बरी होतात. म्हणून या लेखाद्वारे रोगी जनावरांची करावयाची सुश्रुषा व रोग प्रादूर्भाव कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करावयाची उपाययोजना या विषयी माहिती दिली आहे.

🛑 लम्पी रोगाचा गोठ्यातील फैलाव रोखण्यासाठी काय करावे?
✳️ बाधित जनावरांना विलगीकरण करून निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे जेणेकरून निरोगी जनावरांना आजाराची बाधा टाळता येते.
✳️ बाधित जनावराच्या सानिध्यात आलेल्या सर्व जनावरांना गृह विलगीकरण (होम क्वारेनटाईन) करून 28 दिवस आजारांच्या लक्षणासाठी देखरेखीखाली ठेवण्यात यावे.
✳️ बाधित जनावरांना आजारपणामध्ये त्याचप्रमाणे आजारातून बरे झाल्यानंतर किमान 35 दिवस चराऊ क्षेत्रात प्रवेश देण्यात येवू नये.
✳️ बाधित जनावरांच्या गोठ्याचे नियमित 2 टक्के सोडीयम हायपोकलाराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात यावे, जेणेकरून विषाणू संक्रमणास आळा घालता येईल.
✳️ बाधित त्याचप्रमाणे सर्व निरोगी जनावरांमध्ये आणि गोठयामध्ये बाह्यपरजीवी निर्मूलनासाठी बाह्य परजीवीनाशक फवारणी करून घ्यावी.

🛑 लम्पी रोग झालेल्या जनावरांची सुश्रुषा कशी करण्यात यावी?
✳️ जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित देण्यात यावा. त्याचप्रमाणे त्यांचा आहार व पाणी पिणे उच्चतम राहील यासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
✳️ आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लुसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीचा खुराक देण्यात यावा.
✳️ पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात दिवसातून 4-5 वेळा उपलब्ध करून देणे. पाण्यामध्ये मीठ व गुळ टाकून दिल्यास खनिजक्षार व उर्जा मिळण्यास मदत होईल.
✳️ ज्या बाधित जनावरांना मानेवरील व छातीवरील सुजेमुळे मान घाली घेता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी मुबलक प्रमाणात तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून अशा जनावरांचा आहार व्यवस्थित राहील.
✳️ आजारी जनावरे चारा खाणे कमी केली असतील तर अशा जनावरांना ऊर्जावर्धक औषधे तोंडावाटे (प्रोपायलीन ग्लायकॉल) देण्यात यावीत.
✳️ रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे खनिजक्षार मिश्रण देण्यात यावे.
✳️ जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे देण्यात यावीत.
✳️ रक्तक्षय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी संध्याकाळी किमान 21 दिवस देण्यात यावीत. ✳️ ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत रहाण्यासाठी प्री व प्रोबायोटीक औषधे त्याचप्रमाणे भूकवाढीसाठी औषधे देण्यात यावीत.
✳️ आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे ही खुराक किंवा पाण्यातून देण्यात यावीत.
✳️ अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना कोरडा व स्वच्छ निवारा उपलब्ध करून देण्यात यावा. जेणेकरून ऊन्ह, पाऊस व चिखल यापासून जनावरांचे संरक्षण करता येईल आणि प्रतिकूल वातावरणामुळे जनावरांत निर्माण होणारा ताण टाळता येईल.
✳️ ज्या जनावरांना पायांवर किंवा छातीवर मोठ्या प्रमाणावर सूज आहे, अशा जनावरांना मिठाच्या कोमट पाण्याचा दिवसातून 2 वेळा शेक द्यावा तसेच मॅग्नेशियम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लीसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ संध्याकाळी लावल्यास सूज कमी होण्यास मदत मिळते.
✳️ ज्या जनावरांच्या पायाच्या सुजेवरील भागात किंवा कातडीवरील गाठी फुटून जखमा झाल्या असतील, अशा जखमांचे नियमितपणे ड्रेसिंग करावे व जखमांवर माश्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळ हर्बल स्प्रे मारण्यात यावा.
✳️ जनावरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास दिवसातून 3-4 वेळेस बोरोग्लीसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर हाताच्या बोटांनी लावावे.
✳️ रोगी जनावरांच्या नाकामध्ये बऱ्याच वेळा अल्सर निर्माण होतात, नाक चिकट स्त्रावानी भरलेले असते. काही वेळा तो घट्ट व कडक होतो त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्यानी नियमितपणे नाकपुडी स्वच्छ करण्यात यावी. तसेच दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लीसरीन अथवा खोबरतेल किंवा गोडतेलाचे चार चार थेंब टाकावे जेणेकरून मऊपणा टिकून राहील व श्वसनासही त्रास होणार नाही. नीलगीरीच्या तेलाची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.

🛑 लम्पी आजाराने बाधित जनावरांत जखमां दिसून येत असल्याने त्याचे व्यवस्थापन कसे करावे?
✳️ बाधित जनावरांमध्ये 2-3 आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरती जखमा होतात. त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर खालीलप्रमाणे उपचार करावा.
✳️ नवीन जखमा आढळून आल्यास नियमितपणे अशा जखमा ०.1 टक्के पाेटॅशीयम परमॅगनेटच्या द्रावणाने धुवून घेणे.
✳️ जखमा धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्हीडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे आणि त्यानंतर जखम बँडेजने हळुवारपणे बांधावी. जखमा बऱ्या होईपर्यंत नियमितपणे रोज अशा प्रकारे जखमांचे व्यवस्थापन करण्यात यावे.
✳️ सोबत जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे जखम परिसरात फवारण्यात यावा.
✳️ जखमेमध्ये आळ्या पडल्यास अशा जखमेत टरपेनटाईंनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा आणि त्यानंतर मृत आळ्या बाहेर काढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारण्यात यावा.
✳️ जखमा जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा.
✳️ जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.

🛑 महाराष्ट्रात लसीकरण झालेले असतानाही रोग प्रादूर्भाव दिसून येत असल्याने याची कारणे कोणती?
✳️ लसीकरण केल्यावरही काही जनावरात रोग दिसून येत आहे त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
✳️ लसीकरण केल्यानंतर शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी लागतो तर 28 व्या दिवशी परीपूर्ण रोग प्रतिकारशक्ती तयार होते. म्हणून लसीकरण केल्यावर 28 दिवसापर्यंत रोगबाधा होवू शकते. मात्र 14 दिवसानंतर रोगबाधेचे प्रमाण वरचेवर कमी होत जाते, असे दिसून येत आहे.
✳️ या रोगावरची सध्या जी लस उपलब्ध आहे, ती म्हणजे गोटपॉक्स व्हॅक्सीन. ही लस हेटरोलॉगस आहे. लम्पी व गोटपॉक्स विषाणूत साधर्म्य आहे. त्यामुळे लम्पीच्या विरोधात ही लस वापरली जाते. परंतु ही लस लम्पी विरोधात 100 टक्के प्रतिकार शक्ती देवू शकत नाही. सर्वसामान्यपणे 70 टक्के जनावरात रोग प्रतिकारशक्ती मिळते.
✳️ लसीकरण राहिलेल्या किंवा लसीकरण न केलेल्या आणि शेवटच्या टप्प्यातील गाभण गाईमध्ये लसीकरण केले गेले नसल्यामुळे त्यांच्यात हा आजार दिसून येत आहे.
✳️ याशिवाय 4 महिन्याखालील वासरांचेही लसीकरण शास्त्रीय दृष्टीकोनातून केलेले नाही. गाभण गाईत लसीकरण केले नसल्याने नवजात वासरांना आईकडून चिकातून मिळणारी रोग प्रतिकारशक्ती मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यात प्रामुख्याने रोग प्रादुर्भाव दिसून येत आहे.
✳️ लसीकरण केल्यावर उत्तम रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यात रोग प्रादूर्भावित भागात प्रतिकूल हवामानाचा विशेषतः सातत्याने पडणाऱ्या पावसाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निवारा नसलेली जनावरे पावसात भिजत आहेत. बऱ्याच जनावरांना बसायला कोरडी जागा नाही. पावसामुळे पोटभर खायला मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे जनावरांची उपासमार व ताण येवून प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे या आजाराने बाधित होत आहेत.

🛑 लसीकरण केलेल्या जनावरांत उत्तम रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी काय करावे?
✳️ लसीपासून उत्तम रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी उत्तम चारा, प्रथिनयुक्त खुराक, खनिज मिश्रणे व विविध जीवनसत्वाची टॉनिक देण्यात यावीत.
✳️ लसीकरण झालेल्या जनावरांत प्रतिकूल हवामानामुळे जसे की जास्त ऊन्ह, थंडी किंवा पाऊस यामुळे त्यांच्या शरीरावर ताण येवून प्रतिकारशक्तीचा स्तर खालावतो. म्हणून सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात यावा.
✳️ गोठ्यातील जनावरे बसायची जागा नियमितपणे स्वच्छ व कोरडी ठेवण्यात यावी.
✳️ लसीकरणानंतर बैलांना किमान 14 दिवस आराम द्यावा. जड शेतीकामाला लावू नयेत.
✳️ गोमाशा व गोचीड प्रादूर्भाव होवू नये, म्हणून दर आठवड्यास कीटकनाशक औषधींची फवारणी करावी.

🛑 सध्या लम्पी आजाराचा प्रादूर्भाव प्रामुख्याने वासरांत दिसून आल्यास त्यासाठी काय करावे?
✳️ नवजात वासरांना जन्मल्यानंतर 2 तासांच्या आत चिक पाजावे. जेणेकरून वासरांमध्ये उत्तम नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल.
✳️ वासरांना कोरडा व हवेशीर निवारा उपलब्ध करून द्यावा.
✳️ वासरांचे प्रतिकूल वातावरणापासून जसे की ऊन्ह, पाऊस, थंडी यापासून संरक्षण करावे.
✳️ वासरांमध्ये बाह्यपरजीवीचा प्रादूर्भाव होणार नाही, यासाठी योग्य व्यवस्थापन व काळजी घेण्यात यावी.
✳️ वासरांचे नियमित जंतनिर्मूलन करावे.
✳️ आहारात जीवनसत्व व खनिज मिश्रणांचा वापर करावा.
✳️ वासरांना पुरेशे दूध पाजावे व काफ स्टार्टर रेशन द्यावे.
✳️ गाभण गाईचे लसीकरण करून घेतले तर वासरास चिकाद्वारे आपोआप उत्तम रोग प्रतिकारशक्ती मिळेल.
✳️ चार महिन्यांच्या वरील वासरांचे लसीकरण करून घ्यावे.

एकूणच बाधित जनावरांच्या उपचारादरम्यान किंवा निरोगी जनावरांच्या लसीकरणानंतर पशुपालकांनी आपल्या पशूंची काळजीपूर्वक सुश्रुषा केल्यास, आपले अनमोल पशुधन लम्पी आजारापासून वाचविण्यात उत्तम यश मिळू शकते. त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या निरोगी जनावरांची काळजी घेतल्यास योग्य स्तरावर प्रतिकारशक्ती निर्माण होवून नैसर्गिक आजारावर जनावरे मात करू शकतील. एकूणच बाधित पशुधन संख्या कमी होण्यास व पशुपालकांचे आर्थिक नुकसान कमी करण्यास मदत होईल.

©️ डॉ. अनिल भिकाने
संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
संपर्क :- 9420214453
मेल :- anilbhikane@mafsu.in

©️ डॉ. रवींद्र जाधव
सहायक प्राध्यापक, चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जिल्हा लातूर.
संपर्क :- 9404273743
मेल :- jadhavrk11@gmail.com

error: Content is protected by कृषीसाधना !!