Cotton production decrease : देशात कापसाचे 14 वर्षातील निचांकी उत्पादन, 14.61 टक्क्यांनी घट
1 min read🌎 अंदाजाला विशेष महत्त्व
देशात काॅटन आसाेसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) या भारतीय आणि युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अमेरिका (United States Department of Agriculture) या अमेरिकन संस्थांना अनुक्रमे देशात व जगात मानाचे स्थान आहे. 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष (Cotton Year) मानले जाते. या दाेन्ही संस्था दरवर्षी कापूस वर्ष संपण्यापूर्वी तसेच कापूस वर्ष सुरू झाल्यानंतर आगामी हंगामातील कापसाच्या एकूण उत्पादनाचा अंदाज करतात. कापड (Textile) व सूत (Spinning) उद्याेग क्षेत्रात या संस्थांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या कापूस उत्पादनाच्या अंदाजाला विशेष महत्त्व दिले जाते.
🌎 दिशाभूल करणारा अंदाज
सीएआयने व्यक्त केलेल्या कापूस उत्पादनाच्या अंदाजावर सूत (Yarn) व कापड उद्याेजक कापूस खरेदीचे वर्षभराचे नियाेजन करतात. त्यामुळे कापूस वर्षाच्या शेवटच्या आणि नवीन कापूस वर्षाच्या सुरुवातीच्या काळात दरवर्षी कापसाचे दर दबावात असतात. याचा फटका मात्र कापूस उत्पादकांना बसताे. सन 2021-22 च्या हंगामात देशात 362 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने तर 345 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला हाेता. बाजारातील चालू व मागील हंगामातील याच काळातील कापूस आवकच्या (Arrival )) आकडेवारीवरून या दाेन्ही संस्था त्यांचे कापूस उत्पादनाचे अंदाज बदलतात. सन 2021-22 च्या हंगामात सीएआयने बाजारपेठेतील कापसाची आवक लक्षात घेत जानेवारी 2022 मध्ये देशात 345 लाख गाठी तर एप्रिल 2022 मध्ये 325 लाख गाठी आणि त्यानंतर 318 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. 1 ऑगस्ट 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळात देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाची आवक ही 307.05 लाख गाठींची झाली आहे.
🌎 कापसाचे उत्पादन घटले
देशात हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशा या प्रमुख राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. हरियाणा, पंजाब, राजस्थानमधील बहुतांश तर गुजरातच्या काही भागातील कापूस दरवर्षी 8 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या काळात बाजारात येताे. त्यामुळे त्या कापसाचे उत्पादन आधीच्या हंगामात समाविष्ट केले जाते. सन 2021-22 च्या हंगामात संपूर्ण देशभर गुलाबी बाेंडअळीमुळे (Pink Bollworm) पीक प्रभावित (Crop damage) झाल्याने कापसाच्या उत्पादनात घट आली. हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांमध्ये दरवर्षी कापसाचे जेवढे उत्पादन हाेते, त्याच्या दुप्पट उत्पादन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये हाेते. किमान 100 लाख गाठी कापूस उत्पादनाची क्षमता असलेल्या महाराष्ट्रात गेल्या हंगामात 81 लाख तर गुजरातमध्ये 91.5 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले. साेबतच इतर राज्यांमध्येही कापसाचे उत्पादन घटले.
🌎 कापसाच्या वापरातही घट
सन 2021-22 च्या देशात कापसाचा एकूण वापर किमान 345 लाख गाठींचा हाेता. यात किमान 2 ते 3.5 टक्क्यांनी वाढ हाेणे अपेक्षित आहे. मात्र, चालू हंगामात कापसाचा एकूण वापर हा 318 लाख गाठींचा असेल, असा अंदाज सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला. मागील हंगामात कापसाचे कमाल दर 14 हजार रुपये प्रति क्विंटलवर गेल्याने बहुतांश कापड उद्याेगांनी सूताला पर्याय म्हणून पाॅलिस्टरच्या (Polyester) धाग्यांचा वापर वाढविला आहे. शिवाय, युराेपीय राष्ट्रांमधील भारतीय कापडाच्या मागणीत घट झाली आहे. त्यातच चीन आणि व्हिएतनाममधून माेठ्या प्रमाणात कमी दरात सूत आयात (Import) केले जात असल्याने देशांतर्गत कापड उद्याेजक चीन व व्हिएतनामच्या सुताला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारतीय सुताची मागणी घटल्याने सूत गिरणी मालक संकटात सापडले आहेत.
🌎 कापसाच्या पुरवठ्यातही दिशाभूल
सन 2022-23 च्या हंगामात देशात कापसाचा पुरवठा 392.89 गाठींचा असेल. यात कापसाच्या 14 लाख गाठी या आयात केलेल्या तर 71.84 लाख गाठी कापूस हा मागील हंगामातील (Closing Stock) असेल. हा कापूस हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील 30 सप्टेंबर 2022 पर्यंत बाजारात आलेला आहे. शिवाय, 43 लाख गाठी कापसाची निर्यात असेल, असा अंदात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला. मुळात सन 2021-22 च्या हंगामात कापसाचे एकूण उत्पादन 307.05 लाख गाठींचे झाले. त्यातील 18 लाख गाठी कापसाची निर्यात करण्यात आली. मागच्या हंगामातील क्लाेसिंग स्टाॅक कागदाेपत्री फुगवून दाखवित सीएआय एकीकडे सूत व कापड उद्याेजकांची दिशाभूल तर दुसरीकडे बाजारातील कापसाचे दर आणखी दबावात आणण्याचे प्रयत्न करीत आहे. खरं तर, कापसाच्या कमी उत्पादनामुळे देशातील बहुतांश कापड उद्याेगांनी त्यांचे उत्पादन 40 ते 65 टक्क्यांनी कमी केले आहे. त्याची कारणे सरकारी पातळीवरून कुणीही सांगायला तयार नाहीत.