Agricultural Education : कृषी शिक्षणाला विरोध का व कशासाठी?
1 min read
शेती व शेतमाल प्रक्रिया उद्योग
कोणत्याही अल्पभूधारक शेतकऱ्याला आपल्या मुलानं शेती करावी, असं वाटत नाही. म्हणून तो त्याला शाळेत टाकतो आणि त्याला नोकरी लागेल अशी अपेक्षा करतो. परंतु एक वस्तुस्थिती लक्षात घ्या. सर्व मुलांना नोकरी लागू शकत नाही. त्यामुळे या तरुणांना पुढे चालून उद्योगांमध्ये, व्यवसायामध्ये यावचं लागणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि नोकरीच्या मर्यादा कोरोनाच्या काळात समोर आल्या. अनेक मुलांना खासगी नोकरीतून काढून टाकण्यात आलं आणि त्या पोरांना गावाची वाट पकडावी लागली. या काळामध्ये जेव्हा सगळे उद्योग व्यवसाय ठप्प होते, तेव्हा एकाच व्यवसाय पूर्ण वेळ चालू होता तो म्हणजे ‘शेती’चा. त्यामुळे आपली इच्छा असो वा नसो, तरुणांना शेती आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग (Agricultural processing industry) यात येणाऱ्या काळात जावचं लागणार आहे.
अन्नधान्याची गरज व तंत्रज्ञानाची जोड
एक अहवाल असं सांगतो की, जागतिक स्तरावर लोकसंख्येची वाढ लक्षात घेता सन 2050 मध्ये वाढलेल्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी शेतमालामध्ये 60 टक्के वाढ करणे गरजेचे आहे. ही वाढ कुशल शिक्षित व्यावसायिक शेतकरीच करू शकतात. दिवसेंदिवस शेत जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. या कमी झालेल्या शेतजमिनीमध्ये बदललेल्या हवामानामध्ये कमी झालेल्या नैसर्गिक संसाधनांमध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करून चालणार नाही, तर त्याला आता तंत्रज्ञानाची (Technology) जोड देण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कमी क्षेत्रात चांगले उत्पादन कमी वेळात करणे अपेक्षित आहे आणि असा शेतकरी निर्माण करणे ही खऱ्या अर्थाने आजच्या काळातील आव्हान आहे.
रोजगार निर्मिती क्षमता
शेतीपासून दूर पळून चालणार नाही. फक्त उद्योगाचा विकास म्हणजे देशाचा विकासही नव्हे. शेतीच्या विकासाशिवाय उद्योग सुद्धा विकसित होऊ शकत नाही. शेती आणि उद्योग याचा समताेल विकास हा देशाला पुढे घेऊन जातो. शेतीचा विकास आणि शेतीवर आधारित शेतमाल प्रक्रिया केंद्र गावागावांमध्ये तयार होतील, तेव्हाच खेड्यातील तरुणांना त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकेल. कृषी शिक्षणाचा उद्देश शेतीच्या विकासात उपयोगी पडतील, असे कुशल शेतकरी, कृषी वैज्ञानिक आणि कृषी संशोधक तयार करणे असला पाहिजे. ज्यांना खरंच कृषी क्षेत्राची आवड आहे, काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी ज्ञान मिळवण्याची तयारी आहे, अशा तरुणांनी या क्षेत्रामध्ये यायला हरकत नाही. शेतीच्या शिक्षणाने बदलणाऱ्या काळामध्ये खतांची गरज किती, पिकाची निवड, जमिनीचे प्रकार, त्यामध्ये पाण्याची असणारी गरज, कीड आणि रोगांपासून उपाय या सर्व बाबींचा शास्त्रज्ञ पद्धतीने विचार आणि अभ्यास करता येईल. उपलब्ध रोजगारांच्या 52 टक्के रोजगार निर्मितीची क्षमता (Employment generation potential) कृषी क्षेत्रामध्ये आहे.
कृषी साक्षरता
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या क्षेत्रानंतर कृषी क्षेत्राचा विचार हा करायलाच पाहिजे. कृषी हे जगातील सर्वात मोठे खासगी व्यावसायिक क्षेत्र आहे. पुरेसे, सुरक्षित आणि उत्तम दर्जाचे अन्न पुरवण्याचे काम या क्षेत्रातून होते. आजही ग्रामीण भागामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलं ही शेतकरी कुटुंबातून असतात. शेतीचा विषय शिक्षणामध्ये असावा, यासाठी माजी कुलगुरू राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यांनी दिलेला अहवाल सन 2008 पासून तसाच धूळ खात पडला होता. यावर आता निर्णय होईल, अशी शक्यता निर्माण झाली असताना आपण त्याला विरोध करणं हे योग्य नाही. या देशांमध्ये शेतकऱ्यांची दैनावस्था आहे. प्राथमिक शाळेमध्ये जर हा विषय समाविष्ट केला तर कृषी साक्षरता (Agricultural Literacy) वाढेल. कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी वाढतील. कृषी संशोधक सुद्धा वाढतील. लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रहताऱ्यांची माहिती देणारी शिक्षण व्यवस्था मानवाला जिवंत ठेवणाऱ्या कृषी व्यवस्थेची माहिती देत असेल तर त्याला विरोध का आणि कशासाठी?
प्राथमिक स्वरुपात माहिती
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेतीवर प्रेम असते. त्यांना हा विषय समजू शकतो म्हणून हा विषय अभ्यासक्रमामध्ये पाचव्या वर्गापासून समाविष्ट करायला काही हरकत नसावी. आता शहरी भागातील लोकांना सुद्धा जर शेतीचा प्राथमिक स्वरुपात माहिती होत असेल, तर निदान जे अन्नधान्य आपण खातो ते कुठून येते, त्याचे उत्पादन कसं होतं, ते उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला किती कष्टातून जावं लागतं, याची निदान जाणीव तरी शहरी भागाला या निमित्ताने होईल…!