krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Weed damage crop : तण खाई धन…! तणाचे प्रकार, परिणाम व नियंत्रण!

1 min read
Weed damage crop : पेरले ते उगवते. पण त्याचबरोबर काही नको असलेले तणही उगवत असते. हे तण फोफावले की नुकसानीचा पाढा सुरू होतो. त्यामुळे 'तण खाई धन' अशी म्हण रूढ झाली आहे. तण (Weed) जसे वाढते, तसे ते विस्तारतेही. त्याचा मुख्य पिकाच्या (Crop) वाढीवर परिणाम होतो आणि उत्पादनही घटते. तणामुळे पिकांचे 25 ते 90 टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

👉🏾 बॉटनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाकडे (Botanical Survey of India) सर्व तणांची व गवतांची (Grass) नोंदणी केलेली असते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (Indian Council of Agricultural Research) जबलपूरला तण संशोधन संचालनालय सुरू केले असून, तेथे सुमारे 1,200 पेक्षा अधिक तणांची नोंदणी झालेली आहे. या मुख्य तणांव्यतिरिक्त 10 हजारांपेक्षा अधिक तण जगभरात आहे. पण काही मोजक्याच तणांमुळे पिकांचे नुकसान होते.
👉🏾 पिकातील तण निर्मूलन मजुरांकडून केले तर हेक्टरी 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. मात्र, रासायनिक तणनाशकांचा (Herbicide) वापर केला तर खर्च हेक्टरी तीन ते चार हजार रुपये एवढा येतो. तणनाशकांमुळे खुरपणी, निंदणी याचा खर्च वाचतो. खर्चात 41 टक्के बचत होते. असे असले तरी देशात दरवर्षी किमान 44 हजार कोटी रुपयांचे पिकांचे नुकसान होते.
👉🏾 आता देशी तणांबरोबरच गाजर गवत किंवा काँग्रेससारख्या तणांनी शेतीक्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. या परदेशी पाहुण्यांना हुसकावून लावण्याकरिता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत.
👉🏾 खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर शेतमाल आयात निर्यातीवरील (Import Export) निर्बंध कमी झाले आहेत. शेतमाल, बी-बियाणे देशात येऊ लागले. त्याचबरोबर येणाऱ्या तणांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. तरीदेखील आलेल्या परदेशी तणांना ‘चले जावो’ करण्यासाठी कृषी अनुसंधान परिषदेसारख्या संस्था सातत्याने प्रयत्न करत असतात. यापुढे तर या प्रश्नांवर अधिक सजग राहण्याची गरज आहे.
👉🏾 गवत किंवा तण यांच्या प्रजाती हजारो असल्या तरी पिकामध्ये मोजकीच तणे त्रासदायक ठरलेली असतात. हरळी, लव्हाळी, शिपी, रेशीमकाटा, विलायत, पिवळ्या फुलांचा धोतरा, चांदील, घानेरी, घोळ, माठ अशी अनेक तणे आहेत.
👉🏾 सन 1950 मध्ये अमेरिकेतून आयात केलेल्या मिलो नावाने ओळखल्या जाणाऱ्या गव्हातून गाजर गवताचे देशात आगमन झाले. पुण्याच्या जवळपास ते दिसले. गाजर गवत खाल्याने जनावरांना त्रास होत असे.
👉🏾 त्यानंतर सन 1965 मध्ये देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. पी.एल. 480 करारानुसार पुन्हा अमेरिकेतून गहू आणण्यात आला. आयात शेतमाल तपासण्याची तेव्हाही पद्धत होती. पण भुकेच्या प्रश्नाला अधिक महत्त्व देण्यात आले. त्यामुळे तपासणी थोडी शिथिल करण्यात आली होती. त्यावेळी पुन्हा गाजर गवताचे बी गव्हाबरोबर देशभर आले. सन 1970 ते 1972 च्या दरम्यान त्याचा झपाट्याने शेतात प्रसार झाला. या गवताचा बिमोड करणे शेतकऱ्यांना आजही कठीण जात आहे. सर्वात तापदायक ठरलेले हे तण आहे.
👉🏾 गाजर गवताला लोकांनी काँग्रेस असे नाव दिले होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष जसा सत्तेतून जात नाही तसे हे गवत शेतातून जात नसल्याने त्याला तसे नाव दिले असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रसायनांचा वापर करून त्याचा उपद्रव कमी करता येऊ लागला.
👉🏾 देशाच्या सत्तेत नवे पक्ष आले तसेच काही परदेशी तणेही शेतात येऊ लागली. घानेरी हे तणही परदेशातूच आले आहे. त्याची फुले छान दिसत. ती एका राजाला भेट देण्यात आली. पण आज घानेरीचा त्रास शेतकरी भोगत आहे. परदेशी पक्षीही काही तणांचे बी घेऊन येत असतात. एका भागात आलेले हे तण वाऱ्यामुळे सर्वत्र पसरते.
👉🏾 गाजर गवतापासून धडा घेऊन सन 1975 नंतर सरकारने आयात शेतमालाची काटेकोर तपासणी सुरू केली. बंदरावरच त्याची तपासणी केली जाते. असे असले तरी सन 2006-07 मध्ये ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या गव्हाबरोबर काही चार प्रकारची तणे आली. त्यावेळी 63 लाख टन गहू कोचिन बंदरातून आला. अन्नमहामंडळाच्या गोदामातून तो देशभर गेला. त्याचबरोबर ही चार तणे देशभर गेली.
👉🏾 सोलॅनम कॅरोलिनेन्स, इन्कॅनम, सेक्रस ट्रब्युलाईस, सोलॅनम, व्हायला आरव्हेनसीस, सायनोग्लोसम आदी तणांचा त्यामध्ये समावेश होता.
👉🏾 सोलॅनम कॅरोलिनेन्स हे तण झुडपी व सरळ वाढणारे आहे. त्याचे फुले पांढरट व जांभळ्या रंगाची असतात. या तणाला दुष्काळही मानवतो. त्यात कॅल्सियम ऑक्सालेटचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते विषारी तण म्हणून ओळखले जाते. जनावरांना चारा म्हणून दिल्यास पचनसंस्थेचे रोग, झोप न येणे, लकवा असे रोग होतात. या तणामध्ये विषारी ग्लुकालाईडचे प्रमाण असल्यामुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होतो. हे तण नगर शहराजवळ निबळक गावात आढळून आले. पारनेर, सोलापूर, बंगलोर, धारवाड, कोईमतूर, हिरीचूर (कर्नाटक) या भागात ही परदेशी तणे आढळली. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, पुणे जिल्ह्यातील मांडवगण, कोल्हापूर जिल्ह्यातील शिगणापूर, धुळे जिल्ह्यातील चिखली येथेही तुरळक प्रमाणात तणे आढळली.
👉🏾 कौठे (सोलापूर) येथे विषारी गवत खाल्ल्याने 13 जनावरे दगावली होती. त्या तणांची ओळख कृषी शास्त्रज्ञांना पटली नव्हती. त्यामुळे बॉटनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाकडे ते पाठविण्यात आले होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने या परदेशी तणांची गंभीर दखल घेतली.
👉🏾 जबलपूर येथील राष्ट्रीय तण संचालनालयाच्या वतीने देशातील कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वीत तण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले. त्याकरिता लाखो रुपयांचा निधी दिला. तण सव्‍‌र्हेक्षण निरीक्षकांच्या नेमणुका झाल्या. राहुरीत डॉ. प्रशांत बोडखे, डॉ. सी.बी. गायकवाड, डॉ. संजय साळुंखे यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काम केले.
👉🏾 मात्र, या तणांचा फारसा प्रसार झाला नाही. सरकारने वेळीच दक्षता घेतल्याने हे त्रासदायक पाहुणे संपविण्यात आले. त्यांचा बिमोड करण्यात आला. त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार रोखला गेला. सध्या दापोली व अकोले येथील कृषी विद्यापीठात तण संशोधन प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र महात्मा फुले कृषी विद्यापीट राहुरी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ते मुदतवाढ न मिळाल्यामुळे बंद पडले आहे.
👉🏾आता तण निर्मूलनाकरिता केंद्राकडून पुरेशी आíथक तरतूद होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यातील धोक्याकडे गांभीर्याने लक्ष देणाऱ्या यंत्रणा आधीच कार्यान्वित करणे कृषी अनुसंधान परिषदेलाही शक्य होत नाही. आपण संकट आले की मार्ग शोधतो. मात्र त्याआधीच उपाययोजना केली जात नाही. हे कृषी क्षेत्राचेही दुर्लक्ष आहे.
👉🏾 जनुक बदल पिकांची (जी.एम.) निर्मिती सुरू झाली आहे. देशात राऊंडअपरेडी मका या जी.एम. पिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्याला विरोध झाला. मका पिकावर राऊंडअप हे तणनाशक फवारले तर पीक जळून नष्ट होते. पण जी.एम. राऊंडअप रेडी मका पिकावर तणनाशक फवारले तर तण जळते. पिकाला काही होत नाही.
👉🏾 परदेशात राऊंडअप रेडी कपाशी, सोयाबीन ही जी.एम.पिके आली आहेत. देशात जी.एम. पिकांना त्यांच्या चाचण्यांना बंदी घालण्यात आली आहे. तणांच्या निर्मूलनासाठी रसायनांचा वापर केला तरी पिकांचे नुकसान होत नाही असे बियाणे जगभर संशोधित होत आहे.
👉🏾 भारत मात्र त्यात पिछाडीवर तर आहेच, पण संशोधनाचेही वावडे आहे. तणांच्या बिमोडाकरिता संशोधनाला भरीव निधी द्यायचा नाही आणि दुसरीकडे नव्या संशोधनाचे मार्गही चोखाळायचे नाही, हा शेतीक्षेत्रातील “मेक इन इंडिया’ चा प्रयोग दुर्दैवी आहे.
👉🏾 देशात तण निर्मूलनाकरिता आजही मजुरांचा वापर केला जातो. तण नाशकांचा वापर आता सुरू झाला आहे. ‘टु फोर डी’ या तणनाशकाचा शोध 1940 साली लागला. 1945 साली त्याचा शेतीत वापर सुरू झाला. सन 1950 ला अल्ट्राझाईन तर 1974 ला ग्लायफोसेट (राऊंडअप) या तणनाशकांचा शोध लागला. त्याचा वापर देशात बऱ्यापैकी सुरू झाला आहे. पण जगाच्या तुलनेत तो कमी आहे.
👉🏾 तणनाशकाचे काही विपरीत परिणाम आहे. त्यामुळे त्याला परवानगी देताना नियमांचे पालन करावे लागते. तणनाशक फवारणीचे एक तंत्रही आहे. ‘टु फोर डी’ या तणनाशकाचे आरोग्यावरही परिणाम होतात. असे वैद्यकीय क्षेत्रातील काही कंपन्यांचे म्हणणे आहे.
(संदर्भ :- लोकसत्ता)

1 thought on “Weed damage crop : तण खाई धन…! तणाचे प्रकार, परिणाम व नियंत्रण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!