Cotton Rate : कापसाचे दर पुन्हा दबावात
1 min read🌎 दरातील चढ-उतार व मुहूर्ताचा दर
यंदा कापसाला मुहूर्ताला मिळणार 8,500 ते 9,000 रुपये दर सन 2021-22 च्या हंगामात कापसाचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत चढल्याने शेतकरी चालू हंगामात (सन 2022-23) यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा बाळगून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबरच्या सुरुवातीला रुईचे दर 120 सेंट (1 डाॅलर 20 सेंट) प्रति पाउंड हाेते. त्याआधी या दराने 131 सेंट प्रति पाउंडपर्यंतची मजल मारली हाेती. नंतर 22 सप्टेंबरला रुईचे दर 111.95 सेंट प्रति पाउंड म्हणजेच कापसाचे दर 8,819 रुपये प्रति क्विंटल तर 25 सप्टेंबरला 115 सेंट प्रति पाउंडवर पाेहाेचले हाेते. नंतर 30 सप्टेंबरला ते 107.10 सेंट प्रति पाउंडपर्यंत खाल उतरले हाेते. दरातील हा चढ-उतार विचारात घेता मुहूर्ताला महाराष्ट्रात कापसाला 8,300 रुपये ते 9,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकताे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक श्री विजय जावंधिया यांनी दिली.
🌎 सुरुवातीच्या काळातील दर
यावर्षी उत्तर भारतात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली. 6 ते 23 ऑगस्ट या काळात कापसाचे दर 7,000 ते 11,900 रुपये प्रति क्विंटल दरम्यान हाेते. या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर 124 ते 127 सेंट प्रति पाउंउ हाेते. 1 ते 30 सप्टेंबर काळात कापसाचे दर 7,200 ते 10,300 रुपये प्रति क्विंटल दरम्यान हाेते. महाराष्ट्रातील धुळे व जळगाव जिल्ह्यात श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 10,701 ते 16,000 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी करण्यात आली. मात्र, हा मुहूर्ताला 35 किलाे ते एक क्विंटल एवढाच कापूस खरेदी करण्यात आला. कारण ताे काटापूजनाचा दर हाेता. त्या काळात शेतकऱ्यांच्या घरीदेखील माेठ्या प्रमाणात कापूस आला नव्हता. त्यामुळे या दराला फारसे महत्त्व नाही.
🌎 सप्टेंबरमधील कापसाचे दर (रुपये प्रति क्विंटल)
✳️ पंजाब :- 7,400 ते 8,500
✳️ हरियाणा :- 8,200 ते 10,300
✳️ गुजरात :- 7,600 ते 10,700
✳️ मध्य प्रदेश :- 7,300 ते 8,000
✳️ तेलंगणा :- 8,100 ते 10,200
✳️ आंध्रप्रदेश :- 8,300 ते 10,300
✳️ कर्नाटक :- 7,600 ते 8,700
✳️ तामिळनाळू :- 7,000 ते 8,200
(या काळात महाराष्ट्र व ओडिशात कापूस खरेदी सुरू झाली नव्हती.)
🌎 सुताची मागणी घटली
भारतासह संपूर्ण जगात मागील व चालू हंगामात कापसाचे उत्पादन (cotton production) कमालीचे घटले असून, मागणी व वापर वाढत आहे. असे असताना कापसाचे दर मात्र दबावात आले आहेत. देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी दक्षिण भारतातील टेक्सटाईल लाॅबीने (Textile lobby) जाेरदार प्रयत्न केले. यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यात टेक्सटाईल लाॅबीने सुताला (cotton yarn) पर्याय म्हणून पाॅलिस्टरच्या (Polyester -Synthetic fiber) धाग्यांच्या वापराला प्राधान्य दिले. एवढेच नव्हे तर चीन व व्हिएतनामधून सुताची आयातही वाढली. आयात केलेल्या सुताचे दर भारतीय सुताचे दर यात माेठी तफावत आहे. 28 काउंटच्या भारतीय सुताचे दर 19 रुपये प्रति किलाे असताना याच काउंटचे आयात केलेले सूत 11 ते 13 रुपये प्रति किलाे मिळायला लागले. त्यामुळे भारतीय सुताची मागणी घटली व सूत गिरण्यास संकटात येऊ लागल्या. याचाही परिणाम देशांतर्गत कापसाच्या दरावर झाला आहे.
🌎 सरकीचे दर
भारतात कापसाचे भाव त्यातील सरकीच्या (cotton seed) दरावर अवलंबून असतात. एक क्विंटल कापसातून 33 ते 35 किलाे रुई आणि 63 ते 65 किलाे सरकी मिळते. कापसाचे जिनिंग करताना व सरकीचे तेल काढताना अंदाजे दाेन किलाे रुई व सरकीची तुट जाते. सध्या बाजारात सरकीचे दर 32 ते 34 रुपये प्रति किलाे आहे. सन 2020-21 मध्ये हेच द सरासरी 18 ते 24 रुपये प्रति किलाे तर सन 2021-22 च्या हंगामात 28 ते 35 रुपये प्रति किलाे दरम्यान हाेते. साेयाबीन (soybean) बाजारात आल्यानंतर सरकीचे दर 28 ते 30 रुपये प्रति किलाेपर्यंत खाली येण्याची शक्यता जिनिंग-प्रेसिंग मालकांनी व्यक्त केली आहे. भविष्यात सरकी व सरकीच्या ढेपेचे (DOC – de oil cake) दर उतरल्यास कापसाचे दर कमी हाेण्याची शक्यता आहे.
🌎 कापसाच्या दराचे गणित
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर १११.९५ सेंट प्रति पाउंड म्हणजेच सरासरी 1 डाॅलर 12 सेंट आहेत. 2.2 पाउंड म्हणजे एक किलाे. सध्या डाॅलरचा दर 80 रुपये आहे. त्यामुळे एक किलाे रुईचे दर 197.12 रुपये म्हणजेच 6,899.2 रुपये प्रति क्विंटल (एक क्विंटल कापसातील 35 किलाे रुई ग्राह्य धरून) हाेतात. 30 रुपये प्रति किलाे दराने सरकीचे प्रति क्विंटल दर 1,920 रुपये हाेतात. रुई व सरकीचे दर एकत्र केल्यास कापसाचा दर हा 8,819 रुपये प्रति क्विंटल हाेताे. व्यापाऱ्यांचा नफा आणि प्राेसेसिंग चार्ज एक हजार रुपये वगळता कापसाचा दर 7,819 रुपये प्रति क्विंटल हाेताे. हा दर रुपयाच्या अवमूल्यनामुळे मिळत आहे. डाॅलरचे मूल्य 80 रुपयांपेक्षा कमी असते तर हा दर यापेक्षा कमी मिळाला असता, अशी माहिती विजय जावंधिया यांनी दिली.
🌎 कापसाचे सरासरी दर (रुपये प्रति क्विंटल)
✳️ सन 2020-21 – 5,000 ते 6,500
✳️ सन 2021-22 – 7,300 ते 11,900
✳️ सन 2022-23 (ऑगस्ट) – 7,100 ते 11,800
✳️ सन 2022-23 (सप्टेंबर) – 8,500 ते 10,100
🌎 वायदे बाजारातील दर (सेंट प्रति पाऊंड रुई)
✳️ ऑगस्ट 2022 – 106
✳️ 22 सप्टेंबर 2022 – 111.95
✳️ 25 सप्टेंबर 2022 – 115.00
✳️ 30 सप्टेंबर 2022 – 107.10
✳️ ऑक्टाेबर 2022 – 122.58
🌎 केंद्र सरकारची उदासीनता
अमेरिकेत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे अधिक उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज नुकताच यूएसडीएने व्यक्त केला आहे. त्यातच जगभर मंदीचे सावट निर्माण झाले असून, भारतासह इतर देशांच्या चलन विनिमय दराच्या तुलनेत अमेरिकन डाॅलरचे मूल्य वाढत आहे. भारतात केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क शून्यावर आणला आहे. त्यातच चीन व व्हिएतनाममधून सुताची आयात (cotton yarn import) वाढली असून, दाेन्ही देश सुताच्या निर्यातीला (export) माेठी सबसिडी (subsidy) देत आहेत. त्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर मुख्य हंगाम सुरू हाेण्यापूर्वीच दबावात आले असून, यात सुधारणा हाेण्यासाठी केंद्र सरकार काहीही उपाययाेजना करायला तयार नाही. दरातील ही स्थिती ऑक्टाेबरमध्ये सुधारण्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही.