Lady of Shalott : द लेडी ऑफ शॅलाॅट…!
1 min read
✳️ टी.व्ही.तील आभासी जग
मोबाईलच्या त्या छोट्या काचेवर डोळे जोडून बघणाऱ्या मुली बघितल्या की, 30-35 वर्षांपूर्वीचे खेड्यातले दृश्य आठवते. खेड्यात नुकताच टी.व्ही. (TV) आला होता. काळा पांढरा! ‘सधन’ शेतकऱ्याकडे.(Farmer) समोरच्या बैठकीच्या खोलीत, पोत्यांच्या थप्प्या बाजूला सारून, छप्पर गळणार नाही, अशा जागेवर टी.व्ही. ठेवलेला असायचा दिवसभर वावरात काम करून घरी आल्यावर आईला घरकामात मदत करून खेड्यातल्या त्या स्वप्नाळू वयातल्या मुली अनावर ओढीने टी.व्ही. समोर येऊन बसायच्या. टी.व्ही.वरचे सगळे कार्यक्रम बघायच्या.बातम्या,जाहिराती, सिनेमे, मालिका, चर्चा, मुलाखती, भाषणं.यांच्यासाठी नवीन असणारं एक जग रोज त्यांना त्यांच्यासमोर दिसायचं.कार्यक्रम संपले की, सुस्कारा सोडून कुणीतरी म्हणायची… ‘चाल गे…. उद्या सकाळी वावरात लवकर जा लागते…!’ टी.व्ही.च्या काचेपलीकडचं जग आपलं नाही, हे कळत असूनही त्या आभासी जगात त्या रोज आवडीने गुरफटत जायच्या.
✳️ आल्फ्रेड टेनीसनच्या कवितेचा सार
आल्फ्रेड टेनीसनची एक कविता आहे. ‘द लेडी ऑफ शॅलाॅट’ (The Lady of Shalott) इंग्रजी साहित्यातील खूपच लोकप्रिय अतिशय सुंदर, अतिशय गूढ रम्य कविता. कवितेचा सारांश असा… एका नदीने वेढलेल्या बेटावर एक राजकन्या (Princess) आहे. तिला एक शाप मिळाला आहे. तिने कधीच राजवाड्याबाहेर पडायचं नाही. बघायचं सुद्धा नाही. तिच्या दिवाणखान्यात खिडकीसमोर टांगलेल्या आरशात बाहेरची दिसणारी दृश्य बघत हातमागावर कापड विणत बसायचं. शापामुळे ती असहाय्य होते. आरशात दिसणाऱ्या बाहेरच्या जगाच्या प्रतिमाच तिचं जग होत. जीवन जगण्याचे फक्त प्रतिबिंब ती आरशात बघत असते. काय काय दिसतं तिला आरशात? शेतात काम करणारे, बाजाराला जाणारे, पाऊलवाटेवरून रमत गमत जाणारे, जिवंत स्त्री पुरुष. नुकतंच लग्न झालेलं जोडपं, तरुण (Youth) मुलींचा घोळका, गंभीर धर्मगुरू आणि घोड्यावरून ऐटीत जाणारे तरुण सरदार… एका क्षणी त्या खऱ्याखुऱ्या जिवंत माणसांच्या जगात प्रत्यक्ष जाण्यासाठी ती उठते. असोशीने, अनावर ओढीने, तीन पावलात अंतर पार करून बाहेर येते आणि शापाचा अंमल सुरू होतो. भारलेल्या मनस्थितीत ती राजवाड्या जवळून वाहणाऱ्या नदीतल्या होडीत बसते. तिचा खऱ्याखुऱ्या जगण्यासाठी प्रवास सुरू होतो आणि तो अखेरचा ठरतो. टेनीसनने तिच्या मृत्यूचे सुद्धा गूढ रम्य चित्र रेखाटले आहे.

✳️ शहरात आलेल्या खेड्यातील मुलींचा अवस्था
10 वी, 12 वी पास होऊन खेड्यातून शहरात येणाऱ्या मुली, लेडी ऑफ शॅलाॅटच वाटतात. त्यांनाही गरीबीचा शाप आणि कष्टाची शिक्षा असते. शेतीतल्या कष्टातून शेतीतल्या गरीबीतून जीवाच्या आकांताने सुटका करून घ्यायला, वेगळ्या नव्या प्रवासाची सुरुवात करायला, त्या शहरात येतात. पाठीवर दप्तर, डोकं आणि चेहरा ओढणीने झाकून घेतलेला. मोबाईलच्या काचेवरची दृश्य कधीतरी आपल्या बाबतीत खरी ठरतील, अशा आशेने, शहरातल्या जगण्याचा वेग आणि स्वतःचा तोल सांभाळत नवा प्रवास सुरू होतो. शहरात राहण्यासाठी, जेवण्यासाठी, चहासाठी, आंघोळीसाठी, रोजचे कपडे धुण्यासाठी सुद्धा त्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. त्यांच्या बिनधास्त वागण्या बोलण्यातून त्यांना वाटत असलेली धास्तीच जाणवत राहते. खेड्यात अंधार असला तरी तो सवयीचा असतो. शहरात रस्त्यावरच्या दिव्यांच्या झगमगाटात रस्ताच सापडत नाही. खेड्यात सज्जन आणि दुर्जन सगळेच ओळखीचे असतात. शहरात सगळेच इतके अनोळखी की स्वतःची ओळखही स्वतःशी जाणीवपूर्वक जपावी लागते. शिक्षणाचा डाव मांडला तरी फासे मनासारखे पडतीलच असे नाही. पण हा मांडलेला डाव मोडायचा नाही हेही पक्कं ठरवलेलं असतं. शहरात शिक्षणाची वेगवेगळी संस्थानं, त्यांची वेगवेगळी दालनं. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपड, सरकारी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी धडपड, शिकवणी वर्गांचा शोध, अभ्यासिकामधले पुस्तकांचे ढीग, तिथली फी. या सगळ्यांशी झुंजत झगडत काही जणी खरेच यशस्वी होतात. कुठेतरी छोटी-मोठी नोकरी मिळून जाते. पण काहीजणी काचेपलीकडच्या स्वप्नात स्वतःला हरवून बसतात आणि भरकटतात. पण काही जणी मात्र पुस्तकं वाचताना जगणंही वाचायला शिकतात. नोकरी मिळाली नाही तरी त्या दुभंगत नाहीत. जमेल तितके शिक्षण घेऊन त्या गावाकडे परततात आणि आत्मविश्वासाने एक वेगळा डाव मांडतात… तो जिंकण्यासाठीच! शिक्षण घेताना त्या शहरातल्या बाजारपेठेची ओळख करून घेतात. मैत्रीचे वर्तुळही वाढते ठेवतात. शहरातल्या बाजारात ‘गावरान’ हा शब्द परवलीचा झाला आहे.
✳️ चतुरंग शेतीचा मार्ग
युगात्मा शरद जोशींनी (Sharad Joshi) सांगितलेल्या चतुरंग शेतीतल्या माजघरशेती, व्यापारशेतीचा मार्ग त्या निश्चयाने स्वीकारतात. लहानपणापासून आईला मदत करताना शिकून घेतलेले, वेगवेगळे मसाले, पापड, कुरड्या, सांडगे, शेवया, सांड्या, मूगवड्या, बोटव्या, सरगुंडे, दह्यातल्या, धनेमेथीपूड भरून, जिरे शोपपूड भरून वाळवलेल्या हिरव्या मिरच्या, वेगवेगळी लोणची, सरबते, मुरांबे हे सगळे कोणतेही ‘प्रिझर्वेटिव्ह’ न वापरता त्या नव्या पद्धतीने शिकतात आणि पद्धतशीर विकतात. शहरातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात योग्य आखणी करून विक्रीसाठी वेगवेगळे स्टॉल लावतात.
झुणका भाकर ठेचा, पाटवड्याची भाजी, मांडे, मोहाच्या पुरणपोळ्या, मोहाची सोजी, बेसन खिचडी अशा खास चुलीवरच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला शहरी लोकांची गर्दी होते. भारतात नव्याने आलेल्या सोयाबीनपासून अनेक पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन त्या या निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत.
✳️ व्यवहारातील पारदर्शकता व उंचावलेला जगण्याचा स्तर
नवीन फॅशनप्रमाणे कपडे शिवणे, जुन्या पद्धतीने नवीन गोधड्या शिवणे, शाळेसाठी विद्यार्थ्यांचे गणवेश मोठ्या प्रमाणात शिवणे असेही उद्योग या नवउद्योजिका यशस्वीपणे करतात. शहरातल्या अनेक दिवाणखान्यात ह्यांनी तयार केलेल्या अनेक सजावटीच्या वस्तू दिसतात. हे सगळे करताना आर्थिक व्यवहारही त्या अचूक करतात. पापडांच्या व्यवसायापासून पतपेढी या पैशांच्या व्यवसायापर्यंत सगळे व्यवसाय करताना त्यांनी समाजाचा विश्वास मिळवला आणि टिकवला आहे. या श्रमलक्ष्मींनी; आळस, व्यसन, निराशा, खोटा अहंकार आणि त्यापायी होणाऱ्या भांडणांचं मळभ दूर केलं आहे. त्यांचे सरदारही नुसती गाणी गात घोड्यावरून रपेट न करता त्यांना योग्य ती मदत करतात. स्वच्छता, सातत्य, उत्पादनाचा दर्जा याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. त्यात तडजोड नाही. सगळ्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि कडवी शिस्त असते. आधी स्वकष्टाने पैसा उभा करायचा, मग बॅंकांचे कर्ज सुद्धा ऐटीत स्वीकारायचे आणि कटाक्षाने परत करायचे. या उद्योगांमुळे पैसा आणि नाव मिळालंच. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढली. एकमेकींच्या मदतीने काम करण्यातला आनंद समजला. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा स्तर उंचावला.
✳️ स्वयंसिद्धांचं प्रतिबिंब
टी.व्ही., मोबाईलच्या काचेवर दिसणाऱ्या बाहेरच्या जगाने रचलेला चक्रव्यूह त्यांनी भेदला आणि यशस्वीपणे त्या बाहेरही पडल्या. तेही आपल्या अनेक मैत्रिणींसोबत. शेतकऱ्यांच्या लुटीच्या व्यवस्थेविरुद्ध ही अहिंसक लढाईची आणखी एक आघाडी आहे. त्या ‘लेडी ऑफ शॅलाॅट’चा आरसाच त्यांनी कोन आणि दिशा बदलून असा काही उभा केला की, आता बाहेरच्या जगालाच त्यांचं प्रतिबिंब त्यात दिसत आहे. आत्मभान जपणाऱ्या, आत्मविश्वासाने वावरणाऱ्या, मैत्री वाढवणाऱ्या या स्वयंसिद्धांचं प्रतिबिंब सगळे जग मोठ्या कौतुकाने बघत आहे.