पाणीदार वृक्ष : उंबर
1 min read🌳 पक्ष्यांच्या आवडीचे झाड
पूर्वी गावामध्ये अनेक ठिकाणी किंवा शेतामध्ये भरपूर उंबराची झाडे होती. या झाडाखाली दत्त प्रभू यांचा निवास असतो, अशी आपल्याकडे मान्यता होती, यामुळे हे झाड तोडणे निषिद्ध मानले गेले होते. त्यामुळे या झाडाचे लाकूड इंधनासाठी वापरत नसत. परिणामी, सगळीकडे मोठ्या प्रमाणावर ही झाडे पाहायला मिळत असत. पक्ष्यांचे खूप आवडीचे झाड म्हणजे उंबर. उंबरला असंख्य फळे येतात. ही फळे पक्ष्यांना खूप आवडतात, यामुळे पक्ष्यांचा उदरनिर्वाह होतो आणि झाडाच्या बियांचा प्रसार पक्ष्यांच्या विष्ठेतून होतो. याप्रकारे निसर्गामध्ये या झाडाचे संवर्धन आपोआप केले जाते.
🌳 उंबराचे वैशिष्ट्य
उंबर हा वृक्ष मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. उंबराचे झाड खूप मोठे असते. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे 40 ते 45 फूट उंच असते. या झाडाला खोडाजवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.
🌳 धार्मिक महत्त्व
उंबर हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. उंबराच्या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते, अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय हे झाड 24 तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात. या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ व पोथ्यांचे वाचन करतात.
🌳 औषधी गुणधर्म
विंचवाने दंश केल्यास त्या जागेवर उंबराच्या झाडाची पाने वाटून लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळ्या (बकऱ्या) आवडीने खातात.
🌳 50 झाडांचे संवर्धन
नागर फाउंडेशनच्या माध्यमातून चिंतामणी मंदिर परिसर, रवळगाव येथे नागर उद्यानाची निर्मिती करताना तेथील जमिनीवर असंख्य झाडे उंबराची उगविली होती. यामधील 50 झाडे आम्ही त्यावेळी राखली होती. ही झाडे आता नागर उद्यानाचे सौंदर्य वाढवत आहेत. मी माझ्या शेतामध्ये पण एक उंबराचे झाड लावले आहे. प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये किंवा अंगणामध्ये उंबराचे झाड लावणे फार गरजेचे आहे. कारण आपल्या आरोग्यासाठी हे खूप लाभदायक आहे.
🌳 उंबराची रोपे
पावसाळ्यात उंबराची रोपे सर्वत्र उगविलेली आपल्याला पाहायला मिळतात. यातीलच काही रोपे आपण आपल्या शेतामध्ये राखू शकतो किंवा लावू शकतो. या उगवलेल्या रोपांना संरक्षण जरी आपण दिले तरी ही झाडे आपोआप वाढतात. यामुळे या झाडाचे संवर्धन करण्यासाठी फक्त या झाडांना संरक्षण द्या, आपोआप झाडे निर्माण होतील.
🌳 आवाहन
नागर फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वाना आवाहन आहे की, प्रत्येकाने एक उंबर हा वृक्ष लावलाच पाहिजे. प्रचंड पुण्य मिळवून देणारे हे झाड आहे. ज्यांना हे झाड लावणे शक्य होणार नाही, त्यांनी हे झाड लावण्यासाठी नागर फाउंडेशनला मदत करावी, आम्ही तुमचे हे झाड लावून त्याचा सांभाळ करून त्याला मोठे करू. या आपण सर्वजण मिळून निसर्ग संवर्धन कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलू!