krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

पावसाळा आला, रानभाज्या खा! पण त्यांच संवर्धन करणार काेण?

1 min read
पावसाळा सुरू झाला की, महाराष्ट्रात दरवर्षी रानभाज्या महोत्सवाचे ऑगस्टमध्ये आयोजन केले जाते. मागील 16 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाचे यंदाचे 17 वे वर्ष असून, हा महोत्सव राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 235 तालुक्यांमध्ये आयोजन केले जाते. या महोत्सवात पावसाळ्यात येणाऱ्या जवळपास 150 रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. आरोग्यवर्धक असलेल्या व दुर्मिळ होत चाललेल्या या रानभाज्या रानमेवा म्हणून ओळखला जाते. शहरी माणसांना या रानभाज्यांच्या उपयोगितेची ओळख व्हावी, त्यांना राजमान्यता मिळून त्यांचा व्यापारी तत्वावर प्रचार प्रसार व्हावा, हा या महोत्सवामागचा राज्य शासनाचा मूळ उद्देश! पण या आराेग्यवर्धक रानभाज्यांवर संशाेधन करून त्यांची उत्पादकता वाढविणे व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणार काेण?

🌱 रानभाज्या म्हणजे काय?
शेती न करता किंवा निगा न राखता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या/रानमेवा असे संबोधतात. जंगलात, माळरानात किंवा शेताच्या धुऱ्यावर (बांध) लागवड न करता या वनस्पती उगवतात. निसर्गत: या वनस्पतींमध्ये मानवी आरोग्याला आवश्यक असलेली खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म आढळून येत असल्याने अलीकडे या रानभाज्या लोकप्रिय होत आहेत. भारतात भाजीपाल्याच्या 55 विविध प्रजाती आहेत. वाढत्या मागणीमुळे उत्पादकता वाढविण्यासाठी यातील बहुतांश भाजीपाल्याच्या पिकांवर संशोधन करण्यात आले. यात रानभाज्या मात्र उपेक्षितच राहिल्या.

🌱 आदिवासींचे खाद्य
खरं तर, रानभाज्या या गरीब व आदिवासींचे खाद्य मानले जायचे. भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे 427 आदिवासी जमाती वास्तव्याला आहेत. महाराष्ट्रात कोरकू, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली अशा 47 जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या जवळपास 32 लाख 83 हजार प्रजाती आहेत. यातील भारतीय आदिवासी 1,530 पेक्षा अधिक वनस्पतींचा त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी नियमित वापर करतात. यात 145 कंद, 521 हिरव्या भाज्या, 101 फुलभाज्या, 647 फळभाज्या आणि 118 बिया व सुकामेव्यांच्या प्रजातीचा समावेश आहे.

🌱 जैवविविधता नामशेष; जबाबदार कोण?
हरितक्रांती काळात धान्याच्या उत्पादन वाढीवर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी हायब्रीड व संशोधित बियाणे व रासायनिक खतांच्या वापराची सक्ती करण्यात आली. रोग व किडींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांना तर मजुरांच्या तुटवड्यावर पर्याय म्हणून तणनाशकांना प्राधान्य देण्यात आले. अन्नधान्यानंतर भाजीपाल्यांच्या पिकांवर संशाधने करण्यात आली. या प्रक्रियेत धान्य, भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. मात्र, खालावणाऱ्या त्यांच्या गुणवत्तेकडे कुणीही लक्ष दिले नाही. सरकारच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे धान्य व भाजीपाला उत्पादकांचे उत्पन्नही जेमतेम राहिले. त्यासाठी तशी धोरणे व योजना अंमलात आणल्या गेल्या. याचा परिणाम जैवविविधता काही प्रमाणात नामशेष होण्यावरही झाला. सरकारने शेतमाल उत्पादन वाढीचे श्रेय स्वत:कडे घेतले आणि जैवविविधता नष्ट होण्याचे खापर मात्र शेतकरी व शेतमाल उत्पादकांच्या माथी फोडले.

🌱 ‘महाराष्ट्र जनुक कोश’
या संपूर्ण प्रक्रियेत रानभाज्यांकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. जेव्हा खालावलेल्या गुणवत्तेचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसायला लागले, तेव्हा याच मंडळींना रानभाज्यांची आठवण झाली. या रानभाज्यांना राजाश्रय मिळावा व त्यांचा व्यापारी तत्वावर प्रचार प्रसार व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने डॉ. माधव गाडगीळ यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र जनुक कोश’ या प्रकल्पाची आखणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध रानभाज्यांचे संकलन व दस्तावेजीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या कामात राज्य सरकारच्या कृषी व वन विभागाची मदत घेतली जात आहे. ‘बायफ’ ही संस्थाही यात कार्यरत आहे. यातून रानभाज्या महोत्सव ही संकल्पना पुढे आली आणि सन 2005 पासून राज्यभर रानभाज्या महोत्सवाला राज्य शासनाने सुरुवात केली.

🌱 महाराष्ट्रातील रानभाज्या
अनवे, आंबुशी, अमरकंद, अळंबी (अळवे), आचकंद आलिंग, आंबट वेल, इकरा, उळशाचा मोहर, उळशाचा मोहर, कपाळफोडी, कडकिंदा, कडूकंद, कवदर, कवळी/कवळा/कवला, कोरलं, काटे-माठ (Amarantus Spinosus), कंटोळी, कुर्डू, कुसरा, कुळू (कोळू), कुलू/फोडशी, कोलासने (तालिमखाना), कोळू ( कुळू), कोवळे बांबू (बांबूचे कोंब), कौला, खडकतेरी, गेंठा, गोमाठी, चाई, चाईचा मोहर, चायवळ, चावा, चिचारडी, चिंचुरडा, चिवलाचे कोंब, टाकळा (Cassia tora), टेंबरण, टेंभुर्णा, टेरा/टेहरा/टेरी/अळू, टाकळा, तळची, तांदुळजा, तांबोळी, तेर अळू, तेल छत्र, तोंडे, दवणा, दिघवडी, दिवा, देठा, दिंडा, धापा, नारळी (नारई), नारेली, पंदा, पाथरी/पातूर, पानांचा ओवा, पिपाना, पुननवर्वा, फांग, फांदा, फोडशी (Celosia Argentea), बडकी, बडदा, बांबूचे कोंब, बेरसिंग, बोखरीचा मोहर, बोंडारा, भारंगी (भारिंगा) (Clerodendrum Serratum), भोपा, भोवरी, माठ/माठ देठ, माळा, मेके, मोरंगी, मोखा/रानकंद मोखा, रक्त कांचन, रुंखाळा, लोथी, लोधी, शेऊळ (शेवळा/शेवळे/शेवाळी,) (Amorthophylus Commutatis),शिडाचे बोख, सतरा, सायर, ससेकान, हळंदा, हादगा…

🌱 विदर्भातील रानभाज्या
आघाडा, आंबाडी, अंबाडा फळे, उतरण, उंबर, करटोली/कर्टोल/करटुली/काटोलं (Momerdica Dioica), काटेसावर, माल कामोनी, पांढरा कुडा, कुड्याची फुले, कुडाच्या शेंगा, कुळमुळी, केना, कोंबडा, कोरड, कवठ, खापरफुटी, घोळ/घोळू/चिवई/चिवळी (Porthulaca), चिवळी, चवळीचे बोके (नवीनच उगवलेल्या चवळीच्या वेलाची टोकाकडची कोवळी पाने), पिंपळ, बहावा, भुईपालक, भुईफोड, भुईआवळा, भोकर, लाल भोपळ्याच्या छोट्या वेलीची कोवळी पाने, भोपळ्याची फुले, महाळूंग, मोहदोडे (मोहा), रताळ्याचे कोंब, रानकेळी, रानतोंडले, रानपदाना, राक्षस, रुई, वांगोटी/वांघोटी/वाघाटी/वाघाटा, वाथरटे, सुरण, सुरणाचा कोवळा पाला, शेवग्याची पाने, फुले व शेंगा, हरभऱ्याची कोवळी पाने, तरोटा, धानभाजी, टेकोडे, ढेमाणी, पकानवेल, भशेल पानवेल, काळा पेठारा, पांढरा पेठारा, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआलं, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, पांढरखडा, करळ काेसला, भोपरं/भुईछत्री/आळंबी, हरदपरी, डुंबर सात्या, शेर डिरे, घेवडा, हेटीचे फुल, पकानभेद, कुरकुरीची भाजी, कडू भाजी…

🌱 महत्त्वाच्या बाबी ऐरणीवर
भारतात या रानभाज्या नामशेष होण्यास शेतकरी जबाबदार असल्यास सूर आळवला जातो. यात कितपत सत्यता आहे? मोठी उपयोगिता असलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या रानभाज्यांचे संवर्धन करून त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आजवर कोणते प्रयत्न केले? या रानभाज्यांचे संवर्धन कसे केले जाईल? सर्व रानभाज्यांची गुणवत्ता कायम ठेवून उत्पादकता कशी वाढेल? त्यांचा शेतीसाठी वापर करून उत्पादकांना चार पैसे अधिक कसे मिळतील? या मूलभूत बाबींवर शासन काहीही करायला तयार नाही. या रानभाज्या विक्रीतून उत्पादकांना किंवा त्या गोळा करणाऱ्यांना किती उत्पन्न मिळते? त्यामुळे संशोधनाविना असलेल्या या रानभाज्यांच्या महोत्सवाचा उपयोग काय? यासह काही महत्त्वाच्या बाबी या महोत्सवाच्या निमित्ताने ऐरणीवर येतात.

2 thoughts on “पावसाळा आला, रानभाज्या खा! पण त्यांच संवर्धन करणार काेण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!