भारतातील रानभाज्यांची ओळख
1 min read🌱 हरदपरीची भाजी :- ही भाजी जंगलात आढळून येते. या भाजीचे रोपटे मोठे असते आणि शेंड्याची पहिली-दुसरी पाच पानेच तोडली जातात.
🌱 कुड्याचे फुल व शेंगा :- कुड्याचे फुल व शेंगा विशेषत: गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील दाट जंगलात आढळून येतात. वाघाच्या भीतीपोटी अनेक जण जंगलात जाऊन हे फुल व शेंगा तोडण्यास घाबरतात.
🌱 केना व पकानभेद :- मोठ्या जलाशयाच्या काठावर आढळणारे हे कांद्याच्या रोपट्यासारखे गवत आहे. याचे आयते करून खातात. कॉमिलीनिएसी कुळातील ही रानभाजी Commelina benghalensis या नावाने ओळखली जाते. वर्षभर आढळणाऱ्या या भाजीमुळे पचनक्रिया चांगली होऊन पोट साफ होते. त्वचाविकार, सूज आदी विकार कमी होतात. लघवी साफ होण्यास मदत होते.
🌱 कुरकुरीची भाजी :- पावसाळ्यानंतर हिवाळ्यात ही भाजी जंगलातील ओलावा असणाऱ्या भागात आढळून येते. या भाजीच्या पुऱ्या बनवून खातात. गडिचरोली व भंडारा जिल्ह्यात ही भाजी आवडीने शोधली व खाल्ली जाते. ही भाजी बाजारात विक्रीला दिसत नाही.
🌱 सात्या (जंगली मशरूम) :- जंगलातील माकोड्यांच्या डुंबरावर व धानाच्या शेतानजीक पावसाळ्यात या उगवतात. बाजारात या भाजीचे दर एक हजार रुपये प्रति किलोपर्यंत असतात.
🌱 कमळकाकडी :- बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात तर संस्कृतमध्ये शालूक म्हणतात.
🌱 गुळवेल :- वेलीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ व त्वचेसारखी असते. तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Tinospora cordifolia असून, गरुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली आदी स्थानिक नावांनी ओळखली जाते. Menispermacea कुळातील या वनस्पतीला इंग्रजीत Heart Leaved Munseed म्हणतात. ही वेल महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. गुळवेल महत्त्वाची औषधी वनस्पती असून, खोड अनेक रोगांवरील औषधात वापरतात. गुळवेल कटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक आहे. ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. गुळवेलीचे सत्व व काढा वापरतात. गुळवेल रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे. मधुमेह, वारंवार मुत्रवेग, कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
🌱 चिवळ :- ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागासह संपूर्ण भारतात वाढते.
🌱 पेंढारी :- ही वनस्पती श्रीलंका, भारत, पाकिस्तान, म्यानमार या देशातील जंगलात आढळते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आसाम येथील जंगलांमध्ये प्रामुख्याने आढळते.
🌱 भोकर :- ही वनस्पती भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशात आढळते.
🌱 शेवळा :- ही वनस्पती केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात मधाील जंगलात आढळते. महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला जिल्ह्यातील जंगलात आढळते.
🌱 पाथरी :- ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारतातील सर्व पठारी प्रदेशात सावलीत, रेताड जमिनीत उगवते. पाथरी सुमारे 60 ते 170 सें.मी. उंच वाढते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Launea procumbens असून, ही वनस्पती अॅस्टरोएसी कुळातील आहे. पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. चारा म्हणून वापरल्यास जनावरांचे दूध वाढते. पाथरीचे चाटण सुक्या खोकल्यास उपयुक्त आहे. भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो. कावीळ व यकृत विकारात ही भाजी उपयुक्त आहे.
🌱 करंबळ :- करमळ किंवा करंबळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत, श्रीलंका, नेपाळ या देशात आढळते. भारतात करमळीचे वृक्ष कोकण, मलबार परिसरात, तसेच आसाम, बिहार या राज्यातही नैसर्गिकपणे जंगलात वाढतात.
🌱 बांबू :- ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचे शास्त्रीय नाव Bambusa Arundinacea असून, ही वनस्पती Poaceae कुळातील आहे. कासेट, काष्ठी, कळक या स्थानिक नावांने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीला इंग्रजी Spiny Thorny Bamboo म्हणतात. गवताच्या कुळातील या वनस्पतीचे आयुष्य किमान 100 वर्षे आहे. ही वनस्पती प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाट तसेच खनदेश व विदर्भात आढळते. बांबूचे मूळ, पाने, बिया कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात. बांबूच्या खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात. बांबूच्या मूळांचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यासाठी उपयुक्त आहे. कोवळ्या कोंबापासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे. कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात. कोवळी पाने दालचिनी सोबत वाटून कफातून रक्त पडत असल्यास देतात बांबूच्या बिया कामोत्तेजक व संसर्गरक्षक म्हणूनही उपयोगी आहेत. बांबूचे बी स्थुलांसाठी आणि मधूमेहींच्या आहारात उपयुक्त आहे.
🌱 माचोळ :- ही वनस्पती भारत, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ट्युनेशिया या देशात आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा या राज्यात आढळते.
🌱 आंबुशी :- आंबुशी या वनस्पतीला आंबुटी, आंबाती आंबटी, आंबोती, चांगेरी, भुईसर्पटी अशीही स्थानिक नावे आहेत. आंबुशीला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल (Indian Sorrel) म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Oxalis Corniculata असून, ती Oxalidaceae कुळातील आहे. आंबुशी प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुड्यातून वाढणारे तण आहे. ही भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. पचनास हलकी असून, चांगली भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्त्राव बंद होतो. चामखीळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात. ताज्या पानांची कढी उपचाच्या रोग्यांना पाचक आहे. आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते. धोतऱ्याचे विष चढल्यास आंबुशीचा रस उतार म्हणून देतात. कफ, वात आणि पूलत्याध यात आंबुशी गुणकारी आहे.
🌱 आघाडा :- ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. या भाजीमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. ही भाजी पाचक असून, मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक असून, हाडे बळकट होण्यासाठी खाल्ली जाते.
🌱 कपाळफोडी :- ही वेलवर्गीय वनस्पती कानफुटी नावाने ओळखली जात असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. ही वर्षायू वेल आहे. ही वनस्पती सॅपिनडिएसी कुळातील आहे. कपाळफोडी केशसंवर्धनासाठी वापरतात. कानदुखीत व कानफुटीत कानात पू झाल्यास पानांचा रस कानात घालतात. मासिक पाळी नियमित होत नसल्यास, अंगावरुन कमी जात असल्यास, जुनाट खोकला, छाती भरणे या विकारात उपयुक्त आमवातात मुळांचा काढा करतात. कपाळफोडीचे पान एरंडेल तेलात वाटून सुजलेल्या सांध्यावर बांधतात.
🌱 कडमडवेली :- पांढऱ्या रंगाच्या या वेलीला कोवळे अंकुर येतात. याची पाने जाड असतात. ही भाजी चिंचेपेक्षाही आंबट असते. अधिक प्रमाणात लसूण वापरून ती बनवली जाते. या भाजीत पोटाचे आजार बरे करण्याची क्षमता आहे. या भाजीतील गुणधर्मांमुळे कफप्रवृत्तीही दूर होते.
🌱 करटोली :- करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून, औषधात वापरतात.
🌱 काटेमाठ :- पावसाळ्यात पडीक व ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, शेतात, कचऱ्याच्या ढिगांवर, सर्वत्र तण म्हणून काटेमाठ ही वनस्पती वाढलेली आढळते.
🌱 गोखरू :- उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते.
🌱 चुका :- ही वनस्पती ओसाड जमिनीमध्ये वाढलेली दिसते. काही ठिकाणी शेतात, बागेत लावली जाते. ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते.
🌱 टाकळा :- ही वर्षायू वनस्पती सिसाल-पिनेसी म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते.
🌱 नळीची भाजी :- ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
🌱 भारंगी :- ही वनस्पती व्हर्बेनेसी म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.
🌱 भुईआवळी :- ही रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती राहिलेली नाही. या रानभाजीचे शास्त्रीय नाव Phyllanthus amarus असून, ही वनस्पती Euphorbiaceae कुळातील आहे. भुईआवळी पावसाळयात सर्वत्र सर्व प्रकारच्या हवामानात आढळते. कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. भुईआवळीचा वापर यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी करण्यास करतात.
🌱 मायाळू :- मायाळू हा बहुवर्षायू वेल असून, या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळू वनस्पती आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. ही वनस्पती त्वचारोग, आमांश, व्रणयावर उपयोगी आहे. मायाळूचे शास्त्रीय नाव Basella alba असून,
इंग्रजीत Malbar Night Shade Indian Spinach म्हणतात. बेलबॉडी या स्थानिक नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती Basellaceae कुळातील आहे. ही औषधी वनस्पती असून, शीतल व स्नेहन आहे. ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, कामोत्तेजक चरबीकारक, विरेचक व भूकवर्धक तसेच कफकारक मादक व पौष्टिक आहे.
🌱 मोरशेंड :- महाराष्ट्रात ही वनस्पती कोकण, पश्चिम घाट, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या पाचही ठिकाणी शेतात, जंगल परिसरात, रस्त्यांच्या कडेने, ओसाड पडीक जमिनीवर, गावात, गावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते.
🌱 वसू :- ही रोपवर्गीय वर्षायू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे. ही हुबेहूब घोळ तसेच पुनर्नवा या वनस्पतींसारखी दिसते.
🌱 हादगा :- या रानभाजी विषयीची माहिती उपलब्ध नाही.
🌱 करटोली :- रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात.
🌱 बाफळी :- हे बी असते आणि कुळीथासारखे चपटे असते. ही भाजी चिरून उकडून, त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनवली जाते. या भाजीच्या फळांचे तेलही काढतात. पोटदुखी, जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन करतात.
🌱 हेळू :- ही रानभाजी औषधी असते, त्याची पाने कुडाच्या पानापेक्षा लहान असतात. या भाजीला पेरूच्या आकाराची फळेही येतात. या फळांची भाजी केळ्याच्या चवीची लागते.
🌱 पानांचा ओवा :- या रानभाजीचे शास्त्रीय नाव Plectranthus amboinicus असून, इंग्रजीत Aromatic Coleus असे संबाेधतात. या वनस्पतीच्या पानांचा वास ओव्यासारखा वास येत असल्याने या वनस्पतीला पानांचा ओवा म्हणतात. या वनस्पतीच्या पानांचा औषधात वापर करतात. पेयजलांना सुवासिक वास येण्यासाठी पानांचा उपयोग केला जाताे. गुरांसाठी औषध म्हणून वापरतात. पोटदुखी, अपचन, कुपचन, पोटशुळ यामध्ये एखादे पान दिल्यास गुण येतो. नेत्राभिष्यन्दात पापण्यावर पानांचा रस लावतात. कीटकदंशावर गुणकारी असून, दमा, जुनाट खोकला, फेपरे आदी. संकोचप्रधान रोगात उपयोगी आहे.
🌱 अळू :- या रानभाजीच शास्त्रीय नाव Colocasia esculenta असून, ही वनस्पती Araceae कुळातील आहे. याला आरवी नावाने ओळखले जाते. ही वनस्पती कंदवर्गीय असून, याच्या हिरवट पांढरी व काळी अशा दोन जाती आहेत. अळूची काळी जात औषधात वापरतात. पानांचे देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करतात. अळूचा रस जखमेवर चोळल्याने रक्त वाहणे बंद होऊन जखमही लवकर भरून येते.
🌱 शेवगा :- या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Moringa oleifera असून, शेवगा मारिंगेएसी कुळातील आहे. याची पाने, शेंगा, फुले, मूळ उपयाेगी आहेत. शेवग्यात दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्याच्या सहापट क जीवनसत्व आणि केळीच्या तीनपट पोटॅशियम तसेच लोह व प्रथिनेही असतात. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असून, मधुमेह व उच्च रक्त दाबावर उपयुक्त आहे. मूळाच्या सालीचा रस कानदुखीत वापरतात. पानांच्या भाजीमुळे सूज, जंत, गळू हे आजार बरे होतात. कृमिनाशक म्हणून उपयुक्त. शारीरिक व मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो.
🌱 कुडा :- या रानभाजीचे शास्त्रीय नाव Holarrhena pubescens असून, इंग्रजीत Konesi Bark Tree म्हणतात. याला पांढरा कुडा असेही संबोधले. ही वनस्पती Apocynaceae या कुळातील आहे. ती महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पर्णझडी जंगलात आढळते. पांढरा कुडा ही महत्वाची औषधी वनस्पती असून, औषधात मुळाची साल व बिया वापरतात. कुष्ठरोग, त्वचारोग यात गुणकारी आहे. धावरे, रक्तस्त्रावयुक्त मुळव्याध, थकवा यामध्ये कुड्याच्या बिया उपयुक्त आहेत. बियांचे चुर्ण चिमूटभर रोज खाल्यास अन्न जिरते, पोटात वायु धरत नाही. अतिसार, ताप, कावीळ, कुष्ठरोग, कफ, त्वचाविकार, पितकोष यात साल गुणकारी आहे. पाने स्तंभक, दुग्धवर्धक व शक्तिवर्धक असून स्नायुंचे दुखणे कमी होतात.
🌱 पिंपळ :- या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Ficus religiosa असून, याला इंग्रजीत Piple म्हणतात. Moraceae कुळातील या वनस्पतीला अश्वत्थ पिप्पल बोधिम असे स्थानिक नाव आहे. हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात. पिंपळाची साल, सालीची राख, कोवळी व सुकी पाने, फळे व बिया औषधात वापरतात.पिंपळाची साल रक्तसंग्राही व पौष्टिक आहे. फळे पाच व रक्तशुद्धी करणारी आहेत. पिकलेले पान विड्याच्या पानांतुन काविळीत देतात. मुळाची साल मधात घासून मुलांच्या मुखरोगात वव्रणावर लावतात. पित्तकोपातही पिंपळ उपयुक्त आहे. कोवळी अंतर्साल अस्थिभंगावर उपयोगी आहे.
🌱 दिंडा :- या रानभाजीचे शास्त्रीय नाव Leea macrophylla असून, याला ढोलसमुद्रिका असे स्थानिक नाव आहे. Leeaceae कुळातील ही वनस्पती पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते. व्रणरोपक म्हणुन ही वनस्पती प्रसिद्ध आहे. औषधात दिंड्याचे मुळ वापरतात. वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन है इतर औषधी गुणधर्म आहेत. कंदाचा लेप नायट्यावरही वापरतात.
🌱 टाकळा :- या रानभाजीचे शास्त्रीय नाव Cassia Tora असून, याला इंग्रजी Foetid Cassia म्हणतात. तरोटा, तरवटा अशी स्थानिक नावेही आहेत. Caesalpinaceae कुळातील ही वनस्पती पडीक, ओसाड जागेवर सर्वत्र वाढलेली असते. टाकळा ही वनस्पती उष्ण कटिबंधातील सर्व देशांत आढळते. टाकळाच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगात देतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे. पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात. पित्तज, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात. त्वचा जाड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग करतात. पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.
🌱 सुरण :- या रानभाजीचे शास्त्रीय नाव Amorphophallus paeoniifolius असून, ही वनस्पती अरेएसी या कुळातील आहे. याची कंद, मूळ व पाने खाण्यासाठी वापरली जातात. सुरणमध्ये अ, ब, क ही जीवनसत्वे आहेत. कंद लोणच्याच्या स्वरुपात वायू नाशी समजला जातो. आतड्यांच्या रोगात सूरणाची भाजी गुणकारी आहे. दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारांवर ही भाजी उपयोगी आहे.
🌱
करटोली :- Cucurbitaceace कुळातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Momordica dioica असून, ही रानभाजी काटोली, कटुर्ल, रानकारली, कर्कोटकी या स्थानिक नावाने ओळखली जाते. डोकेदुखीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन व नारळाचा रस एकत्र कररून चोळतात. मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात. करटोलीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मुळव्याध यात गुणकारी आहेत. भाजी रुचकर असुन, पोट साफ़ होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहामध्ये या भाजीचे नियमीत सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते. मुळव्याध मधील वरचेवर रक्तस्राव वेदना ठणका यामध्ये भाजी अत्यंत हितकारक आहे.
यातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन कसे केले जाईल? सर्व रानभाज्यांची गुणवत्ता कायम ठेवून उत्पादकता कशी वाढेल? त्यांचा शेतीसाठी वापर करून उत्पादकांना चार पैसे अधिक कसे मिळतील? या मूलभूत बाबींवर सरकार काहीही करायला तयार नाही. त्यामुळे संशोधनाविना असलेल्या या रानभाज्यांच्या संवर्धनाच्या सरकारी पातळीवरील गप्पांचा उपयोग काय?
✳️ संकलित माहिती
Very nice i formation not so easily available otherwise.
Try to organise sales counter in pune. Spread the address of the same.
छान माहिति
मला अजुन ईतर रानभाज्या बद्दल माहिति हवि.
क्रुपया मेल करा.
तसेच काहि बियाने उपलब्ध करुन संवर्धन करता येईल का कळवा.