krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

बांगलादेशची ट्रान्सजेनिक बीटी काॅटनला परवानगी; भारतीय वाणाला प्राधान्य तर चिनी वाणाला नकार

1 min read
जगात भारताव्यतिरिक्त सर्वच कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचे ट्रान्सजेनिक बीटी (Transgenic Bt Cotton) वाण वापरले जाते. भारतीय शेतकरी सध्या वापरत असलेले कापसाचे बीटी वाण टेक्नाॅलाॅजी अपग्रेड (Technology upgrade) न केल्याने तसेच केंद्र सरकारने जीएम बियाणे (GM Seed) वापरावर परवानगी घातल्याने बीटी कॉटनचे कालबाह्य वाण वापरत आहेत. कापसाच्या उत्पादन आणि उत्पादकतेत वाढ व्हावी म्हणून बांगलादेशच्या नियामकांनी जून 2022 मध्ये कापसाच्या ट्रान्सजेनिक बीटी वाणाला परवानगी दिली आहे. बांगलादेशने भारतीय ट्रान्सजेनिक बीटी काॅटनला प्राधान्य देत बीटी कॉटनच्या चिनी तंत्रज्ञान व वाणाला मात्र नकार दिला आहे.

🌎 कापसाच्या उत्पादनात वाढ
बांगलादेशात कापड उद्याेग माेठा आहे. त्यांचा जागतिक कापड बाजारातील निर्यातीमधील वाटाही 14 टक्के आहे. तुलनेत कापसाचे उत्पादन मात्र कमी आहे. बांगलादेशातील कापसाच्या जातीचे प्रति हेक्टर 30 क्विंटल (एकरी 12 क्विंटल) उत्पादन हाेते. त्यामुळे त्यांना कापड उद्याेगासाठी लागणारा कापूस दरवर्षी भारतातून आयात करावा लागताे. नेमकी हीच बाब हेरून कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी बांगलादेश नियामकांनी (Bangladesh Regulators) ट्रान्सजेनिक बीटी काॅटनच्या दाेन वाणांना परवानगी दिली आहे. या दाेन्ही वाणांच्या वापरामुळे कापसाचे उत्पादन प्रति हेक्टर 10 क्विंटलने वाढून ते 40 क्विंटल म्हणजेच एकरी किमान 16 क्विंटल हाेणार आहे. ट्रान्सजेनिक बीटी वाण राेग व किडींना प्रतिबंधक असल्याने बाेंडअळी (Bollworm) व इतर किडींच्या (Pest) व्यवस्थापनावर हाेणारा खर्चही कमी हाेणार आहे. त्यामुळे बांगलादेश नॅशनल टेक्निकल कमिटी ऑन क्रॉप बायोटेक्नॉलॉजी (BNTCCB) ने बीटी काॅटनच्या दोन वाणांना परवानगी दिली आहे. त्यांनी ते दोन्ही वाण हैदराबाद येथील भारतीय कंपनी जेके ॲग्री जेनेटिक्स (JK Agri Genetics)कडून मिळविले आहेत.

🌎 कापसाच्या आयातीवर माेठा खर्च
कापडाच्या उत्पादनासाठी बांगलादेशला माेठ्या प्रमाणात कापसाची आयात करावी लागते. या आयातीवर त्यांना दरवर्षी किमान 5 बिलियन अमेरिकन डाॅलर खर्च करावे लागते. सन 2022-23 च्या हंगामात बांगलादेशात 1,55,000 गाठी कापसाचे उत्पादन झाले हाेते. हा कापूस कापड उत्पादनासाठी पुरेसा नसल्याने त्यांना 90 लाख गाठी कापूस आयात करावा लागणार आहे, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA United States Department of Agriculture) त्यांच्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालात नमूद केले आहे.

🌎 बांगलादेशातील दुसरे अनुवांशिक-अभियांत्रिकी पीक
बांगलादेशने सन 2013 मध्ये बीटी वांग्याच्या (Bt Brinjal) उत्पादनाला परवानगी दिली हाेती. त्यानंतर आता Bt काॅटनला परवानगी दिल्याने कापूस हे बांगलादेशातील दुसरे अनुवांशिक-अभियांत्रिकी (Genetic Engineering Technology) पीक असेल. व्हिटॅमिन A युक्त सोनेरी तांदूळ (Golden Rice) अनुवांशिक-अभियांत्रिकी पिकाच्या परवानगीचा प्रस्ताव चार वर्षांपासून बांगलादेश नॅशनल टेक्निकल कमिटी ऑन क्रॉप बायोटेक्नॉलॉजीकडे निर्णयाधिन आहे. बांगलादेशचे शेतकरी कापसाच्या परंपरागत वाणांच्या तुलनेत नवीन बीटी कापसापासून प्रति हेक्टर 1,00,000 रुपये अधिक कमावतील, असेही बांगलादेशच्या कापूस विकास मंडळाच्या (CDB) क्षेत्रीय प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे.

🌎 चिनी तंत्रज्ञानाला नकार
कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी बांगलादेशसमाेर भारतीय व चिनी बीटी तंत्रज्ञान असे दाेन पर्याय उपलब्ध हाेते. यात बांगलादेशने भारतीय भारतीय बीटी कापूस तंत्रज्ञानाला प्राधान्य देत चिनी बीटी कापूस तंत्रज्ञान नकारले आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय तांत्रिक समिती ऑन क्रॉप बायोटेक्नॉलॉजी (BNTCCB) ने बीटी कापसाच्या JKCH-1947 Bt आणि JKCH-1050 Bt या दाेन बीटी वाणांना परवानगी दिली आहे. हे दाेन्ही वाण एक्स-जीन (X-Gene cry1Ac Truncated event-1) असून, ते हैदराबाद येथील जेके ॲग्री जेनेटिक (JK Agri Genetics) कडून जून 2022 मध्ये घेतले आहेत. नजीकच्या काळात नॅशनल कमिटी ऑन बायोसेफ्टी (NCB) द्वारे बांगलादेशमध्ये बीटी कापसाला ( Bt cotton) ला व्यावसायिक मान्यता दिली जाईल. बांगलादेशचे कापूस विकास मंडळ (CDB) भारतातील जेके ॲग्री जेनेटिक (JK Agri Genetics) च्या सहकार्याने बीटी कापसाचे वाण विकसित करत आहेत. यासाठी बांगलादेश सन 2017 पासून जैवसुरक्षेचे (Biosecurity) काळजीपूर्वक व कठोरपणे मूल्यमापन करत आहे. या वाणांची स्थानिक परिस्थितीत परिणामकारकता आणि कृषीविषयक कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी क्षेत्रीय चाचण्या घेण्यात येत आहेत. जेके ॲग्री जेनेटिकने विकसित केलेले X-gene आधारित cry1Ac मध्ये आयआयटी (IIT) खरगपूरच्या सहकार्याने इव्हेंट-1 समाविष्ट केले आहे. सन 2006 मध्ये भारताच्या GEAC द्वारे त्याला बायोसेफ घोषित करून व्यावसायिक लागवडीला मान्यता दिली.

🌎 दुसऱ्या क्रमांकाचा कापूस आयातदार देश
बांगलादेश हा काॅटन फायबरचा (कापसाची रुई व धागे) दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. बांगलादेशात कापड क्षेत्रासाठी उत्पादनासाठी दरवर्षी सुमारे 40 ते 45 लाख गाठी कापसाचा वापर केला जाताे. मात्र बांगलादेशात कापसाचे उत्पादन फारच कमी आहे. बांगलादेशात 70,000 शेतकरी एकूण 40,000 हेक्टरमध्ये कपाशीची (Cotton) लागवड करतात आणि वर्षाकाठी 15,00,000 लाख गाठींचे उत्पादन घेतात. हे उत्पादन मागणीच्या तुलनेत किमान 45 लाख गाठींनी कमी आहे. बांगलादेशने कीड व राेग प्रतिबंधक ट्रान्सजेनिक बीटी काॅटनला परवानगी दिल्याने त्यांचे कपाशीखालील लागवड क्षेत्र, कापसाचे उत्पादन आणि उत्पादकतेत वाढ हाेणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले. तुलनेत भारतात मात्र कापसाचे उत्पादन व उत्पादकता वर्षागणित कमी हाेत असून मागणी वाढत असताना भारतातील सत्ताधारी व विराेधक समाजवादी, साम्यवादी व पर्यावरणवाद्यांच्या दबावाला बळी पडून अनुवांशिक-अभियांत्रिकी तंत्रज्ञानावर (Genetic Engineering Technology) बंदी घालण्यात धन्यता मानत आहे.

1 thought on “बांगलादेशची ट्रान्सजेनिक बीटी काॅटनला परवानगी; भारतीय वाणाला प्राधान्य तर चिनी वाणाला नकार

  1. छान बांगला देशातील कापड ऊद्योग विकासासाठी भारताचे बिटी कापूस तंत्र ज्ञानाला अपडेट करण्याचे व चीनचे तंत्र ज्ञानाला परवानगी नाकारणे जी एम ई तंत्रज्ञान समीती द्वारे घोषीत झाले आहे.बांगलादेश ने ट्रान्सजेनीक बीटी कापसाला परवानगी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!