krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

नदी आणि समुद्र…..

1 min read
अगदी नेमक्या शब्दात गदिमांनी नदीचं सार ह्या कवितेत सांगितलं आहे. परंतु, अलीकडे अशा कविता आणि त्यात सांगितलेलं सार जवळपास सर्वच लोकं विसरली आहेत म्हणून वाईट वाटते. नदी जेव्हा समुद्राला मिळते, तेव्हा तिचं पाणी वाया जाते, असं म्हणत देशभरात धरणे उभी राहिली. धरणे पुरेशी नव्हती तेव्हा आता नदीजोड प्रकल्पाचा हव्यास आम्ही धरला आहे.

नदी सागरा मिळ्ता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर
काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणूनची जग चाले…

धरण म्हणजे नदीचं मरण
धरण म्हणजे नदीचं मरण, हे अजूनही लोकांना समजत नाही हे दु्दैव आहे. जागतिक तापमान वाढीच्या अनुषंगाने जगभरात धरणांचा धोका लक्षात घेऊन जिथून धरणांना सुरुवात झाली, त्या युरोपातून नद्या धरणमुक्त करण्याची मोहीम सुरू झाली आहे. सगळा विध्वंस केल्यानंतर युरोपीय लोकांना सुबुद्धी सुचली त्यातून हे घडते आहे. जागतिक तापमान वाढीमुळे अतिवृष्टीच्या घटना सर्वत्र घडू लागल्या आहेत. अशात धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास काय हाहाकार होऊ शकतो, हे आपण कोल्हापूर, सांगली सातारा ह्या ठिकाणी पाहिलं आहे. अशावेळी धरणात पाणी जास्त काळ तोलून ठेवता येत नाही. नाईलाजाने ते बाहेर सोडून द्यावं लागते आणि महापुरात धरणं उत्प्रेरक म्हणून काम करतात.

जंगल आणि नैसर्गिक परिसंस्था
हे ओळखून युरोपात धरणे फोडून धरण परिसरातील जंगल आणि नैसर्गिक परिसंस्था पुन्हा प्रस्थापित केल्या जात आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा नदी वाहती असते, तेव्हा ती डोंगरातील गाळ वाहून आणून सुपीक जमिनी बनवते. जिथे उत्कृष्ठ शेती होते. जंगल वाढते, ज्यामुळे जास्तीत जास्त अतिवृष्टी झाली तरी एखाद्या स्पंजप्रमाणे जंगल पाणी सामावून घेतं. असे म्हणतात, गंगा जेव्हा स्वर्गातून जमिनीवर आली. तेव्हा तिच्या प्रचंड प्रवाहामुळे विनाश ओढवू नये म्हणून शंकराने आपल्या जटांमध्ये तिला धारण केलं आणि कदाचित म्हणूनच आपण पर्वताना गिरिराज म्हणून संबोधतो. पर्वतावरील जंगल देखील शंकराच्या जटांप्रमाणे काम करत असते. म्हणून कदाचित आपली लोकं पर्वत रांगाना गिरिराज असे संबोधत.

सागरी जीवांची अवस्था
नदी जंगल वाढवते आणि जंगल नदीला जमिनीत साठवते. परिणामी, भूजल पातळीत वाढ होते. शिवाय, कित्येक सजीवांची साखळी नदीच्या प्रवाहामुळे सुरू राहते. आमच्या पालघर जिल्ह्यात सूर्या नदीवर जेव्हा धरण नव्हते, तेव्हा पावसाळ्याच्या वेळी पोचा कोळंबी (giant fresh water prawn) प्रजननासाठी नदीतून खाडी क्षेत्रात प्रवास करायची आणि तिथे असंख्य पिल्लांची पैदास व्हायची. त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून हे बीज पकडले जायचे आणि महाराष्ट्रभर कोळंबी प्रकल्पांना विकले जायचे. पुढे सूर्या नदीवरती धरण आले आणि त्यामुळे कोळंबीचे नदीतून खाडीकडे जाणे बंद झाले. परिणामी, आज आमच्या जिल्ह्यात गोड्या पाण्यातील कोळंबीचे बिजच मिळायचे बंद झाले. अशीच काहीशी अवस्था कित्येक सागरी जीवांची होते आहे.

नदीचं पाणी सागरी जीवांचे अमृत
नदी जेव्हा समुद्राला मिळते, तेव्हा तिचं पाणी कधीच वाया जात नसते. उलट ती जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तिचं पाणी सागरी जीवांच्यासाठी अमृताचे काम करते. नदी शेकडो किलोमीटरहून वाहून आणलेला गाळ खाडी समुद्राला देते. ज्यामुळे किनारी भागात वनस्पती प्लावकांची भरमार होते. हे सागरी प्लवक कित्येक माशांच्या पिल्लांसाठी प्रमुख पाहिलं अन्न म्हणून काम करते. म्हणून खोल समुद्रात राहणारे मासे देखील पिल्लांना जन्म देण्यासाठी खोल समुद्रातून किनारपट्टी जवळ प्रवास करतात. त्याचप्रमाणे कित्येक सागरी जीव उदा. कांदळवन इत्यादी मध्ये आढळणाऱ्या खेकड्याच्या माद्या अंडी देण्यासाठी किनारपट्टी वरून खोल समुद्रात 100 किमीपर्यंत शुद्ध खाऱ्या पाण्याच्या ठिकाणी त्यांची लाखो अंडी सोडतात आणि त्यानंतर त्यांची पिल्ले एकूण पाच अवस्थेतून जातात. शेवटच्या अवस्थेत असताना ते नदी जिथे खाडी बनवते अशा निमखाऱ्या पाण्याजवळ प्रवास करतात. तिथे शेवटची कात टाकून ते मूळ खेकड्याच्या रुपात येतात. अशारीतीने नदी तिच्या उगमापासून ते समुद्र संगमापर्यंत जिथे जाईल, तिथे जीवन देत जाते. तिच्यावर बांधलेलं धरण म्हणजे तिच्यावर अवलंबून असलेल्या शेकडो प्रजातींचे मरण असते. नदीचं पाणी समुद्रात कधीच वाया जात नसते. आपण नसते उद्योग करण्यासाठी ते वाया जातं असा सोयीस्कर प्रचार करतो.

RRZ आणि RFP
जागतिक तापमानात वाढ होत असताना आपण नद्यांचसोबत अगदी विचित्र वागत आहोत. त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या पाणथळ जागा, तलाव, झरे बुजवून टाकतो आहोत. त्याची विशेष सोय आपण पाणथळ भूमी कायद्यात घातक बदल करून पाणथळ भूमीचे असलेले संरक्षण काढून त्याठिकाणी भराव केले जात आहेत आणि त्यावर मोठंमोठी निवासी संकुले उभी राहत आहेत. एवढ्यावर भागले नव्हते तर आपण नदीसाठी आवश्यक असलेला RRZ (Riparian Reserve Zone) म्हणजेच नदी प्रभाव क्षेत्र, म्हणजेच नदीच्या दोन्ही बाजूला असलेला बफर झोन रद्द करून तिथे रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट (River Front Project)ची आखणी करून नदीचे प्रवाह अडवणारे बांधकाम करत तिथे मोठंमोठी निवासी संकुले उभी राहिली आहेत. परिणामी, रिव्हर व्ह्यू नाव असलेली अशी निवासी संकुले अतिवृष्टीमुळे इन साईड रिव्हर होत आहेत. एवढ्यावर भागले तर नशीब, पण याही पुढे अतिवृष्टीमुळे येणारे महापूर रोखता यावेत म्हणून नद्यांच्या भोवती संरक्षक भिंती बांधून नदीला जखडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करणार होते.

शहणे होणे गरजेचे
आता तरी शहणे होणे गरजेच आहे. ज्या पश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण करून आपण नद्या संपवतो आहोत आता त्याच पश्चात्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहून दिलं पाहिजे. सरते शेवटी आयआयटीचे डॉ. जी. डी. अग्रवाल यांनी गांगेवरती धरण नको म्हणून अन्नत्याग करून देहत्याग केले. त्यांचे बलिदान वाया जाऊ नये. नदी जीवनदायी आहे. पण तिच्यावर अत्याचार केले तर ती जीवन हिरावूनही घेते आणि यात दोष तिचा नसतो. आपलाच दोष असतो हे लक्षात घेऊन आता तरी शाहणे होऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!