भीती क्लायमेट रेफ्युजी वाढण्याची!
1 min read🌐 समस्यांचा विळखा
गोऱ्या-काळ्यांमधील भेदही जवळपास नामशेष झालाय्. पण, झाडे लावण्याची, निसर्ग-पर्यावरण रक्षणाची सवयही आम्ही सोडून दिली. निसर्गाचे फक्त शोषण मात्र करीत आहोत. याचे दुष्परिणाम पुढ्यात आहेत. आज क्लायमेट चेंज, म्हणजेच वातावरणातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या विळख्यात संपूर्ण पॄथ्वी सापडली आहे. आजच दखल घेतली नाही, यावर उपाय शोधले नाहीत, शोधलेल्या उपायांवर अंमल केला नाही, तर भविष्यात उपाय योजायलाही माणसं उरणार नाहीत, इतक्या भीषण परिस्थितीचा सामना संपूर्ण मानवी समुहाला करावा लागणार आहे.
🌐 क्लायमेट चेंज म्हणजे काय?
तापमान आणि हवामानाच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेतले अथवा ठेवणीतले बदल म्हणजे क्लायमेट चेंज. तसे बघितले तर हे बदल निसर्ग त्याच्या कलाने, गरजेनुसार, कालांतराने करत असतोच. सूर्यमालेतील नैसर्गिक बदलांचे परिणाम म्हणूनही वातावरणात काही बदल घडून येत असतात. पण अलीकडे, विशेषतः सन 1800 पासूनचे क्लायमेट चेंज नैसर्गिक कमी आणि बेताल मानवी वर्तनातून अधिक उद्भवलेले आहेत. कोळसा, तेल, गॅसच्या प्रमाणाबाहेरील ज्वलनातून उत्सर्जित होणाऱ्या वायूमुळे तापमान कितीतरी पटीने वाढताहेत. या ज्वलनातून पॄथ्वीभोवती एक जाडसा थर तयार होतो. माणसाने अंगावर एखादे ब्लॅंकेट गुंडाळून घ्यावे, तशी सारी पॄथ्वी या थराच्या आत गुंडाळली जाते. परिणाम एकच. तापमानातील वाढीचा.
🌐 तापमानातील वाढीची कारणे
वाहनं चालवायला लागणाऱ्या अमाप गॅसोलीनपासून तर, जंगलतोडीपर्यंतच्या विविध कारणांमध्ये भर पडते ती, उद्योग, वाहतूक, शेती, जमीनीचा वापर. अशा वेगवेगळ्या गोष्टींची. वाढते शहरीकरण, प्रदूषण यातून जमा होणाऱा कचरा जाळण्यामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूची समस्याही जोडीला आहेच. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वायूच्या सततच्या उत्सर्जनामुळे मागील सव्वादोन शतकात भूतलाच्या एकूण सरासरी तापमानात 1.1 अंश डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यातही, सध्याच्या दशकातील तापमानवाढीने तर यापूर्वीचे सारे रेकाॅर्ड्स तोडले आहेत, तापमानात इतकी वाढ या कालावधीत नोंदविली गेली आहे. तापमानातील वाढ हा तर क्लायमेट चेंज दर्शविणारा एक घटक आहे. पण तो काही एकमेव घटक नाही. तापमानातील बदल, वाढी व्यतिरिक्तही इतर अनेक बाबी क्लायमेट चेंजच्या परिणाम स्वरूप समोर येताहेत. शेवटी पॄथ्वीतलावरील सर्वंच घटक, घडामोडींची एक विशिष्ट प्रकारची साखळी आहे वअसते. या प्रत्येक गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. त्या एकमेकांवर परिणामही करतात. पॄथ्वीच्या एका भागात घडलेल्या बदलांचे परिणाम पॄथ्वीच्या दुसऱ्या भागातील लोकांवर होऊ शकतो, तो त्यामुळेच.
🌐 वातावरणातील बदलांचे परिणाम
चटके बसतील इतके कडक उन्ह, दुष्काळ, पावसाची कमतरता, पाण्याचे दुर्भिक्ष्य, जंगलातील आगीच्या वाढत्या घटना, समुद्र पातळीतील वाढ, पूर, ग्लेसिअर्स मधील बर्फ वितळण्याच्या घटना, उत्पन्न होणारी वादळं, जैव विविधतेचे सातत्याने घटत चाललेले प्रमाण..हे सारे परिणाम वातावरणातील बदलांचे आहेत. हा झाला पॄथ्वीतलावर होणारा दॄश्य स्वरूपातील परिणाम. पण मग थेट मानवावर होणाऱ्या परिणामांचे काय? त्या परिणामांची चर्चा तर व्हायलाच हवी. कारण त्याचे गांभीर्यही तेवढेच भीषण आहे. माणसांच्या तब्बेती बिघडत चालल्या आहेत. जमिनीचा कस कमी होतोय. पोत घसरतोय्. शेतात अन्नधान्य पिकवण्याची मातीची क्षमता कमी होतेय. जाणवण्याइतपत नसला तरी, एकूण मानवी क्षमतांवरही क्लायमेट चेंजचे नकारात्मक परिणाम होताहेतच. समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या छोट्या छोट्या बेटांवरील लोकांना, समुद्र पातळीतील वाढीच्या परिणाम स्वरूप इतरत्र स्थानांतरीत व्हावे लागण्याच्या घटनांची संख्या दखलपात्र ठरावी इतकी वाढतेय अलीकडे. त्या भागातील पिण्याच्या पाण्यातले खारेपण वाढत असल्याच्या नोंदीही आहेतच. हे असेच सुरू राहिले तर, भविष्यात क्लायमेट चेंज मुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या शरणार्थींची, क्लायमेट रेफ्युजींची संख्याही गंभीर म्हणावी इतकी वाढण्याची शक्यता आणि भीती दोन्ही व्यक्त होऊ लागली आहे. युनोच्या एक नव्हे, तर अनेक अहवालांमधून आणि विविध देशांतील सरकारी, सामाजिक यंत्रणाच्या अभ्यासातून तापमानातील सध्याची वाढ 1.5 अंश सेल्सिअसच्या आत रोखून धरण्याची आवश्यकता प्रतिपादीत झाली आहे. तसे करू शकलो तरच मानवाच्या बचावाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानातील वाढ रोखून धरण्याचे मोठेच आव्हान समोर उभे ठाकले आहे.
🌐 सारेच जबाबदार
बेकसूर कोणीच नाही इथे. कमी अधिक प्रमाणात सारेच जबाबदार आहेत या परिस्थितीसाठी. जगातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशात होणारे कार्बन उत्सर्जन तर धोक्याची घंटा वाजविणारे आहे. उत्सर्जनाच्या प्रमाणावरून विविध देशांची विभागणी करावी तर तीही विचित्र आहे. कमी उत्सर्जन करणाऱ्या शंभर देशांचा एकूण वाटा केवळ तीन टक्क्यांचा आहे. तर फक्त दहा मोठे देश या उत्सर्जनात ६८ टक्क्यांची भर घालतात. तफावत इतकी मोठी आहे. खरं तर अधिक उत्सर्जन करणाऱ्या देशांचीच यासंदर्भातील जबाबदारी अधिक ठरते. पण त्यांच्याच वर्तनात बदल घडून येत नाही, हेच वास्तव आणि दुर्दैवही आहे.
🌐 उपाययोजना
या भीषण समस्येवर काही उपाय आहेत की नाही? आहेत ना. ते योजले गेलेत तर त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागतील. लोकांचे जीवनमान त्यामुळे बदलेल. यादॄष्टीने वैश्विक स्तरावर काही आराखडेही तयार झाले आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, यूएन फ्रेमवर्क ॲण्ड कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, पॅरीस ॲग्रीमेंट असे तीन महत्वपूर्ण दस्तावेज सध्या यासंदर्भात उपलब्ध आहेत. त्यात कामाचा आराखडा आहे, उपाय आहेत, समस्येचे गांभीर्य स्पष्ट करण्यात आले आहे, निधीच्या आवश्यकतेची गणितं देखील त्यात मांडण्यात आली आहे. सध्याची ऊर्जा प्रणाली बदलावी लागेल. सौर, पवन, जलविद्युत प्रकल्पांसाठी पुढाकार घ्यावा लागेल. उद्या बघू असे म्हणून चालणार नाही. जे करायचे ते आज, आतापासून करावे लागेल. एका अभ्यासातील निष्कर्ष असे सांगतात की, उत्सर्जनाचे प्रमाण 2050 पर्यंत शून्यावर आणण्यास कटीबद्ध असलेल्या देशांनी 2030 पर्यंत त्याचा निदान अर्धा टप्पा तरी गाठला पाहिजे. तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसच्या आत रोखून धरायची असेल, तर जमिनीखालील इंधनाच्या उत्खननात किमान 6 टक्क्यांची घट आवश्यक आहे. निसर्गाची मूळ रचना जपण्याचा प्रयत्न झाला तर लोकांचे, घरांचे, उद्योगाचे, व्यापाराचे, पायाभूत सुविधांचे, नैसर्गिक इको सिस्टीमचे संवर्धन होऊ शकणार आहे. या उपाययोजनांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लागणार आहे. काहीशा महागड्या ठरणार आहेत. या उपाययोजना. पण, त्याही पेक्षा, त्या अंमलात आणल्या नाहीत ना, तर ते त्याहून महाग पडणार आहे. यातील कुठला पर्याय निवडायचा हे माणसाच्याच हातात आहे.