krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

जागतिक बाजारात मंदीचे सावट; कापसाचे दर कमी होण्याची चिन्हे!

1 min read
सन 2021-22 च्या हंगामात भारतासाेबतच जागतिक बाजारात कापसाचे दर चढे राहिले. भारतात या हंगामाच्या शेवटी कापसाचे जिनिंग थांबल्याने तसेच कापड उद्याेजकांनी सूत खरेदीत हात आखडता घेतल्याने कापसाचे दर 10,500 ते 11,500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिरावले. कापसाचे उत्पादन घटल्याने तसेच तुलनेत वापर व मागणी वाढल्याने या हंगामात कापसाचा चढा दर मिळाला. दुसरीकडे, कापसाचे दर कमी करण्यासाठी भारतातील कापड उद्याेजकांनी प्रयत्नही केले. अमेरिकेतील काेरडा दुष्काळ, चीनमधील लॉकडाउन आणि जागतिक कापूस बाजारात निर्माण झालेले मंदीचे सावट बघता, सन 2022-23 च्या हंगामाच्या मधल्या काळात कापसाचे दर सध्याच्या दराच्या तुलनेत खाली येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

🌎 कापसाच्या दरात घसरण
सन 2022-23 च्या हंगामात काही देशांमध्ये कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यातच जुलै 2022 पासून कापसाची मागणी कमी झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाच्या किमतीतील ‘बुल-रन’ संपल्यागत दिसत आहे. त्यामुळे भारतात सध्या कापसाचे दर 48,900 ते 49,500 रुपये प्रति गाठ असले तरी ते डिसेंबर 2022 च्या अखेरीस 30,000 रुपये प्रति गाठीपर्यंत खाली येतील. इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर डिसेंबर 2022 मधील फ्युचर्स 80 सेंट प्रति पाउंडपर्यंत घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली असून, याला शेतकरी नेते विजय जावंधिया व महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी दुजोरा दिला आहे. सन 2021-22 च्या हंगामात भारतात कापसाचे दर 50,330 रुपये प्रति गाठ या विक्रमी उच्चांकावर पाेहाेचले हाेते. ते आता 18 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या आठवड्यात भारतातील ICE फ्युचर्समध्ये हे दर 11 टक्क्यांनी खाली आले आहेत. जागतिक बाजारात कापसाचे दर 170 सेंट प्रति पाऊंड या विक्रमी उच्चांकावरून 37 टक्क्यांनी खाली आले. ही प्रक्रिया मे 2022 पासून सुरू झाली. कापसाची मागणी घटणे, डाॅलर सुदृढ हाेणे, कापसाचे उत्पादन वाढणे, जागतिक मंदीची भीती या बाबी कारणीभूत असल्यानेही जाणकार व्यक्ती सांगतात.

🌎 नवीन हंगामात दर किती असतील?
सन 2021-22 च्या हंगामात जागतिक बाजारपेठेत कापसाचे (रूई) दर 1 डॉलर 70 सेंट प्रति पाउंडपर्यंत चढले होते. त्यावेळी विनिमय दर 77 रुपयाला 1 डॉलर एवढा होता. भारतीय बाजारपेठेत सरकीचे दर (सोयाबीनच्या तेजीमुळे) 30 ते 35 रुपये प्रति किलो होते. त्यामुळे भारतात कापसाचे दर 10,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारतात कापसाचे दर प्रति क्विंटल 10,000 रुपयांच्या वर गेले होते. सध्या जागतिक बाजारपेठेत कापसाचे (रूई) दर 1 डॉलर 24 सेंट प्रति पाउंडपर्यंत उतरले आहेत. वायदे बाजारात हेच दर 80 सेंट प्रति पाउंडपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे नवीन हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये कापसाचे (रूई) दर 30,000 रुपये प्रति गाठ अर्थात 60,000 ते 62,000 रुपये प्रति खंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या काळात सरकीचे दर किमान 30 रुपये प्रति किलो राहिल्यास कापसाला प्रति क्विंटल 6,500 ते 7,000 रुपये दर मिळू शकतो. सरकीचे दर यापेक्षा खाली आल्यास कापसाचे दर किमान आधारभूत किमतीच्या आसपास म्हणजेच 6,080 रुपये प्रति क्विंटल येण्याची शक्यताही विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.

🌎 कापसाची निर्यात घटणार
जागतिक कापूस आयातीमध्ये चीनचा वाटा 21 टक्के आहे. एकीकडे अमेरिकेत मंदीचे सावट निर्माण झाले आहे तर दुसरीकडे चीनमध्ये लाॅकडाऊन आहे. याचा परिणाम कापसाच्या सध्याच्या दरावर झाला आहे. सन 2021-22 च्या हंगामात मे 2022 पर्यंत भारतात सुमारे 37 ते 38 लाख गाठींची निर्यात करण्यात आली होती. ही निर्यात 58 लाख गाठींवर पाेहाेचण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कापसाच्या वाढत्या किमतीचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. सन 2020-21 च्या हंगामात भारताची कापूस निर्यात 75 लाख गाठींची हाेती. ती सन 2022-23 च्या हंगामात 40 ते 42 लाख गाठींवर येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

🌎 कापसाची आयात वाढणार
केंद्र सरकारने कापसावरील 11 टक्के आयात शुल्क रद्द केल्याने सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत देशात 15 ते 16 लाख गाठी कापसाची आयात हाेऊ शकते. आयात शुल्क हटवल्यानंतर भारतीय व्यापारी आणि गिरण्यांनी 5 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. सन 2021-22 च्या हंगामात 8 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आली. सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत आणखी 8 लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सन 2021-22 मध्ये एकूण 16 लाख गाठी कापसाची आयात होईल. भारतात कापसाची सर्वाधिक आयात अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व पश्चिम आफ्रिकी देशातून केली जाते.

🌎 उत्पादन वाढण्याचा अंदाज
सन 2021-22 च्या हंगामात कापसाच्या दरात माेठी वाढ झाल्याने सन 2022-23 च्या हंगामात भारतात कापसाचे पेरणीक्षेत्र 4 ते 6 टक्क्यांनी वाढून मे 125 लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडच्या काळात साेयाबीनच्या दरात माेठी घसरण झाल्याने साेयाबीन उत्पादक शेतकरी कापसाकडे वळत आहेत. United States Department of Agriculture – National Agricultural Statistics Service ( USDA-NASS) ने भारतातील कापूस क्षेत्रात या हंगामात समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्र वगळता देशातील इतर कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची 85 ते 90 टक्के पेरणी आटाेपली आहे. हे क्षेत्र मागील हंगामाच्या तुलनेत 6 टक्क्यांनी अधिक आहे.

🌎 शेतकऱ्यांच्या पदरी निराशा?
सन 2021-22 च्या हंगामात चांगला भाव मिळाल्याने देशात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढले आहेत. कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्याने कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. चांगले उत्पादन व्हावे व चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी आणखी खर्च करणार आहेत. निसर्गाने साथ दिली तर कापसाचे उत्पादन वाढेल. मात्र, भाव कमी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती यापूर्वी उद्भवली आहे. सन 1973 मध्ये कापसाचे दर 600 रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. दुसऱ्या वर्षी सन 1974 मध्ये हेच दर किमान आधारभूत किमतीच्या खाली म्हणजे 300 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी होते. सन 2011 आणि 2012 मध्येही हाच अनुभव आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!