krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

जागतिक बाजारात भारतीय कापड उद्याेगाचे स्थान डळमळीत?

1 min read
जागतिक बाजारात भारतीय कापड उद्याेगाचे स्थान यावर्षी थाेडे डळमळीत व्हायला लागले आहे. चीन व पाकिस्तानातील बाजारात भारतीय कापडाचा वाटा कमी झाल्याचा दावाही केला जात आहे. देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढल्याने ही स्थिती उद्भवल्याचा कांगावा भारतीय कापड उद्याेजक करीत आहेत. वास्तवात, याला अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे झालेले अवमूल्यन, विविध वस्तूंच्या किमती वाढल्याने इनपुट कॉस्टमध्ये झालेली वाढ, लॉजिस्टिक दरातील वाढ व त्यातील आव्हाने, महागाईचा वाढता दबाव आणि जागतिक बाजारातील अस्थिर वातावरण यासह अन्य कारणांमुळे भारतीय कापड उद्योगाला महत्त्वपूर्ण अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय कापडावरील मार्जिन आणि मागणीवर विपरित परिणाम हाेत आहे. चीन आणि पाकिस्तान अमेरिकेतील भारतीय कापूस आयातीतील बाजारपेठेतील वाटा कमी करत आहेत, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.

🌎 भारताची घसरण, चीन व पाकिस्तान स्थिर
OTEXA डेटानुसार, यूएस काॅटन शीट आयातीतील भारताचा जागतिक कापूस बाजारातील वाटा 4QFY21 मध्ये 60 टक्क्यांवरून 4QFY22 मध्ये 50 टक्क्यांपर्यत घसरला आहे तर चीन आणि पाकिस्तानचा वाटा प्रत्येकी 5 टक्क्यांनी वाढला आहे. टेरी टॉवेल्स विभागामध्ये भारताचा वाटा 4QFY22 मध्ये 300bp ने 40 टक्के पर्यंत घसरला आहे (4QFY21 मध्ये 43 टक्के), तर चीनचा वाटा 20 टक्के व पाकिस्तानचा वाटा 23 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे.

🌎 कापसाचे दर समांतर
भारतातील कापसाचे दर वाढल्याने ते सध्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या बरोबरीत आले आहेत. या वस्तुस्थितीमुळे भारतीय कापड उद्योगासमाेर काही समस्या निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यार्न व फॅब्रिकच्या किमती एकाच वेळी वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढीव किंमतीला ताेंड देण्याचे आव्हान कापड उद्याेगांसमाेर उभे ठाकले आहे.

🌎 चलनातील घसरण
यूएस डॉलर (USD) व पाकिस्तानी रुपया (PKR)ची घसरण झाल्याने पाकिस्तानला यूएस आणि युरोपमधील बाजारपेठेतील स्थान मिळविण्यात मदत झाली. कारण खरेदीदारांना त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली किंमत मिळते. अलीकडच्या काळात यूएस डॉलर ( USD)मध्ये 6 टक्के तर पाकिस्तानी रुपया (PKR)मध्ये 21 टक्के घसरण नाेंदविण्यात आली. भारतीय रुपया ( INR) सप्टेंबर 2021 ते मे 2022 सया काळात काहीसा घसरला आहे. भारताने यूके व युराेपीयन देशांसाेबत परकीय व्यापार करारावर (Free Trade Agreement) स्वाक्षरी केल्याने जागतिक बाजारात भारतीय उत्पादने पाकिस्तानच्या बरोबरीने येतील, असे एका अहवालात म्हटले आहे.

🌎 उत्पादन घटले, वापर-मागणी-किमती वाढल्या
जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन घटल्याने तसेच वापर व मागणी वाढल्याने कापसाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या वाढलेल्या किमतीची ही पातळी टिकाऊ नाही. पुढील हंगामात कापसाचे चांगले उत्पादन झाल्याने दर सामान्य हाेतील, असेही या अहवालात असे नमूद केले आहे. मार्च 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय/भारतीय कापसाच्या किमती 54 टक्के/ 61 टक्के YoY वाढून USD 3.11/INR 237 प्रति किलोपर्यंत पोहोचल्या. पुढे एप्रिल 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय/भारतीय कापसाच्या किमती प्रत्येकी 10 टक्क्यांनी वाढून USD 3.42/INR 260 प्रति किलोवर पोहोचल्या. भारताच्या कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यात आल्यााने एप्रिल 2022 मध्ये ही वाढ 10 टक्क्यांवरून शून्यावर आली. ही स्थिती भारतीय कापड उद्योगाला काही प्रमाणात लाभ देऊ शकते, असे अहवालात नमूद केले आहे.

🌎 परकीय व्यापार करार
नजीकच्या काळात भारतीय कापड उद्याेगासमाेर काही अडचणी येणार असल्या तरी परकीय व्यापार करार (FTA) मुळे भारतीय कापड उद्याेगाच्या कापड व सूत निर्यातीच्या संधींमध्ये वाढ हाेणार आहे. ही वाढ मध्यम ते दीर्घ काळासाठी तसेच मागणीनुसार सकारात्मक राहू शकते. भारताने ऑस्ट्रेलिया आणि UAE सारख्या राष्ट्रांशी करार केले आहे. यूकेसोबतच्या कारारामुळे भारतीय कापड निर्यातीवर सकारात्मक परिणाम हाेणार आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

🌎 योग्य उपाययोजना करा
मुळात भारतातील कापसाचे उत्पादन व उत्पादकता घटत आहे आणि त्यातून कापसाचा उत्पादन खर्च वाढत आहे. देशांर्गत कापसाचे उत्पादन व उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, कापूस ते कापड या मूल्य साखळीतील कापूस उत्पादक या घटकाची क्रयशक्ती वाढविणे यासह अन्य मूलभूत बाबींवर केंद्र सरकारने वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!