krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

प्रदूषणाच्या गर्तेत गंगा, यमुना, नर्मदा….

1 min read
गेल्या 500 वर्षांचा मानवी समुहाचा प्रवास सुखाच्या ज्या भ्रामक कल्पनेवर स्वार‌ होऊन चालला आहे, त्या प्रवासाच्या भरवशावर सुख, शांती, स्थैर्य आणि आनंदाचे साम्राज्य निर्माण होऊ शकत नाही. उलट झालाच तर निसर्ग आणि मानवतेचा ऱ्हासच त्यातून होऊ शकतो. नद्यांचे ज्या पद्धतीने दोहन चालले आहे, त्याचा तर अधोगती शिवाय दुसरा परिणाम दिसत नाही. विशालकाय नद्यांची कोरडी पडलेली पात्रं चिंता आणि चिंतनाचा विषय ठरावा इतकी गंभीर परिस्थिती भारतातील नद्यांची आज झाली आहे. इतर नद्यांचे जाऊ द्या, पण ज्यांना पावित्र्य आणि पूजनाच्या दॄष्टीने फार वरचे स्थान दिले जाते, त्या गंगा, यमुना आणि नर्मदेचीही स्थिती 'गंभीर' म्हणण्याइतपत बिकट असावी?

PTI10_10_2018_000028B

हाताची नाडी संपूर्ण मानवी संरचना आणि स्वास्थ्याबाबतचा लेखाजोखा सांगून जाते. तसेच नद्यांचेही आहे. नदी तिच्या प्रभावक्षेत्रातील लोकांचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय संरचनेचा परिचय देऊन जाते. गंगा, यमुना आणि नर्मदेचीही कहाणी इतर नद्यांच्या तुलनेत वेगळी नाही. संपूर्ण हिंदीभाषी पट्टा, बंगाल आणि गुजरातची भूमी पावन करीत चालणारा या नद्यांचा प्रवास आहे. ज्ञान, वैराग्य आणि प्रेमाचा अजस्त्र प्रवाह या नद्यांच्या सोबतीने प्रवाहीत होत राहिला आहे. निदान, वर्षानुवर्षे लोकधारणा तरी तशीच आहे. संतांनीही हीच धारणा मान्य करीत पुढे प्रवाहित केली आहे. भारतीय जनमानसात गंगा ज्ञानाचे, यमुना प्रेमाचे आणि नर्मदा वैराग्याचे प्रतीक ठरली ती त्यामुळेच. पण कालांतराने ही लोकधारणा केवळ धार्मिक औपचारिकतेपुरतीच मर्यादित राहिली. नदीच्या पात्रात दिवे प्रवाहित करणे, आरती करणे या पलीकडे जाऊन या नद्यांचे अस्तित्व, पावित्र्य अबाधित राखण्यासाठीच्या प्रयत्नांची मात्र वानवाच दिसते आहे.

राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन नामक एका चळवळीतून गेल्या काही वर्षांत या तीनही नद्यांची परिक्रमा, अभ्यास, अवलोकन आदी बाबींसाठी पुढाकार घेतला जातो आहे. परिक्रमेच्या मार्गात जिथे जिथे म्हणून लोक जल, जमीन, जंगल, पशु-वॄक्ष-पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करताहेत त्यांना जमेल ती, जमेल तशी मदत करण्याचे उद्दिष्ट या चळवळीतील अग्रणींनी बाळगले आहे. असे कार्य, ते करणाऱ्या व्यक्ती-संस्थांचा परिचय इतरांना घडावा यासाठीही प्रयत्न होताहेत.

उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल मधून वाहणारी गंगा नदी जनमानसात असलेले पावित्र्य आणि पूजनीयतेच्या कसोटीवर सर्वात वरचे स्थान लाभलेली. पण तीही आज घाण आणि प्रदूषणाच्या गर्तेत सापडली आहे. अतिक्रमणाने तीला कमालीचे ग्रासले आहे. वाळू माफियांच्या प्रभावात तिचे नैसर्गिक अस्तित्व प्रभावित झाले असतानाही सरकारी यंत्रणेचे मौन अनाकलनीय ठरत आहे. यातून या नदीच्या नैसर्गिक गर्भ, पाट, घाट आणि बाट या सर्वांचीच निर्दयी वाताहत मानवाकडून घडत असल्याचे वास्तव समाजाच्या विकॄत मानसिकतेचे दर्शन घडवते. गंगेप्रतीची भक्ती, आस्था आणि श्रद्धेतून या प्रकाराबद्दल चीड, राग, संताप व्यक्त होतोय खरा, पण व्यावहारिक जगात त्याची किंमत शून्य ठरली आहे. गंगा शुद्धीकरण, स्वच्छतेच्या सरकारी उपक्रमालाही गालबोट लावणारी वॄत्ती या उपक्रमांना निष्प्रभ करण्याचे काम काही ठिकाणी करीत आहे. नाही म्हणायला, याही परिस्थितीत काही व्यक्ती, संस्था उपलब्ध साधन, संसाधनांचा वापर करून या नद्यांचे अस्तित्व, पावित्र्य कायम राखण्यासाठी धडपडत आहेत. पण दोहन करणाऱ्यांची संख्या आणि ताकद यापुढे त्यांचे कार्य प्रभावहीन ठरण्याची भीती वाटू लागली आहे.

एकीकडे श्रद्धेने आरती ओवाळायची, पूजा करायची आणि दुसरीकडे तिच्या दोहनाची, ती प्रदूषित करण्याची एकही संधी सोडायची नाही. या स्वार्थी मानवी वर्तनामुळे गंगोत्री पासून गंगासागर पर्यंतच्या प्रवासात गंगा अधिकाधिक दूषित, अपवित्र झालेली दिसते. जी स्थिती गंगेची, तीच यमुनेची. यमुनोत्री पासून सुरू होणारा तिचा प्रवास यमुना नगर, प्रयागराज, आग्रा, मथुरा करत करत फिरोजाबादच्या दिशेने पुढे सरकतो. पूज्य आणि पावित्र्याच्या कसोटीवर यमुनेचेही स्थान इतर नद्यांच्या तुलनेत वरचेच. पण आज यमुना भारतातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये वरच्या क्रमांकावर पोहोचली आहे. जिथून वाहते, ती गावं-शहरं यमुना दूषित करण्याबाबत जराही कसूर करीत नाहीत. नगर पालिकेपासून तर उद्योगांपर्यंत सारे लोक परवाना गवसल्यागत या नदीच्या पात्रात घाण, इंडस्ट्रीयल वेस्ट बिनधास्तपणे टाकत आहेत. मध्यंतरी तर या नदीच्या पाण्यावर कितीतरी किलोमीटर अंतर फेस साचला होता. नदीचे पात्र फेसाने व्यापले होते. आजुबाजूच्या उद्योगांचीच ती करामत होती. पण झाले काहीच नाही. थोडीफार आरडाओरड, पेपरबाजी, पुन्हा सारे शांत. तिच्या सुमारे 1,376 किलोमीटरच्या प्रवासात नुसते तिचे दोहन आणि दोहनच सुरू असल्याचे भीषण वास्तव यमुनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.

गंगा आणि यमुनेच्या तुलनेत नर्मदेचा प्रवास नागरी भागाच्या तुलनेत जंगल, दऱ्याखोऱ्यातून अधिक असल्याने तिचे प्रदूषण कमी असल्याचा दावा होत असला तरी शांती प्रदान करणारी, अशी मान्यता असलेल्या या नदीचे ही हाल तसेच आहेत. अमरकंटक वरून प्रवाहीत झालेला नर्मदेचा प्रवाह जवळपास 1,312 किलोमीटर अंतर पूर्ण करतो. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून जाणाऱ्या नर्मदेची श्रद्धेने परिक्रमा करणारी मंडळीही आहेच. पण, रेतीचे उत्खनन, गाव-नगर-शहरांची घाण आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारी रासायनिक पदार्थ वाहून नेणे एवढीच तिची उपयोगिता उरली आहे….या पार्श्वभूमीवर नदीच्या संदर्भातील भारतीय संस्कृतीत असलेली श्रद्धा, नद्यांच्या नैसर्गिक संपदेची समाजातील धर्जीण्यांनी चालवलेली लूट, या लुटीविरुद सर्वसामान्य जनतेचा संघर्ष आणि शेवटी दमनचक्रापुढे निष्प्रभ ठरत चालल्यामुळे संघर्ष करणाऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा…. असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. वॄन्दावनमध्ये यमुना मिशनच्या कार्यकर्त्यांनी चालवलेले कार्य आणि आंदोलन उल्लेखनीय म्हणावे असे असले तरी इतर भागात, इतर नद्यांच्या बाबतीत अशा कामाची गरज आहे. शहरातून निघणारा कचरा नदीत न टाकता त्यावर झाडे लावण्याचा त्यांचा उपक्रम, पुढे प्रयागराज पर्यंत यमुनेच्या दोन्ही काठांवर झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प, अनुकरणीय ठरतो आहे. इतर लोक तो स्वीकारतात किती अन् अंमलात किती आणतात, यावर भविष्य अवलंबून आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!