वटवृक्ष : मानवी जीवनातील आधारवड
1 min read🌳 पार्श्वभूमी
वड हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हेे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसले म्हणुन ‘बेंगालेन्सिस’ तर बंगालीत ‘बनीया’ म्हणतात. म्हणूनच ‘बन्यान ट्री’ असे इंग्रजीत नाव आहे.
🌳 वड म्हणजे काय?
वड म्हणजे काय तर भव्यता, दिव्यता, अक्षयता, अमरता, वड म्हणजे एक निसर्गाने दिलेले वरदान. वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी, फळ, यातून नवीन वृक्षाची निर्मिती होत असते. वड हा अनंत काळापर्यंत वाढत राहणारा वृक्ष आहे. त्याची वाढ कधीही थांबत नाही. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत येतात आणि परत तेच एक नवीन खोड बनते आणि बनतो एक नवीन वृक्ष. यामुळे या झाडाला मरण नसते. याची पाने मोठी आणि जाड असतात, याला उन्हाळ्यात फळे लागतात, यावेळी पक्ष्यांना दुसरीकडे खायला काही नसते, त्यावेळी पक्षी या झाडावर येऊन फळे खातात. परिणामी, पक्ष्यांचे खूप आवडते झाड आहे हे.
🌳 आयुर्वेदातील महत्त्व
आयुर्वेदामध्ये तर या झाडाला कल्पवृक्ष म्हटलेले आहे, कारण मनुष्य, जनावरे, पक्षी, शेतीमधील पिके यावरील अनेक रोगावर या झाडापासून गुणकारी औषधे बनतात. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो. वीर्य वाढविणे, गर्भाशय शुद्धी, मधुमेह, जखम भरून येणे, सांधेदुखी, त्वच्यारोग, दातदुखी, ताप, खोकला या आणि इतर अनेक रोगावर गुणकारी असे हे झाड आहे. वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढते.
🌳 धार्मिक महत्त्व
भारतीय धार्मिक परंपरेमध्ये तर वडाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. या झाडाला भगवान महादेव यांचे स्वरूप मानले जाते. वडसावित्री पौर्णिमेला महिला या झाडाची पूजा करून आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य, निरोगी जीवनासाठी प्रार्थना करतात, संत ज्ञानेश्वर यांच्या मातोश्री यांनी 12 वर्ष या झाडाची पूजा केल्याचा उल्लेख आहे. वडाच्या झाडाचे मानवी जीवनातील महत्त्व जाणून या झाडाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या धार्मिक परंपरामध्ये तसेच आयुर्वेदात या झाडाचे महत्त्व दाखवून व पटवून दिले आहे. अनंत काळापर्यंत या झाडाचे संवर्धन येणाऱ्या सर्व पिढ्यानी करावे, असा संदेश आपल्याला दिला आहे.
🌳 कृष्णवट
‘कृष्णवट’ नावाचा एक वडाचा एक प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेले असता, गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रहाने लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला. गोपी, सवंगडी आणि श्रीगोपाल एक झाले. हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी दुमडून त्याचे द्रोण तयार केले. तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशीच पाने येऊ लागली. अशी आख्यायिका आहे, म्हणून अशा वटवृक्षाला ‘कृष्णवट’ नाव पडले.
🌳 देशातील विस्तीर्ण वड
भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिचोली (ता. पांढुर्णा) येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कोलकाता येथील शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून, त्यांच्या छायेत 4 ते 5 हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय 350 वर्षापेक्षा अधिक आहे. चेन्नई येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. पातूरजवळ असलेल्या अंबाशी गावात असलेला वटवृक्षही सुमारे दीड एकर परिसरात पसरलेला आहे.
🌳 बेसूमार वृक्षतोड आणि अंधश्रद्धा
आधुनिक काळात या झाडाची बेसूमार कत्तल करण्यात आली. मिथ्या आणि क्षणभंगूर विकासाची जनतेला स्वप्ने दाखवून राज्याकर्त्यांनी या झाडाची मोठ्या प्रमाणात तोड केली. काही व्यापारी लोकांनी तर या झाडाच्या भोवताली वेगवेगळ्या अंधश्रद्धा निर्माण केल्या आणि अडाणी जनता याला बळी पडली. वड म्हणजे राक्षस, वड म्हणजे अपशकून, वड म्हणजे भीती यासारख्या अफवा समाजात पसरविण्यात आल्या. त्यामुळे लोकांनी त्यांच्या शेतातील आणि अंगणातील हजारो झाडे तोडली. आज जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की परत वड लावा. पण कोणीही आपल्या जमिनीत आणि अंगणात हे झाड लावण्यास तयार होत नाही, यावरून आजही या अंधश्रद्धा किती प्रबळ आहेत, हे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत.
🌳 अभिप्राय
रवळगावमध्ये आम्ही नागर फाउंडेशनच्या माध्यमातून वडाची झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी लावलेली 25 झाडे यशस्वी केली आहेत. यावर्षी आम्ही 40 वड लावली आहेत. ही सर्व झाडें यशस्वीपणे वाढत आहेत. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आम्ही प्रभावी जनजागृती करत आहोत. त्यासाठी आम्ही स्वतः आधी त्या अंधश्रद्धा आमच्या कृतीमधून मोडून काढत आहोत. मी सर्व तरुण व तरुणींना आवाहन करतो की, झुगारून द्या सर्व अंधश्रद्धा आणि अफवा, करा सुरुवात या झाडाचे संवर्धन करायला. घरोघरी, दारोदारी, प्रत्येक अंगणात लावा वडाचे झाड आणि घेऊ द्या आनंद आपल्या मुलांना त्या गोड लहानपणाचा. वडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मनुष्य जीवनाला तो एक आधारवड आहे. वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.