krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

बहुगुणी ‘गोंदन’ वृक्षाच्या संवर्धनाचा ध्यास!

1 min read
गोंदन हे झाड फार पूर्वीपासून आपल्याकडे आढळते. पूर्वी रवळगाव, ता. कर्जत, जिल्हा. अहमदनगर परीसर 'गोंदनखुरी' नावाने ओळखला जायचा. कारण, या परिसरात हजारो गोंदन वृक्ष होते. अलीकडच्या काळात या वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्यामुळे आज हा वृक्ष गावातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आज गावात फक्त गोंदनखुरी हे नाव केवळ नावालाच राहिले आहे. तेथे एकही गोंदन वृक्ष पाहायला मिळत नाही. त्यामुळे नागर फाउंडेशनने या झाडाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.

🌳 कुठे आढळते?
गोंदन ही वनस्पती साधारणतः भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व जपान या देशात आढळते. भारतात ही वनस्पती कोरड्या, पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्‍चिम घाट, सातपुडा, कोकण व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी गोंदन वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले दिसतात. काही ठिकाणी या वृक्षाची लागवडही केली जात आहे.

🌳 झाडाची रचना
गोंदन हा वृक्ष 10 ते 12 मीटर उंच वाढतो. त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी 30 ते 40 वर्षे लागतात. पूर्ण वाढलेल्या गोंदन झाडाच्या खोडाचा घेर सुमारे अर्धा मीटर असतो. साल गर्द पिंगट व भेगाळलेली असते. पाने साधी, एका समोर एक, जाडसर व निमूळती असतात. पानाच्या तळातून 3 ते 5 शिरा निघतात. कोवळी पाने केसाळ असतात. या झाडाला मार्च-एप्रिलमध्ये फुले येतात. त्याची फुले लहान, पांढरी व सुवासिक असतात. नर आणि मादी फुले एकाच वृक्षावर येतात. फळे छोटी, फिकट नारिंगी, तपकिरी, चकचकीत आणि एकबीजी असतात. पिकलेली फळे चवीला गोड असून, ती चिकट रसाने भरलेली असतात.

🌳 जैवविविधता
कोकिळा, साळुंकी, दयाळ, ब्राम्हणी मैना, जंगली मैना, पोपट, लालबुड्या बुलबुल, कोतवाल, चिमण्या आदि पक्ष्यांचा गोंदन हा आवडता वृक्ष आहे. गोंदन वृक्षावर लहान-लहान कीटकही पोसले जातात. या कीटकांना खाण्यासाठी काही पक्षी येतात. पावसाळ्याच्या प्रारंभी गोंदन फळे पिकल्यानंतर झाडांवरील पक्ष्यांची संख्या अधिकच वाढते.

🌳 आयुर्वेदिक महत्त्व
गोंदनाचे फळ शक्तीवर्धक आणि बलवर्धक असते. गोंदन फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी गोंदन फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही गोंदन फळ उपयोगी आहे. फळे शोथशामक असल्याने खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग यामध्ये यांचा मोठया प्रमानावर वापर होतो.

🌳 अभिप्राय
नागर फाउंडेशनने या झाडाचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतलेला आहे. जर या झाडाचे रोपे किंवा बिया कोठे असतील तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!