krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावर शासनाच्या पुरस्काराची मोहर

1 min read
महादेववाडी ता. देवणी, जिल्हा लातूर येथील श्री ओमकार माणिकराव मसकल्ले हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे सात हेक्टर क्षेत्र एवढी जमीन आहे. त्यापैकी दोन हेक्‍टर क्षेत्र सेंद्रिय प्रमाणीकरण (NPOP - The National Programme for Organic Production) या संस्थेकडे नोंद केली आहे. त्यात ते सेंद्रिय शेती करतात.

🟢 पूर्वपीठिका
प्रथम जमिनीची बांधबंदिस्ती करून घेतली. त्यानंतर त्यांनी विहीर पुनर्भरण करून घेतली आहे. शेतात गाळ टाकून त्यांनी बायोडायनॅमिक बरोबर नडेपखत, गांडूळ खत, बायोगॅस, शेण स्लरीचा त्यांनी पुरेपूर वापर केला आहे. जीवामृत, आझॉटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्मा या बरोबरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी नवीन बुरशीनाशक तयार केले आहे, त्याचा ते वापर करून त्यापासून ते बायोमिक्स तयार करतात. ते शेतकऱ्यांना वरदानच ठरले आहे. या बायोमिक्समुळे जमिनीत वाढलेल्या हानिकारक बुरशीवर नियंत्रण आणता येते तसेच सेंद्रिय कर्ब वाढून जमीन भुसभुशीत होते व पीक उत्पादनासाठी तसेच रोग व किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा व आंतरपीक पद्धतीचा वापर आणि पिकांची दरवर्षी फेरपालट करतात. त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.

🟢 पीक पेरणीचे नियोजन
पेरणी करते वेळेसच एकरी 100 किलो गांडूळखत आणि 3 किलो ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक मिक्स करून पेरत असल्याने पिकांवरील मररोगावर नियंत्रण करणे त्यांना सोपे होते. सोयाबीन पिकात तूर हे अंतरपीक 6:1 या प्रमाणात पेरणी केल्यामुळे तूर या पीकात सापळा पीक म्हणून मका 100 ग्रॅम मिसळुन पेरणी करून या पिकासाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते किंवा औषधे न वापरता फक्त आणि फक्त त्यांच्या शेतीच्या बांधावर वनस्पतीजन्य औषधच वापरून व घरच्या घरीच तयार केलेले गांडूळ खत, नाडेप याबरोबरच जैविक खताचा वापर केल्याने या वर्षीच्या हंगामात (सन 2021) सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी 18 क्विंटल मिळाले आहे व तुरी चे उत्पादन हे 9 क्विंटल.

🟢 संकरीत ऐवजी सरळवाणाची निवड
पिकाच्या संकरीत वाणाऐवजी सरळ वाणाचा वापर, जीवाणू संवर्धन प्रक्रिया, सरी पद्धत, BBF पद्धत, सापळा पिके, जैविक पीक संरक्षण, अच्छादन, वनस्पतीजन्य औषधांचा वापर. सेंद्रिय शेती पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व दिल्यामुळे विषमुक्त शेती आणि शेत माल उत्पादित करणे शक्य झाले. विषमुक्त शेती आजच्या काळाची गरज आहे, हे ओळखणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

🟢 शेतातील संसाधने
ओमकार मसकल्ले यांच्या शेतात एक बोअर, एक विहीर असून, एक सामूहिक शेततळे आहे. याचा वापर फळपिके भाजीपाला गहू, तूर, हरभरा अशी विविध पिके तुषार सिंचनाद्वारे घेतात. शेतीस पूरक जोडधंदा म्हणून पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय करतात. नैसर्गिक रेतनासाठी वळू व रेडा ठेवलेला आहे. स्थानिक वर्तमानपत्रातून सेंद्रिय शेतीची लेख, प्रचार व प्रसिद्धी आणि शेतकरी शेतीशाळामध्ये मार्गदर्शनही ते करतात. जेणेकरून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी मदत होत आहे. या कार्यासाठीच त्यांना सेंद्रिय शेतीविषयक कामाबद्दल शासनाकडून ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार दिला आहे.

🟢 मिश्र पिकांची लागवड पद्धत
ओमकार मसकल्ले म्हणतात, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व मिश्र पिकांची यशस्वी लागवड पूर्वी मिश्र पीक पद्धतीने करण्यात येत होती. सोयाबीनमध्ये तुरीच्या ओळी ज्वारीमध्ये मूग, उडीद तर तुरीच्या ओळींमध्ये इत्यादी लागवड करण्यात येत असल्यामुळे उत्पादन चांगली येत होती. 25-30 वर्षापासून संकरित बियाणे झाल्यापासून पिकांची पद्धती बदलली. त्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, तूर, ज्वारी सातत्याने घेतल्याने उत्पादनात घट येऊ लागली. परिणामी, रासायनिक खते आणि विषारी कीडनाशकांचा वापर अधिक प्रमाणात वाढला. कारण संकरीत जातीचे बियाणे काही नवीन रोग व किडी घेऊन आली. जरी सुरुवातीला उत्पादनात वाढ दिसली तरी कालांतराने रासायनिक शेतीचे दुष्परिणाम समोर आले. जमिनी नापीक झाल्या. पाणी व हवा प्रदूषित झाली.

🟢 मुख्य पिकात आंतरपिके
ओमकार मरसकल्ले त्यांचे अनुभव कथन करताना म्हणाले, मुख्य पिकात आंतरपिके घेतली तरी पण मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येत नाही आणि सलग पीक पद्धतीचे तोटे कमीत कमी करता येतात. मी बियाणे स्वतः माझ्या शेतावर दरवर्षी सोयाबीन पिकांची मळणी कमी RPM वर ठेवून मळणी करत असल्याने बियाण्याची उगवण क्षमता चांगली येते आणि इतर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे म्हणुन वापरण्यास खात्रीपूर्वक देतो. सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करताना मी स्वतः माझ्या शेतावर जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, वर्मी वाश, गोमूत्र त्याचा वापर एकात्मिक कीड निवारणासाठी वापर करतो.

🟢 उपयोगी सापळा पिके
✳️ झेंडू – झेंडू मावा व इतर किडींना पिकापासून दूर हाकलतो व सुत्रकृमीचे नियंत्रण करतो तसेच मधमाशांना व मित्र किडींना मोठ्या प्रमाणात आकर्षित करून परागीभवनाचे क्रिया वाढवतो.
✳️ तूर – तुरीचे पीक किडींचे व परजीवी कीटक आवडते निवासस्थान आहे.

🟢 शेतकरी, अधिकारी व मान्यवरांच्या भेटी
माझ्या सभोवतालच्या कृषी विद्यापीठे कृषी विषयक संस्था कृषी प्रदर्शने व शेतकरी मेळावे यांना भेटी देऊन त्यांच्या शिफारशीनुसार काम करीत आहे. पिकासाठी तुषार सिंचनाचा वापर करत आहे तसेच गोबरगॅस, निर्धूर चूल, सौर ऊर्जेचा वापर करत आहे. पंचक्रोशीतील शेतकरी सेंद्रिय शेती पशुपालन व मत्स्यपालन याबाबतची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आमच्या सेंद्रिय शेतीस भेट देण्यासाठी अनेक नामवंत येत असतात. माझ्या सेंद्रिय शेती उपक्रमास विभागीय कृषी सहसंचालक श्री. जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक लातूर श्री. दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी श्री. घनबहादूर, मंडळ कृषी अधिकारी श्री. पाटील, बी. एम. जाधव, आत्माचे तालुका तंत्रव्यवस्थापक श्री. राहुल जाधव यांनी भेटी दिल्या आहेत.

3 thoughts on “सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावर शासनाच्या पुरस्काराची मोहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!