Southwest monsoon : नैऋत्य मान्सून परतला, पावसाची शक्यता
1 min read
Southwest monsoon : देशात 24 मे 2025 ला दाखल झालेला नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) देशभर 146 दिवस कार्यरत राहून त्याच्या सरासरी निर्गमन तारखेच्या एक दिवस उशिरा म्हणजे गुरुवार (दि. 16 ऑक्टोबर) ला देशातून बाहेर पडला आहे. असे असले तरी देशातील काही राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, महाराष्ट्रातील काही भागात चार दिवस पावसाची शक्यता (Rain forecast) निर्माण झाली आहे.
🔆 ईशान्य मान्सूनचे आगमन
नैऋत्य मान्सून देशातून जाताच ईशान्य मान्सूनने (Northeast monsoon) गुरुवारी (दि. 16 ऑक्टोबर) देशातील दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, माही पॉंडिचेरी, करायकल, सीमांध्र, रायलसीमा व दक्षिण कर्नाटक या राज्य व भागात आपले आगमन प्रस्थापित केले आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात तामिळनाडू व लगतच्या परिसरात या मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
🔆 महाराष्ट्रातील पाऊस
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यात पावसाच्या चौथ्या आवर्तनातून शनिवार (दि. 18 ऑक्टोबर) ते बुधवार (दि. 22 ऑक्टोबर)पर्यंत तुरळक ठिकाणी रब्बी हंगामाला लाभदायक ठरेल, अशा किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही गुरुवारी (दि. 16 ऑक्टोबर) मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.
🔆 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यातील पाऊस
शनिवार (दि. 25 ऑक्टोबर) दरम्यान आग्नेय बंगाल उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती व त्याचे पश्चिमेकडील मार्गक्रमणातून संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव व लातूर या जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते.