krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cough syrup & Child deaths : खोकल्याच्या औषधाने झालेले बालमृत्यू…, पालकांनी काय काळजी घ्यावी

1 min read

Cough syrup & Child deaths : खोकल्याच्या औषधाने (Cough syrup) बुधवार (दि. 15 ऑक्टाेबर)पर्यंत नागपूर शहरातील विविध हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मध्य प्रदेशातील 18 बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू (Child deaths) झाला असून, आठ मुलांना उपचार सुरू आहेत. ती मुले अत्यवस्थ असून, जीवन प्रणालीवर (व्हेंटिलेटर – Ventilator, डायलिसिस – Dialysis इत्यादी) उपचार घेत आहे. मागील एक महिन्यांमध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी खोकल्याचे औषध घेतल्याने लहान मुलांचा किडनी (Kidney) निकामी होऊन मृत्यू झाला. यातली बहुतांश मुले पाच वर्षांपेक्षा लहान आहेत.

खोकल्याच्या औषधांमध्ये असणारे डायइथिल ग्लायकॉल (DEG – Diethyl glycol) या घटकामुळे विष होऊन मुलांच्या किडनी निकामी झाल्या. या घटकाचे प्रमाण खोकल्याच्या औषधामध्ये 0.1 टक्के असायला पाहिजे. परंतु ते 1.6 टक्के एवढे जास्त सापडले. त्यामुळे ह्या मुलांना विषबाधा झाली आणि मुलांचा मृत्यू झाला. ज्या कंपनीचे हे औषध आहे, त्याच कंपनीच्या औषधांच्या 60 बाटल्या चंद्रपूर व गोंदियात तर नागपुरात 600 बॉटल आतापर्यंत सापडलेल्या आहेत. त्यामुळे हा धोका आता आपल्या गावापर्यंत आला, असे समजायला हरकत नाही.

केंद्र आणि राज्य शासन त्यांचे काम करेलच, परंतु पालक म्हणून आपण काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र आणि राज्याची औषधावर नियंत्रण करणारी यंत्रणा आहे. कोणतेही औषध बाजारामध्ये येण्याच्या आधी या सर्व यंत्राणांकडून तपासूनच शेवटी उपलब्ध होत असते. परंतु या ठिकाणी काय चूक झाली हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 (Drug and Cosmetic Act 1940) नुसार या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन योग्य तपास झाला तर सत्य बाहेर येईल. परंतु त्याने मृत्यू पावलेली दोन ते सोळा वर्षे वयाची ही मुले परत येणार नाहीत. या देशांमध्ये औषध नियमन व्यवस्था अस्तित्वात आहे. परंतु ती योग्य काम करत नसावी, असे या प्रकरणावरून एकंदरीत दिसते. त्यामुळे पालक म्हणून आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

📍 पालक म्हणून काय करावे?
🔆 ज्या औषधाने हे मृत्यू झालेत त्याचे नाव आहे कोल्ड्रिफ (Cold rif). Cold rif याशिवाय आणखी दोन औषधांमध्ये इथीनील ग्लोयकाल (Ethylene glycol) या घटकाचे प्रमाण जास्त आढळलेले आहे, त्याचे नाव आहे Respifresh TR आणि Relife. त्यामुळे या औषधाची एखादी बॉटल आपल्या घरी तर नाही ना हे तपासून घ्या.

🔆 लहान मुलांची औषधे स्वतःच्या मनाने मेडिकलमधून आणणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लहान मुलांना औषधी द्यावी. मेडिकलमधून औषधे आणल्यानंतर ती औषधे तपासून घ्यावे. हे काम थोडे कठीण आहे, परंतु गुगलच्या सहाय्याने ते सहज शक्य होईल. त्यामुळे पुन्हा एकदा जनरिक मेडिसिन (Generic medicine) घ्यावं की कंपनीचे मेडिसिन घ्यावं, हा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु निदान लहान मुलांच्या बाबतीमध्ये तरी जनरिक औषधे टाळावी.

🔆 घरी दोन लहान मुले असतात आणि त्यांच्यामध्ये पाच सहा वर्षाचा फरक असेल तर आपण मोठ्या मुलांची औषधे थोडासा डोस कमी करून लहान मुलांना देतो, हे योग्य नाही. कारण औषध आणि विष याच्यामध्ये फक्त डोस किंवा मात्रा याचा फरक असतो. विष हे कमी प्रमाणात औषधासारखे काम करू शकते आणि औषध हे मोठ्या प्रमाणात जर दिले तर विषासारखे काम करू शकते. त्यामुळे आपल्या घरी असणाऱ्या मोठ्या मुलाची औषधं लहान मुलांना चालतीलच असे नाही.

🔆 कधीकधी औषधाचा वापर झाल्यानंतर ती तशीच कपाटात ठेवलेली असतात आणि काही दिवसांनी पुन्हा मुलांना त्रास होतो, तेव्हा आपण जुनी औषधीच देऊन टाकतो, हे शक्यतो टाळले पाहिजे. कारण एकदा उघडलेले, तयार केलेले औषध हे खूप दिवस चालत नाही. ते औषध देताना त्याची एक्सपायरी तारीख सुद्धा तपासली पाहिजे.

🔆 लहान मुलांना वारंवार खोकला होतो. त्यामुळे एकदा औषध दिल्यावर मुले दुरुस्त होतात. पुन्हा ती शाळेत जातात इतर मुलांच्या संपर्कात येतात आणि पुन्हा त्यांना सर्दी खोकला होतो. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. यावर एक उपाय करता येतो, दरवर्षी या मुलांना सर्दी खोकल्याची इन्फ्लुंजा लस (Influenza vaccine) देता येते. तुमच्या बालरोग तज्ज्ञाकडे ही दरवर्षी लस देता येईल. याने सर्दी खोकला पूर्णपणे जाणार नाही, परंतु त्याची वारंवारता कमी होईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!