25 मे ते 8 जून या काळात हवामान कसं असेल?
1 min read🌧️ ग्रहांचे नक्षत्र भ्रमण व त्यांच्या गतीवर आधारित पर्जन्ययोग
डॉ मुकुंद मोहोळकर, नागपूर यांनी ग्रहांचे नक्षत्र भ्रमण व त्यांच्या गतीवर आधारित पर्जन्ययोग अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, सूर्याने 25 मेला दुपारी 2 वाजून 52 मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्यावेळेस त्याचा मित्र ग्रह बुध वक्र गतीने राहु बरोबर युतीयोग करत आहे. शुक्र हा अश्विनी नक्षत्रातुन भ्रमण करत असून, गुरु, मंगळाची युती उत्तरा भाद्रपद नक्षत्रात होत आहे. शनी धनिष्ठा नक्षत्रात व केतु विशाखा नक्षत्र आहे. एकदरीत ग्रहस्थितीप्रमाणे देशाच्या पश्चिमेकडून वारे वाहतील. राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यात काही ठिकाणी 27 ते 31 मे दरम्यान मान्सून पूर्व जोरदार वारे वाहतील व मेघ गर्जनेसह त्या राज्यात वादळी पाऊस पडेल. याचा परिणाम विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी 30 मे ते 1 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा व अकोला जिल्ह्यात पूर्व मान्सून पावसाची शक्यता आहे. 31 मे व 1 जून दरम्यान पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ व आसपासच्या जिल्ह्यात मेघ गर्जनसह पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात 4 जून ते 6 जून दरम्यान पूर्व मान्सूनच्या सरी येतील, नऊ तपाचे ऊन यावेळेस जास्त जाणवणार नाही. हा हवामान अंदाज ग्रहांच्या भ्रमण गतीवर इतर ग्रहांबरोबर होणारे अंशात्मक योग (tropical speed and degree conjunction with other planets and constellation stars) यावर आधारित आहे, असेही डॉ. मुकुंद मोहोळकर सांगतात.
🌧️ पंजाब डख
हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या मते,
💠 पाऊस 30, 31 मे तसेच 1, 2, 3 व 4 जून रोजी राज्यात ठिकठिकाणी हजेरी लावेल.
💠 25 मे ते 27 मे दरम्यान पूर्व विदर्भ, मराठवाडा, मुंबई व कोकणपट्टी तुरळक ठिकाणी पाउस पडेल. पावसाळा सुरु होण्यासाठी 12 दिवस राहिले.
💠 राज्यात 30, 31 मे व 1, 2,3,4, जून दरम्यान मान्सून पूर्व जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाउस मुंबई, कोकणपट्टी, नाशिक, इगतपुरी, सातारा, सांगली कोल्हापूर, पूणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बिड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर, अकोला जिल्ह्यासह राज्याती काही ठिकाणी पडणार आहे.
🌧️ भारतीय हवामान विभाग
भारतीय हवामान विभागाच्या मते, नैऋत्य मोसमी वारे अंदमानमध्ये सर्वसाधारण कालावधीच्या तुलनेत सहा दिवस आधी दाखल झाले असून, सध्या नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास मंदावला आहे. मोसमी वाऱ्यांची आगेकूच दोन दिवसांपासून ठप्प आहे. अंदमान, निकोबार बेटांसह पूर्वोत्तर राज्यात सध्या जोरदार पाऊस होत असून, उत्तरेकडील राज्यातही पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. अंदमानात 16 मे रोजी दाखल झालेले मोसमी वारे बंगालच्या उपसागरात एक दिवसाआड प्रगती करीत होते. ते बंगालच्या उपसागरात
17 आणि 19 मे रोजी जागेवरच होते. 16 ते 19 मे या कालावधीत अरबी समुद्राच्या बाजूने त्यांची प्रगती नव्हती. 20 मे रोजी मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला आणि त्याच दिवशी बंगालच्या उपसागरातही प्रगती केली. त्यामुळे अरबी समुद्रात त्यांची झपाटय़ाने प्रगती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, 21 आणि 22 मे रोजी मोसमी वाऱ्यांची आगेकूच झाली नाही. मोसमी वारे केरळमध्ये 27 मे तर महाराष्ट्रात 5 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला होता.
🌧️ प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार, 24, 25, 26, 27 आणि 28 मे 2022 दरम्यान आकाश आंशिक ढगाळ राहण्याची व काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व वादळी वारे (वाऱ्याचा वेग 35 ते 40 किमी प्रती तास) वाहण्याची अधिक शक्यता आहे. 25 व 26 मे 2022 रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि 27 मे 2022 रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमान अनुक्रमे 39.0 ते 42.0 आणि 25.0 ते 27.0 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तसेच सरासरी वाऱ्याचा वेग 12 ते 19 किमी प्रती तास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विस्तारित स्वरूपाच्या अंदाज प्रणालीनुसार विदर्भ उपविभागामध्ये 29 मे ते 4 जून 2022 दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि कमाल तापमान मध्यमतः सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
साभार :-
©️ डॉ. मुकुंद मोहोळकर, नागपूर (संपर्क :-9823116709)
©️ पंजाब डख, हवामान अभ्यासक.
©️ भारतीय हवामान विभाग.
©️ जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संस्धोधन संस्था, नागपूर.