कापसाचे चढे दर आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय कापड उद्याेगाच्या गटांगळ्या
1 min read🌎 कापसाच्या दरात अमुलाग्र वाढ
कापसाच्या शंकर-6 व शंकर-10 या लांब धाग्याच्या (Long staples) वाणाच्या दरात मागील हंगामाच्या तुलनेत गेल्या वर्षभरात 113.7 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शंकर-6 व शंकर-10 वाणाचे उत्पादन मुख्यतः गुजरातमध्ये घेतले जाते. याच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कापड उद्योजक कापसावर निर्यातबंदी (Export ban) घालण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करीत आहेत. कापसाच्या दरातील वाढ ही भारतातच आहे, असेही नाही. चीनमध्ये कापसाच्या दरात 37.5 टक्क्यांनी वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 70 ते 75 टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक दरवाढीच्या तुलनेत भारतीय बाजारातील कापसाची दरवाढ अधिक असून, या दरवाढीमुळे कापड उद्याेगांचे नुकसान हाेत असल्याचा युक्तीवादही कापड उद्याेजकांनी केंद्रीय वस्राेद्याेग मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अनेकदा केला आहे.
🌎 चायना काॅटन इंडेक्स
चायना कॉटन इंडेक्स (China Cotton Index) CNY 22,289 युआन (1 युआन म्हणजे 11.66 रुपये) प्रति टन वर स्थिरावला आहे. जो वर्षभरापूर्वी CNY 16,202 युआन प्रति टन नोंदवला गेला होता. गेल्या वर्षभरात चिनी कापसाचे दर 37.5 टक्क्यांनी वाढले आहेत. भारतीय रुपयाच्या तुलनेत चिनी युआन मजबुत असल्याने ही दरवाढ भारतीय कापड उद्याेजकांना कमी वाटत आहे.
🌎 कॉटलूक इंडेक्स
कॉटलूक इंडेक्स (Cotlook Index) 13 मे 2022 रोजी 162.20 यूएस सेंट प्रति पाउंड नोंदवला गेला तर 20 मे 2022 राेजी 166.20 यूएस सेंट प्रति पाउंड नोंदविण्यात आला. वर्षभरापूर्वी हा दर 92.90 यूएस सेंट प्रति पाउंड एवढा हाेता. या कालावधीत हा दर 75.3 टक्क्यांनी वाढला आहे. 13 मे 2022 राेजी
ICE कॉटन जुलै फ्युचर्स 145.20 यूएस सेंट प्रति पाउंड नोंदविले गेले होते. वर्षभरापूर्वी हे दर 84.98 यूएस सेंट प्रति पाउंड होते. त्यामुळे यात 70.80 टक्के वाढ नोंदविली गेली.
🌎 भारतीय रुपयाचे अवमूल्यन
या तुलनेत, गुजरातमधील शंकर-6 व शंकर-10 कापसाची किंमत 13 मे 2022 रोजी 99,500 रुपये प्रति खंडी (356 किलो) तर 20 मे 2022 राेजी 98,800 रुपये प्रति खंडी हाेते. वर्षभरापूर्वी याच काळात हे दर 46,550 रुपये प्रति खंडी होते. त्यामुळे शंकर-6 कापूस 113.7 टक्क्यांनी महागला आहे. भारतीय रुपयाचे अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत सतत हाेत असलेल्या अवमूल्यनामुळे भारतीय बाजारात कापसाचे दर वाढले असल्याचे दिसून येत आहेत. जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय कापूस सध्या कापूस महाग झाला आहे. सध्या चिनी कापसाची किंमत 89,960 रुपये प्रति खंडी (सध्याच्या विनिमय दरानुसार – 1 युआन म्हणजे 11.66 रुपये) आहे. कॉटलूक इंडेक्सनुसार हे दर 98,631 रुपये प्रति खंडी आणि ICE कॉटननुसार 88,293 रुपये प्रति खंडी आहेत. गुजरातमधील शंकर-6 कापूस 13 मे 2022 रोजी 99,500 रुपये प्रति खंडी दराने विकला गेला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मुक्त घसरणीमुळे भारतीय चलनाच्या दृष्टीने जागतिक कापसाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. भारतीय कापसाच्या दराची तुलना अमेरिकन डॉलरमध्ये (American Dollar) केल्यास भारतीय कापसाची निर्यात (Cotton export) स्वस्त असून, भारतीय कापड उद्योगांना कापूस आयात (Cotton import) करावयाचा झाल्यास तो महागात खरेदी करावा लागणार आहे.
🌎 केंद्र सरकारवर दबाव
देशांतर्गत कापूस बाजारातील तेजी कायम आहे. शंकर-6 कापूस 12 मे 2022 रोजी 98,000 रुपये प्रति खंडी दराने विकला गेला. हे दर एक लाख रुपये प्रति खंडीच्या वर जात आहेत. अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाने (Extra long staples Cotton) एक लाख रुपये प्रति खंडी दराचा पल्ला नोव्हेंबर 2021 मध्येच पार केला. मागील वर्षी याच काळात हे दर 47,404 रुपये प्रति खंडी हाेते. त्यामुळे शंकर-6 वाणाच्या कापसाच्या किमती 107 टक्क्यांनी वाढल्या आहेत. उत्तर भारतात लांब धाग्याच्या J-34 RG वाणाच्या कापसाचे उत्पादन घेतले जाते. या वाणाच्या कापसाची विक्री 102,448 रुपये प्रति खंडी दराने होत आहे. वर्षभरापूर्वी या वाणाच्या कापसाचे दर 44,769 रुपये प्रति खंडी हाेते. त्यामुळे या वाणाच्या कापसाच्या दरात 129 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, देशांतर्गत कापसाच्या वाढलेल्या किमती विचारात घेता, त्या कमी करणे शक्य नसल्याने भारतीय वस्त्रोद्योग केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. ICE कॉटन आणि कॉटलूक निर्देशांकात ही दरवाढ 70 ते 75 टक्क्यांची असल्याचे दर्शवते. चीनमधील शिनजियांग प्रांतातील कापूस आणि त्याच्या उत्पादनांवर अमेरिकेने बंदी घातल्याने चिनी कापसाच्या किमती केवळ 37.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या प्रदेशात उत्पादित होणारा कापूस चीनच्या देशांतर्गत बाजारपेठेत तसेच अमेरिका वगळता परदेशातील बाजारपेठांमध्ये वापरला जातो. त्यामुळे चिनी कापसाच्या किमती काही प्रमाणात नियंत्रणात आल्या आहेत. तिरुपूर एक्सपोर्टर्स असोसिएशन (TEA)चे अध्यक्ष राजा एम. षणमुगम यांनी कापूस निर्यातीमुळे आमच्या स्पर्धकांना फायदा होत असल्याचे सांगितले.
🌎 मानसिकता बदलविणे अत्यावश्यक
भारतीय कापूस चीन, बांगलादेश, व्हिएतनाम आणि इतर शेजारी देशांमध्ये निर्यात केला जाताे. देशांतर्गत कापसाचे उत्पादन व पुरवठा कमी झाल्याने तसेच वापर व मागणी वाढल्याने कापसाच्या किमतीत वाढ हाेणे स्वाभाविक आहे. भारतीय कापड उद्योजकांची चढ्या दराने कापूस खरेदी करण्याची तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या निकषांप्रमाणे कापड उत्पादन करण्याची मानसिकता नसल्याने त्यांना जागतिक कापड बाजारात गटांगळ्या खाणे क्रमप्राप्त आहे. भारतीय कापड उद्योजकांना त्यांचे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थान टिकवून ठेवत ते आणखी मजबूत करण्यासाठी कमी दरात कापूस मिळवून अधिक दरात कापड विकण्याची व दुहेरी नफा कमावण्याची मानसिकता बदलावी लागणार आहे. शिवाय, भारतातील कापसाची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना तातडीने करायला हव्यात.