krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

एका संजीवनी (गूढ) बेटावरचा एक दिवस …!!

1 min read
तुम्हाला कोणी विचारलं, मेडशिंगी वृक्ष माहिती आहे काय? पांढरा कांचन, शंकपुष्पी, कवट, शमी, लाजाळू, काळी टाकळी, रक्तचंदन ( पुष्पा चित्रपटामुळे कळले असेल ), मासरोहिणी, धावडा, चारोळी, गुंज (ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्याला माहिती असेल), पांढरा पांगरा, लाल पांगरा, मालन्नागोनी... तर उत्तर असेल अर्थात नाही... पण या सगळ्या महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ वनस्पती आहेत... अशा 200 च्या वर वनस्पतीच्या बीज त्याच्या औषधी वैशिष्टयासह माहिती असलेला अवघ्या 30 चा युवक माझा नवा मित्र आहे...होय या पूर्वी मी त्याचे नाव सांगितलं आहे... 'शिवशंकर चापोले'... होय तोच, या जगातला अत्यंत दुर्मिळ माणूस...!!

🌎 डोंगरावरील भ्रमंती
हिरवाई वाढविण्यासाठी जीवाचं रान करणारा एक देवराई दत्तक घेऊन वाढविणारा व्यक्ती सुपर्ण जगताप, अत्यंत हरहुन्नरी पत्रकार दीपरत्न निलंगेकर, पत्रकार अभय मिरजगावे, पत्रकार पंकज जयस्वाल, इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे, आमच्या ग्रुपचे सहकारी माजी सैनिक आणि या गावचे तलाठी शंकर लांडगे आणि मी… या सर्वांना शिवशंकर दाखवत होता… हा बघा पांढरा पांगरा! हा कुठं दिसत नाही… तो अत्यंत दुर्मिळ आहे… अत्यंत औषधी आहे… ही सूळ बाभळ! ही फक्त याच डोंगरावर दिसेल… अख्खे तीन तास सगळ्या वनस्पती तो दाखवत होता आणि आम्ही आ sss वासून ऐकत होतो…

🌎 कपमार्क आणि प्राचीन रसशाळा
हा डोंगर आहे वडवळ गावाच्या जवळ… याला ‘संजीवन बेट’ म्हणून ओळखतात… फक्त मराठवाड्यातून नव्हे ते कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना या राज्यातून पारंपारिक वैद्य येतात… कधी येतात तर उत्तरायण सुरू झालेल्या पहिल्या पाच दिवसात…. असं हे सगळं ऐकत या डोंगरावर आम्ही फिरत होतो… सगळीकडे कपमार्क दिसत होते.. माझी उत्कंठाता वाढली… इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कपमार्क आहेत म्हणजे मानवी वसाहती असाव्यात म्हणून थोडं बारकाईने पाहिले… तर मुळवे (दगडी बेसमेंट) दिसले.. यावरून प्राचीन काळी इथं रसशाळा असावी याची खात्री पटली…

🌎 चुंबकीय क्षेत्र, रक्तगट आणि रोलर
इथून जवळ असलेल्या नऊ कुंडाच्या झरीत प्राचीन गुरुकुल होतं… त्यामुळे या संजीवन बेटाचे पाळमुळ अत्यंत प्राचीन असल्याचे लक्षात आले… पुढे एक ठिकाण आलं, सगळे थांबलो… एक गोल रिंगण दिसलं.. शिवशंकर म्हणाला, हेच ते ठिकाण, लोखंडाला चुंबक फिरवावं तसं इथं माणूस गरगरा फिरतो… आपोआप… अरे बापरे होय का… असं म्हणता म्हणता आमच्यातल्या एका व्यक्तीने कपडे काढले… बनियन आणि पॅन्टवर त्या जागेवर दक्षिण – उत्तर झोपला… शिवशंकर ने सांगितले.. फक्त एक ते दोन लोळ्या तुम्ही स्वतः होऊन घ्या.. पुढे काय होतंय ते बघा… पहिली लोळी झाली दुसरी लोळी झाली… तिसऱ्या लोळीला तो भान विसरला. मग चौथी लोळी, पाचवी लोळी.. मग त्याचे रोलर झाले… पूर्ण शुद्ध हरवून ती व्यक्ती फिरायला लागली… दोन चक्कर झाल्यास त्याला अडवलं… काही सेकंद त्याला कळलं नाही आपल्याला काय झालं… मग आम्ही दुसऱ्या व्यक्तीवर प्रयोग केला. त्याच्यावर काही परिणाम झाला नाही… तिसरा व्यक्ती त्याच्यावर परिणाम झाला त्याचे फुल्ल रोलर झाले… मला राहवलं नाही, मी पण प्रयोग करून पाहिला माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही… पाचवी व्यक्ती आली त्यावर परिणाम झाला… मी सगळ्यांचे ब्लड ग्रुप विचारले… जे रोलर सारखे फिरले त्यातील एकाचे ओ पॉझिटिव्ह होते… एकाचे ए पॉझिटिव्ह होते… ज्या तिघांचे झाले नाही त्यांचा ब्लड ग्रुप चक्क बी पॉझिटिव्ह होता… त्यात मी पण होतो… मी एक दगड मागवला.. जिथे व्यक्ती फिरते त्या भागावर मारला. त्यावेळी लक्षात आले, खाली पोकळी आहे… पोकळी गोलाकार दिसली… गेली वर्षानुवर्षे लोकं इथं लोळतात अंधश्रद्धा ठेवून… उत्तर बाजुला एक दगड त्याला शेंदूर लावूनही ठेवला आहे…तिथे चुंबकीय क्षेत्र आहे. हे निश्चित पण ठराविक रक्त गटाच्या लोकांनाच का रोलरसारखं फिरवत आहे… हा यक्ष प्रश्न आहे… भूभौतिकशास्त्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीला या जागेवर आणून अभ्यासावं लागणार आहे… त्यातून हे मिथ बाहेर येईल….!!

🌎 गुहा आणि रोलरच गुढ
दुसरा एक अंदाज आहे… तो पण शोधण्याचा प्रयत्न केला. दक्षिण बाजूने उत्तरेकडे एक गुहा आहे… ती डोंगर उतरून जो रस्ता अत्यंत खडतर आहे, तिथे द्वार आहे. मी, शिवशंकर आणि दुसरे दोन सवंगडी घेऊन त्यात उतरलो… अगदी बरंच अंतर मोबाईल बॅटरी लावून सरपटत गेलो… त्यावेळी कळले की, ही गुहा प्रचंड लांब असून, जिथे रोलरसारखं माणूस फिरतो तिथे जाऊन ती थांबत असावी… पण काही अंतरावर ती माती पडून अत्यंत निमुळती झाली आहे… म्हणजे पुढे माणूस जाऊ शकत नाही… आजपर्यंत याला अनेकांनी गूढ म्हटलं. पण माझ्या दृष्टीने इथं मोठं विज्ञान दडलं आहे… अशा गोष्टी वेळीच शोधून काढल्या तर लोकांच्या अंधश्रद्धा संपून विज्ञानावर श्रद्धा वाढेल…

🌎 दुर्मिळ वनस्पती ‘आपमारी’
हे सगळं डोक्यात ठेवून आम्ही अत्यंत दुर्मिळ वनस्पती, त्याचे वैशिष्टे बघत, डोंगर पालथा घालत होतो… गावच्या उपसरपंचानी वरच डोंगरावर एक मंदिर आहे, तिथे जेवू घातले… अत्यंत रुचकर जेवण जेवून डोंगर उतरत होतो… आम्हाला शिवशंकरने ‘आपमारी’ नावाच्या वनस्पतीचा पाला खायला दिला… त्यांनी सांगितले तुमच्या रक्तातील अधिक झालेली साखर काढून टाकण्यासाठी या वनस्पतीच्या पाल्याचा वापर होतो… कोणताही साईड इफेक्ट होत नाही… मात्र पुढले काही तास तुमच्या जिभेला कसलीच चव राहणार नाही… आम्ही तो पाला खाला… पुढच्या 20 मिनिटांनी आम्हाला लेमन गोळी दिली… तोंडात टाकली तर ती गोड लागणे सोडा चव हिन मातीसारख म्हणावं तर तसही नाही… कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जशी जिभेची चव जात होती तसंच अगदी… म्हटलं होईल थोडा वेळानी नॉर्मल…

🌎 चमत्कारीक वनस्पतीने भरलेलं बेट
गावात थांबलो… लोकांशी गप्पा मारल्या मंदिर बघितलं… यात दोन एक तास गेले… मग निघालो… तिथून एक अर्धा तासाच्या अंतराने लातूर – नांदेड रोडवर रसवंतीच्या ठिकाणी थांबलो… रस प्यायला.. त्याला पण चव नाही… मग मात्र आम्ही हादरलो.. एवढा वेळ कशी काय चव जाऊ शकते… आमच्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर होते ते पण म्हणाले… यार हे काय झालं… असं म्हणत लातूरला पोहचलो… रात्री जेवताना मात्र चव आली आणि जीव भांड्यात पडला… पण संजीवन बेट मात्र आता संशोधनाच्या दृष्टीने खुणावतो आहे… ठरवलं तर महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे संशोधन केंद्र इथे बनेल शेकडो संशोधकाच्या संशोधनाची भूक भागविणारा हे संजीवनी बेट अनेक चमत्कारीक वनस्पतीने भरलेलं आणि बाहरलेलं आहे… नक्की जा पण कोणताही पाला खाऊ नका ते काही पण असू शकतो…!!

3 thoughts on “एका संजीवनी (गूढ) बेटावरचा एक दिवस …!!

  1. Will be glad to offer any feedback you may want on ref of herbs from Ayurveda ,where it could be of use on diseases diagnosed as per modern medicine,

  2. आप मारी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बेडकीचा पाला किंवा गुडमार आहे
    हा पाला खाल्ल्याने जिभेवरील तू देणारे टेस्ट बस असतात विशेषता गुड टेस्ट बर्ड्स काही काळाकरता कार्यरत होत नाही जर तुम्ही मीठ खाल्लं किंवा नंतर परत साखरेची चव येते महाराष्ट्रातील बऱ्याच जंगलाचा पाला मिळतो
    बहुतेक मधुमेहाचा आयुर्वेदिक औषधांमध्ये या पाल्याचा उपयोग करतात परंतु हे शंभर टक्के मधुमेहावर काम करते हे अजून सिद्ध झालेलं नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!