krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

सदाहरीत वृक्ष : नांदुरकी!

1 min read
तरू नांदुरकी सळसळे पान परि खिन्न मन वैकुंठ गमन ! धन्य ते तुकोबा बहू आम्हा दिले ग्रंथ श्रेष्ठ गाथा जगाने वंदिले! नांदुरकी हे झाड आठवले की, डोळ्यासमोर संत तुकोबाराय येतात. कारण नांदुरकी या झाडाला संगत व सहवास संत तुकाराम महाराज यांचा मिळाला. संगत चांगली असेल तर सर्व काही चांगले बनते याचे उदाहरण म्हणजे नांदुरकी आणि संत तुकाराम महाराज यांची संगती हे एक जीवंत आणि मूर्तीमंत उदाहरण आपल्यासमोर आहे.

🌳 पौराणिक पार्श्वभूमी
ज्यावेळी संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले, त्यावेळी नांदुरकीच्या झाडाखाली बसून महाराजांनी आपला अवतार संपावला, अशी मान्यता आहे. त्यावेळी नांदुरकीला सुद्धा खूप दुःख झाले. या झाडाने आपले दुःख आपल्या पानांमधून व्यक्त केले. अलीकडील काळात असे संशोधन समोर आले आहे की, झाडांना सुद्धा भावना असतात आणि लवकरच येणाऱ्या काळात हे पण सिद्ध होईल की, झाडे भावना व्यक्त सुद्धा करू शकतील. कारण त्यावर संशोधन सुरू आहे.

🌳 नांदुरकीचे वैशिष्ट्य
नांदुरकी हा एक विशाल आणि विस्तीर्ण वाढणारा वृक्ष आहे, हा 12 महिने हिरवागार असतो, याची पाने जाड आणि दाट असतात. त्यामुळे हा वृक्ष वर्षभर गडद सावली देतो. नांदुरकी हा वृक्ष 24 तास मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतो. या झाडाची पाने, फ़ांद्या खोड, मूळ्या, फळ, बिया या सर्व औषधी गुणधर्म युक्त असतात. यामुळे आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. हे झाड अक्षय किंवा दीर्घ काळ टिकणारे असते. याला पारंब्या सुद्धा असतात. या झाडाच्या फांदीमधून नवीन वृक्ष तयार होत असतो. पक्ष्यांचे हे खूप आवडते झाड आहे. या झाडावर कायम पक्षांचा किलबिलाट असतो.

🌳 औषधी गुणधर्म
आयुर्वेदमध्ये या झाडाला विशेष महत्त्व आहे. या झाडाच्या सालीचा रस यकृताच्या विकारांवर देतात. साल व पानांचे चूर्ण संधिवातातील डोकेदुखीवर वापरतात. मुळाची साल व पाने तेलात उकळून जखमांवर लावतात. तुळशीची व याची पाने यांचा समभाग रस मिसळून तो आटवून त्याचा पोटावर लेप लावल्यास आणि गरम विटेने शेकल्यास पोटदुखी थांबते. याचा पाला जनावरांना खाऊ घालतात. त्यामुळे त्यांचे विविध आजार बरे होतात. पूर्वीच्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये नांदुरकीचे वृक्ष पाहायला मिळत. शेतीतील पिकांना देखील अनेक औषधे यापासुन बनतात.

🌳 एक घर, एक नांदुरकी उपक्रम
शेतकऱ्यांच्या जीवनात या झाडाला महत्व खूप आहे. परंतु, रवळगावमधून हे झाड पूर्ण नामशेष झाले होते. येथील बहुतांशी शेतकऱ्यांना हे झाड कसे असते हेदेखील माहिती नव्हते. या झाडाशिवाय शेती अशक्य आहे. नागर फाउंडेशनने याचा अभ्यास करून रवळगावमध्ये ‘एक घर, एक नांदुरकी’ हा उपक्रम सुरुवातीच्या काळात सुरू केला. सुरुवातीला बीड जिल्ह्यातून याच्या फ़ांद्या लावण्यासाठी आणल्या. परंतु, सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद खूप नकारात्मक राहिला. नंतर मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्यानंतर हळूहळू प्रतिसाद वाढला आणि माणसे ही झाडे लावू लागली. आतापर्यंत जवळपास 500 च्या आसपास झाडे यशस्वी झाली आहेत. अनेक कुटुंब राहिली आहेत त्यांनाही नागर फाउंडेशन झाडे देणार आहे. जोपर्यंत प्रत्येक घरी एक झाड यशस्वी होत नाही तोपर्यंत आपला उपक्रम सुरू राहील.

🌳 अनिष्ठ रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा
काळाच्या ओघात या झाडांभोवताली अनेक अनिष्ठ रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा निर्माण झाल्या किंवा निर्माण केल्या गेल्या. यामध्ये हे झाड अंगणात लावू नये, या झाडाखाली मटण खाऊ नये, हे झाड अंगणात लावले की, महिला नांदत नाहीत आणि इतर गोष्टी. अडाणी समाज याला बळी पडला आणि या झाडाचा विनाश झाला. ही व्यवस्था अशीच पुढे नेण्यासाठी काही समाजकंटक या अंधश्रद्धांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुण आणि तरुणींनो झुगारून द्या सर्व अनिष्ठ चालीरीती, प्रथा, परंपरा आणि लावा नांदुरकी दारोदारी आणि घरोघरी.

🌳 कल्पवृक्ष
नांदुरकी हे झाड मनुष्य जीवनासाठी एक कल्पवृक्ष आहे. शेतीचा विकास करायचा असेल तर जास्तीत जास्त नांदुरकीची झाडे प्रत्येकाने आपापल्या शेतात लावली पाहिजे.

✳️ ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या कवितेमध्ये या झाडाचे पर्यावरणातील महत्त्व विषद केले आहे.

एक होता चिमणा, एक होती चिमणी
नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळखदेख
चिमणा म्हणाला चिमणीला, ‘आपण बांधू घरटं एक’
चिमणी काही बोलेना, जाग्यावरची हालेना
चिमणा म्हणाला, ‘येशिल ना? माझी मैत्रीण होशील ना?’
चिमणी म्हणाली भीतभीत, “‘मला किनई पंख नाहीत’
‘नसोत पंख नसले तर दोघे मिळून बांधू घर’
चिमणा गेला कामावर, चिमणी बसली झाडावर
चिमणा आला झाडावर, मिळकत घेऊन स्वत:ची
एक कण धान्याचा, एक काडी गवताची
काड्या काड्या सांधून, घरटं काढलं बांधून
नांदुरकीच्या फांदीवर झुलू लागलं सुंदरसं घर

एके दिवशी अघटित घडले, चिमणीलाही पंख फुटले
चिमणा झाला राजा, चिमणी झाली राणी
एक होता चिमणा, एक होती चिमणी.

1 thought on “सदाहरीत वृक्ष : नांदुरकी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!