लम्पी स्कीन डिसीज या विषाणूजन्य चर्मरोगाची कारणे व प्रतिबंधक उपाय
1 min read🐄 रोग प्रादुर्भावाचा भौगोलिक विस्तार
लम्पी स्कीन डिसिज हा रोग सन 1929 पासून 1978 पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर हळूवारपणे या रोगाने सभोतालच्या इतर देशात शिरकाव केला. मात्र सन 2013 नंतर वेगाने या रोगाचा सर्वदूर प्रसार होत आहे आणि आता हा रोग अनेक युरोपीय व आशियायी देशात पसरला आहे. भारतात सदर रोगाची पहिली नोंद ऑगस्ट 2019 मध्ये ओडिशा राज्यात झाली. तदनंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झाल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात प्रथमतः या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल 2020 दिसून आला. तदनंतर 2020-21 मध्ये हा रोग महाराष्ट्रात सर्वदूर पसरला.
🐄 रोगाची कारणे
✴️ लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून, या रोगाचे जंतु देवी विषाणू गटातील ‘कॅप्रीपॉक्स’ प्रवर्गात मोडतात.
✴️ या विषाणूचे शेळ्या-मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येते. मात्र, हा रोग शेळ्या मेंढ्यांना अजिबात होत नाही.
🐄 रोग प्रादुर्भाव
✴️ हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैसवर्गीय प्राण्यात आढळून येत असला तरी, या रोगाचा प्रादुर्भाव गोवर्गात (30 टक्के), म्हशीच्या (1.6 टक्के) तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो.
✴️ सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात तीव्रता अधिक असते. हा रोग सर्व वयोगटात होत असला तरी लहान वासरे प्रौढ जनावरांच्या तुलनेने अधिक प्रमाणात बळी पडतात.
✴️ हा रोग प्रामुख्याने उष्ण व दमट वातावरणामध्ये जेव्हा कीटकांची वाढ जास्त प्रमाणत होते तेव्हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो तर, हिवाळ्यातील थंड वातावरणात जेव्हा कीटकांची वाढ कमी होते, तेव्हा प्रसार व प्रादुर्भाव कमी होतो.
✴️ या आजाराचा रोगदर 2-45 टक्के (सर्वसामान्यपणे 10-20 टक्के) तर मृत्यूदर 1-5 टक्क्यांपर्यंत आढळून येतो.
✴️ या आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्धउत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
✴️ या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खुप विकृत दिसते. त्यामुळे हा रोग मनुष्यास होईल, याची भीती अनेक पशुपालकात निर्माण झाली आहे. परंतु, 100 वर्षाच्या इतिहासात हा रोग मनुष्यात झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे पशुपालकाने आपणास हा रोग होईल म्हणून घाबरण्याचे कारण नाही.
🐄 रोग प्रसार
✴️ या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास ( एडीस), गोचीड, चिलटे (क्युलीकॉईड्स) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतात.
✴️ विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते 1-2 आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात व तदनंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूची लागण होऊ शकते.
✴️ त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (35 दिवस) जिवंत राहू शकतात.
✴️ विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो.
✴️ गाभण जनावरांमध्ये या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.
✴️ दुध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातुन व स्तनावरील व्रणातुन रोग प्रसार होतो.
🐄 रोगाची लक्षणे
✴️ बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्त काळ साधारणपणे 2-5 आठवडे एवढा असतो.
✴️ या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथीना सूज येते.
✴️ साधारणपणे 3-5 दिवस हलका, मध्यम ते भरपूर ताप येतो.
✴️ दुग्धउत्पादन कमी होते.
✴️ त्वचेवर हळूहळू 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. यात प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात. कांही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात.
✴️ क्वचीत येणाऱ्या तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो.
✴️ क्वचीत डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येते. डोळ्यांना पांढरटपणा येतो तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते.
✴️ पायांवरील व्रणामुळे सांधे व पायामध्ये सूज येवून जनावरे लंगडतात. जनावराच्या पोळीसही सुज येते.
✴️ या आजाराच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा होऊ शकते.
✴️ रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.
🐄 रोगनिदान
या आजाराच्या रोगनिदानासाठी त्वचेच्या व्रणाच्या खपल्या, रक्त व रक्तजल नमुने यांचा वापर करून विषाणू निदान केले जाते.
🐄 उपचार
✴️ हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. तरीही इतर गुंतागुंती होऊ नये म्हणून ‘माफसू’ने विकसित केलेली उपचार पद्धती सर्वसामान्यपणे 3-7 दिवस वापरल्यास जनावरे पुर्णपणे बरी होतात. काही गुतागुंत झालेल्या जनावरात 2-4 आठवडे उपचार करावा लागतो.
✴️ यामध्ये प्रतिजैविके, ज्वरनाशक, अँटीहिस्टेमिनिक औषधे, प्रतिकारशक्ती वर्धक जीवनसत्व अ आणि ई, शक्तीवर्धक ब जीवनसत्व तसेच त्वचेवरील व्रणासाठी अँटिसेप्टिक/फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करण्यात यावा.
✴️ तोंडात व्रण झाल्यास तोंड पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यानी धुवून बोरोग्लीसरीन लावावे.
🐄 रोग नियंत्रण
रोग नियंत्रणासाठी खालील उपाययोजनेचा अवलंब करावा.
✴️ बाधित जनावरांना वेगळे करावे तसेच बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नये.
✴️ जनावरांची बाधित भागातून ने-आण बंद करावी.
✴️ साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
✴️ बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी योग्य पोशाख परिधान करावा तसेच हात डेटॉल किंवा अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरने धुवून घ्यावेत. तपासणी झाल्यानंतर कपडे व फूटवेयर गरम पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत.
✴️ अशा जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे की वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करून घेण्यात यावे.
✴️ रोग नियंत्रणासाठी माशा, डास व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करण्यात यावे. यासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा.
✴️ परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. कीटकनाशक औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठ्यात फवारा मारावा.
✴️ आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन दिल्यास गोचीड नियंत्रण होवून रोगप्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे.
🐄 लसीकरण
लम्पी रोगावरील लस भारतात उपलब्ध नाही. मात्र, या विषाणूचे शेळ्यातील देवीच्या विषाणू बरोबर असणाऱ्या साधर्म्यामुळे शेळ्यातील देवीची लस (उत्तरकाशी स्ट्रेन) तीन महिने वयोगटावरील गाई, म्हशींना त्वचेखाली 1-2 मिली याप्रमाणे दिल्यास रोगास उत्तम आळा बसल्याचे मागील साथीच्या काळात दिसून आले.
Thanks for the information sir
Good information.