कापसाने चुकवला अंदाज : उत्पादन 94 लाख गाठींनी घटले
1 min read🌐 कापूस उत्पादनाचा अंदाज
भारतात 1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष मानले जाते. सीएआय (काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया-Cotton Association of India), यूएसडीए (युनायटेड स्टेटस् डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर-United States Department of Agriculture), सीएबी (काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड-Cotton Advisory Bord) या संस्था देशातील एकूण कापूस उत्पादनाचा अंदाज (Cotton production forecast) दरवर्षी ऑक्टाेबरमध्ये व्यक्त करतात. त्यानंतर याच संस्था बाजारातील कापसाची आवक लक्षात घेत त्यांचा कापूस उत्पादनाचा अंंदाज कमी-अधिक करतात. सन 2021-22 च्या हंगामात ऑगस्ट 2021 मध्येच कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली हाेती. या हंगामात भारतात 360.13 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआय (काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया)ने व्यक्त केला हाेता. यूएसडीए (युनायटेड स्टेटस् डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर)ने मात्र 345 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला तर, सीएबी (काॅटन ॲडव्हायझरी बाेर्ड)ने भारतात 370 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता.
🌐 बाजारातील कापसाची आवक आणि बदलते अंदाज
सन 2021-22 च्या हंगामात पंजाब व हरियाणात ऑगस्ट 2021 मध्ये तर मध्य व दक्षिण भारतात ऑक्टाेबरपासून कापसाच्या खरेदीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. संपूर्ण देशात ऑक्टाेबर 2021 ते एप्रिल 2022 या सात महिन्याच्या काळात कापूस दरात तेजी असली तरी बाजारातील कापसाची आवक संथ हाेती. ही आवक लक्षात घेता जानेवारी 2022 मध्ये या तिन्ही संस्थांनी त्यांचे कापूस उत्पादनाचे अंदाज बदलविले. सीएआयच्या मते भारतात 340 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार तर यूएसडीने 315 लाख गाठी आणि सीएबीने 345 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज नव्याने व्यक्त केला. दुसरीकडे, या हंगामात 290 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज देशभरातील जिनर्स असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे तर, तज्ज्ञ व कापूस बाजार अभ्यासकांच्या मते हे उत्पादन 310 लाख गाठींचे असेल.
🌐 अंदाज, वास्तव आणि फसगत
कापूस वर्ष 1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर असे मानले जात असले तरी दरवर्षी 30 एप्रिलपर्यंत जवळपास 90 ते 92 टक्के कापूस बाजारात येताे. नाेव्हेंबर ते जानेवारी या काळात बाजारातील कापसाची आवक अधिक असते. एप्रिलपासून तापमानात वाढ हाेत असल्याने कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करण्यास अडचणी जातात. त्यामुळे मे अखरेपर्यंत कापसाचा हंगाम संपल्यागत हाेताे आणि जूनपासून नवीन पेरणीच्या कामाला सुरुवात हाेते. सन 2020-21 च्या हंगामात देशात एकूण 352.48 लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले हाेते. यातील 336.36 लाख गाठी कापूस 1 ऑक्टाेबर 2020 ते 30 एप्रिल 2021 या काळात बाजारात आला हाेता. म्हणजेच 1 मे ते 30 सप्टेंबर 2021 या पाच महिन्यात 17 लाख गाठी (अंदाजे 5 टक्के) कापूस बाजारात आला हाेता. त्यामुळे चालू हंगामात देशात जास्तीतजास्त 265 ते 268 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेण्याचे संकेत बाजाराच्या अभ्यासावरून मिळतात. देशभरातील कापड व सूत गिरणी मालक शासकीय संस्थांच्या याच अंदाजावर विश्वास ठेवत त्यांच्या सूत व कापड उत्पादनाचे नियाेजन करतात. मागील काही वर्षांपासून कापूस उत्पादनाचा अंदाज आणि बाजारातील आवक यात माेठी तफावत येत असल्याने त्यांची फसगतही हाेत आहे.
🌐 ‘क्लाेजिंग स्टाॅक’चा घाेळ
सीएबीने सन 2020-21 च्या हंगामातील कापसाचा ओपनिंग स्टाॅक (Opening stock) 120.79 लाख गाठींचा तर कापसाचे उत्पादन 352.48 लाख गाठींचे दाखवित क्लाेजिंग स्टाॅक (Closing stock) 71.84 लाख गाठींचा दाखविला हाेता. यात आयात केलेल्या 11.03 लाख गाठी तर निर्यात केलेल्या 77.59 लाख गाठी कापसाचा समावेश आहे. त्यामुळे सन 2021-22 च्या हंगामात ओपनिंग स्टाॅक 71.84 लाख गाठींचा दाखवून उत्पादन मात्र 340.62 लाख गाठींचे, आयात 18 लाख गाठींची व निर्यात 40 लाख गाठींची दाखवित क्लाेजिंग स्टाॅक हा 45.46 लाख गाठींचा दाखविला आहे. वास्तवात, 2020-21 च्या हंगामातील क्लाेजिंग व 2021-22 च्या हंगामातील ओपनिंग स्टाॅक हा केवळ 16 ते 17 लाख गाठींचा हाेता. सन 2021-22 च्या हंगामातील कापसाची निर्यात ही 40 लाख गाठींची दाखविली असली तरी ती 50 लाख गाठींपेक्षा अधिक असून, हंगामाच्या शेवटी ही निर्यात 65 लाख गाठींवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
🌐 मागणी 25 लाख गाठींनी वाढली
काेराेना संक्रमणानंतर संपूर्ण जगात कापसाचा वापर आणि मागणी (Use and demand of cotton) 2.66 टक्क्यांनी वाढली आहे. भारतातील कापसाची मागणी ही दरवर्षी किमान 25 लाख गाठींनी वाढत आहे. सीएबीच्या मते सन 2020-21 च्या हंगामात सूत व कापड गिरण्यांची 297.45 लाख गाठी कापसाचा वापर केला असून, हातमाग वस्राेद्याेगाने 22.42 लाख गाठी आणि इतर उद्याेगांनी 15 लाख गाठी म्हणजेच 334.87 लाख गाठी कापसाचा वापर केला. सन 2021-22 च्या हंगामात सूत व कापड गिरण्यांची कापसाची मागणी ही 305 लाख गाठींची असून, हातमाग वस्राेद्याेगाला 24 लाख गाठी आणि इतर उद्याेगांना 16 लाख गाठी म्हणजेच 345 लाख गाठी कापसाची आवश्यकता असल्याचे सीएबीच्या अहवालात नमूद आहे. ही वाढलेली कापसाची मागणी वरवर 10.13 टक्के जरी दिसत असली तरी कापसाची निर्यात व इतर उद्याेगातील कापसाचा वाढता वापर लक्षात घेता ही मागणी किमान 25 टक्क्यांनी वाढली आहे.
🌐 बाजारातील झाेननिहाय कापसाची आवक (आकडे लाख गाठींमध्ये)
झाेन – 1 ऑक्टाेबर 2020 ते 30 एप्रिल 2021 – 1 ऑक्टाेबर 2021 ते 30 एप्रिल 2022
✳️ नाॅर्थ झाेन – 63.81 – 44.073
✴️ पंजाब – 10.25 – 6.565
✴️ हरियाणा – 21.80 – 12.904
✴️ अप्पर राजस्थान – 19.46 – 15.229
✴️ लाेअर राजस्थान – 12.30 – 9.377
✳️ सेंट्रल झाेन – 180.25 – 142.64
✴️ गुजरात – 86.00 – 63.775
✴️ महाराष्ट्र – 77.00 – 63.25
✴️ मध्य प्रदेश – 17.25 – 15.615
✳️ साऊथ झाेन – 87.35 – 55.066
✴️ तेलंगणा – 46.25 – 25.642
✴️ आंध्र प्रदेश – 14.85 – 11.621
✴️ कर्नाटक – 22.25 – 16.053
✴️ तामिळनाडू – 4.00 – 1.75
✳️ ओडिशा – 2.95 – 1.877
✳️ इतर राज्ये – 2.00 – 2.50
✳️ एकूण – 336.36 – 246.156